पंकज मलिक या श्रेष्ठ संगीत दिग्दर्शकावर एक चरित्रपट सई परांजपे यांनी बनवला होता. त्या बद्दल बोलताना सई परांजपे म्हणतात….
पंकज मलिक या श्रेष्ठ संगीत दिग्दर्शकावर एक चरित्रपट मी प्रस्ताव मांडला. त्या वर्षी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता, तेव्हा माझ्या प्रस्तावाला लगेचच मान्यता मिळाली. पण स्वत: पंकज मलिक या सिनेमासाठी मुळीच राजी नव्हते. किंबहुना, ते मुळात कुणाला भेटायलाच तयार नव्हते. त्यांना मनापासून हा सोपस्कार नको होता. भाव खाण्याचा त्यात लवलेश नव्हता. पण एकदा कशीबशी त्यांची भेट घेऊन, त्यांना रूपरेषा समजावून त्यांचे मन मी वळवू शकले. पुढचे सोपे होते. एकदा ‘हो’ म्हटल्यावर मग हवे ते सहकार्य आनंदाने द्यायला ते तयार झाले.
त्यांचे घर केवळ शूटिंगसाठी नव्हे, तर ‘अड्डा’ म्हणून आमचे हक्काचे ठिकाण झाले. पंकजदा मला नेहमी ‘माय डियर सिस्टऽर’ अशी छान हाक मारीत. ते हाडाचे कलावंत होते. नट होते. झकासपैकी ‘शोमन’ होते. त्यामुळे त्यांच्या मुलाखती, त्यांचे किस्से बहारदार होत. मधे मधे ते गाणे गुणगुणत, एखादी नक्कल करीत, एखादा संवाद रंगवून सांगत.
त्यांच्या गच्चीवर चित्रित केलेला एक प्रसंग : दादा कट्टय़ावर रेलून बसले होते. आठवणी सांगत होते. जवळच त्यांची पत्नी ऊन द्यायला कापडावर काही वाळवण पसरत होती. कॅमेरा चालू होता. बोलता बोलता दादा ‘दो नैना मतवाले’ हे त्यांचे प्रसिद्ध गाणे गाऊ लागले. आपल्या पत्नीकडे पाहत.. अगदी ‘आशिकाना अंदाजसे’! साठेक वर्षीय दीदींनी मग लटक्या रागाने असा काही मुरका मारला की बस्स!
नॅशनल फिल्म अर्काइव्हज्कडून आम्ही पंकजदांच्या काही गाण्यांचे दुर्मीळ भाग मिळवले. ‘चलो पवनकी चाल’ इ. जुन्या गीतांचे चित्रण पाहणे-ऐकणे हा थरारक अनुभव होता.
रायचंद बोराल हे प्रख्यात संगीत दिग्दर्शक न्यू थिएटरच्या संगीत विभागाचे प्रमुख होते. त्यांना बॉलीवूडच्या संगीताचे जनक मानतात. त्यांचा आणि दादांचा फार पूर्वीपासूनचा सहप्रवास. दोघांनी उभरत्या बंगाली सिनेसृष्टीत मोलाची कामगिरी केली होती. इतिहास घडवला होता. तेव्हा त्यांचे अनुभवाचे बोल पंकजदांच्या चरित्रपटासाठी अत्यावश्यक होते. पण अनेक वर्षांपासून दोघांमध्ये बेबनाव झाला होता. बातचीत बंद होती. तेव्हा या सिनेमात बोरालांच्या सहभागाविषयी ‘दुहेरी’ विरोध होता. मोठय़ा प्रयासाने दोघांची मने वळवून अखेर या धुरंधर संगीतकाराची सुंदर मुलाखत डबाबंद केली.
हेमंतकुमारांच्या बाबतीतही तोच प्रकार. दोघांचा वर्षांनुवर्षे अबोला आणि म्हणून विरोध. पण एव्हाना मी समजूत घालण्यात तरबेज झाले होते. तेव्हा हाही तिढा मी सोडवला. मग हेमंतकुमार पंकज मलिक यांच्या योगदानाबद्दल अप्रतिम बोलले. एवढेच नाही, तर दादांनी बसवलेले एक गीतही गायले.
पंकज मलिक नंतर जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते फाळके पुरस्कार घ्यायला पुढे झाले तेव्हा पाश्र्वसंगीत म्हणून मी त्यांचेच ‘आई बहार आई, आई बहार’ हे सदाबहार गाणे साऊंड ट्रॅकवर लावले. हा सिनेमा खरोखरच चांगला झाला होता. त्याला केवढे ऐतिहासिक आणि संग्राह्य़ मोल होते. अवघा काळ बोलका झाला होता. पण दुर्दैव! त्याचा दूरदर्शनवर आज मागमूसही उरलेला नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply