आत्मरंगच्या कार्यक्रमानंतर अनेकांचे फोन आले. उपस्थित असणारे सर्व गुरुस्थानी असणारे ज्येष्ठ साहित्यिक कवी या सर्वानीच खूप कौतुक केले आणी मला हा साराच जीवन प्रवास तू आत्मकथन किंवा आत्मचरित्र या रुपात शब्दबद्ध कर असे आवर्जून सांगीतले. कै .डॉ. दभी कुलकर्णी सरांचे कड़े मी नित्य जात असे. मी त्यांना जर केव्हा विचारले ” सर मी तुम्हाला भेटायला केव्हा येवू ? तर म्हणत तुला मुक्त प्रवेश आहे केव्हाही येत जा फक्त रात्रिची झोपेची वेळ सोडून ! इतके जवळचे त्यांचे माझे सम्बंध होते ..अनेक गप्पा होत असत ! त्यांनाही माणसांची आवड़ खूप होती.प्रत्येकवेळी माझ्याबरोबर त्यांच्याकड़े जाताना कुणी नां कुणी तरी असे. सर तसे स्पष्ट वक्ते होते ! त्यांना काही महत्वाचे बोलायचे असेल तर ते मला म्हणत अरे ” आप्पा आज फ़ौज घेवून येवू नकोस रे ..आमची नाळ जुळली होती. अगदी मनमोकळे पणाने आम्ही बोलत असू .
एक दिवस मला म्हणाले तू बुकबाइंडर तर माझा भाऊ बुकबाइंडर होता ..त्यामुळे मलाही वाचनाचे वेड लागले. पुढे लिहूही लागलो. तू आता तुझे आत्मकथन लिही ! आणी त्याला घटित अघटित असे नाव दे ! खरच त्यांनी सूचविलेले नाव हे अत्यंत समर्पकच आहे . माझी बहुअंशी पुस्तके त्यांनी प्रकाशित होण्याआधीच वाचली किंबहुना त्या पुस्तकांचे नामकरण ही त्यांनीच केले आहे …हा भाग्ययोग !
मी मुळात उत्तम बुकबाइंडर असल्यामुळे माझ्या वह्या खुप छान देखण्या असत . कॉलेजला असताना मी सर्व विषयासाठी एकच मोठ्ठी ६०० पेजेसची वही सेक्शन शिलाई व रेक्झिन बाइंडिंगची वापरत असे. वापरायला खुप सोपी .. तशीच एक वही मी केवळ वाचलेले आवडलेले साहित्य लिहिण्यासाठी केली होती . त्यामध्ये ययाति , कर्ण , छावा , छ. शिवाजी , छ. संभाजी , झेंडूची फुले , सावरकर , अनुराग , घरजिव्हार , अनुबंध , अमृतवेल अशा अनेक सुप्रसिद्ध कादंबऱ्या मधील उत्तम सुंदर मजकूर , तसेच काही निवडक कवीता मी लिहुन ठेवत असे. तो माझा छंद होता ! हस्ताक्षर उत्तम रेखीव ! माझी ती वही सर्वाना आवडत असे .. ती सर्व विद्यार्थी मित्रामध्ये वाचनासाठी फिरत असे.
माझे गुरुवर्य प्राचार्य कै. बलवंत देशमुख , तसेच प्राचार्य द.ता. भोसले सरांनीही पाहिली होती . ती वही कालांतराने एसएनडीटी कॉलेज डोंबीवली च्या रिटायर्ड प्राध्यापिका कै . मालती देसाई यांनी पाहिली. हे मी यापूर्वीच्या भागामध्ये उदघृत केले आहेत .
या साहित्य शिंपल्यातील मोती पुस्तकाच्या प्रकाशनाला आवर्जून आत्मरंग या संगीत कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आवर्जून उपस्थित होते ! पण एक खंत म्हणजे ज्यांनी या पुस्तकाला प्रोत्साहन दिले होते , त्या प्रा.मालती देसाई त्याक्षणी हयात नव्हत्या. त्यांचे अचानक पुस्तक प्रकाशनाच्या आधीच ३ महिने हॄदयविकाराने निधन झाले होते . हे दुःख आजही जाणवते.
मोठ्ठी माणसं मनानीही मोठ्ठी असतात. मला भेटलेले हे सर्वच ज्येष्ठ साहित्यिक सर्वारथाने मोठ्ठे होते…मी त्यांच्या पुढे अगदीच सामान्य , नवोदित पण हे सर्वच साहित्यिक त्यांच्या कार्यक्रमाला मला त्यांच्या सोबत घेवून जात असत ! माझी साहित्यिक , सन्तचित्रकार , मुद्रक , प्रकाशक म्हणून आवर्जून ओळख करुन देत असत . हा या सर्वांच्या मनाचाच मोठ्ठेपणा होता. अशा गोष्टी खुप दुर्मिळ असतात . दुसऱ्याला मोठ्ठे करणे हा सद्गुण खुपच कमी व्यक्तिंच्यात आढळून येतो.आज माझी जी काही थोडी बहुत ओळख या साहित्य क्षेत्रात आहे ती केवळ या सर्व साहित्य गुरुंच्या आशीर्वादामुळे हे अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो .
या सर्वांच्या बरोबर कार्यक्रमा निमित्त अनेक ठिकाणी मला प्रवासाचा योग लाभला , त्यांचा मनमुक्त आपलेपणाचा , वैचारिक मार्गदर्शक सहवास लाभला. महाकवी कालिदास प्रतिष्ठान या संस्थेला या सर्वांचेच मोलाचे मार्गदर्शन लाभले . कै. दभी सरांनी महाकवी कालीदास जयंती निमित्त किमान एक पुस्तक तरी प्रकाशित व्हावे अशी संकल्पना मांडली होती .
विशेष आनंद म्हणजे कालिदास संस्थेने आजपर्यंत प्रस्थापित तसेच नवोदित कवी लेखकांची ५७पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यातून साहित्यानुभव समृद्ध होत राहिले. आणी माझी स्वत:ची आजपर्यंत २३ पुस्तके प्रकाशित झाली आणी आज अजुन ७ पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत …हेच या साहित्यिक सहवासाचे फलित आहे ..
पुढील १७व्या भागात कै. शिवाजीराव भोसले , कै. जगदीश खेबुडकर , मा. द. मा. मिरासदार याबाबत लिहीत आहे.
© वि.ग.सातपुते
9766544908
(पुणे मुक्कामी)
२७ – ११ – २०१८.
Leave a Reply