सुगम संगीत काय किंवा चित्रपट संगीत काय, इथे सर्जनशीलता जरुरीची नसते, असे म्हणणारे बरेच “महाभाग” भेटतात!! वास्तविक, सामान्य रसिक (हा शब्दच चुकीचा आहे ,जर रसिक असेल तर सामान्य कसा?) ज्या संगीताशी मनापासून गुंतलेले असतात, ते संगीत सामान्य कसे काय ठरू शकते? त्यातून, स्वरांच्या अलौकिक दुनियेत जरी शब्द “परका” असला तरी ते “कैवल्यात्मक” संगीत जरा बाजूला ठेवले तर, दुसऱ्या कुठल्याही सांगीत आविष्कारात, शब्दांशिवाय पर्याय नाही. तेंव्हा शास्त्रोक्त संगीत वगळता (अर्थात रागदारी संगीतात देखील, शब्दांना महत्व देऊन, गायकी सादर करणारे कलाकार आहेत!!) अन्य कुठल्याही संगीतात, शब्दांचे महत्व नेहमीच महत्वाचे ठरतात.
आता, सर्जनशीलता हा शब्द जरा फसवा आहे, विशेषत: सुगम संगीतातील सर्जनशीलता, कधीही, सहज जाताजाता,ऐकून समजण्यासारखी नाही. खरतर, हे तत्व सगळ्याचा कलांच्या बाबतीत लागू पडते!! आपल्याला “सर्जनशीलता” हा शब्द ऐकायला/वाचायला आवडतो परंतु याचा नेमका अर्थ जाणून घेण्याची “तोशीस” करीत नाही. इथे या शब्दाची “फोड”करण्याचा उद्देश नाही परंतु, सुगम संगीतातील सर्जनशीलता, हा संशोधनाचा विषय मात्र नक्की आहे, जर सुगम संगीत हे, संगीत म्हणून मान्य केले तर!!
इथे वेगवेगळ्या पातळीवर सर्जनशीलता वावरत असते, म्हणजे चालीचा मुखडा, वाद्यवृंद, कवीचे शब्द तसेच अखेरीस आपल्या समोर येणारे गायन!! या सगळ्या सांगीतिक क्रियेत, संगीतकाराची भूमिका, नि:संशय महत्वाची!! हल्ली, जरा काही वेगळे ऐकायला मिळाले, की आपण, लगेच “सर्जनशीलता” हा शब्द वापरतो आणि या शब्दाची “किंमत” कमी करतो!! हिंदी चित्रपट संगीतात, असे फारच थोडे संगीतकार होऊन गेले, ज्यांना, खऱ्या अर्थाने, सर्जनशील संगीतकार, ही उपाधी लावणे योग्य ठरेल आणि या नामावळीत, “सज्जाद हुसेन” हे नाव अग्रभागी नक्कीच राहील!! किती लोकांना, या संगीतकाराचे नाव माहित असेल, शंका आहे!!
हा माणूस, केवळ “अफाट” या शब्दानेच वर्णन करावा लागेल. प्रत्येक वाद्य, सुप्रसिद्ध करताना, त्या वाद्याबरोबर, त्या वादकाचे नाव कायमचे जोडले जाते, जसे, संतूर-शिवकुमार शर्मा, शहनाई-उस्ताद बिस्मिल्ला खान इत्यादी…… मेंडोलीन वाद्य, भारतीय संगीतात रूढ करणारे वादक, म्हणून सज्जाद हुसेनचे नाव घेणे, क्रमप्राप्तच आहे. वास्तविक हे मूळचे भारतीय वाद्य नव्हे, पण तरीही भारतीय शास्त्रीय संगीतात, या माणसाने, या वाद्याची प्रतिस्थापना केली, असे म्हटले तर ते अजिबात चुकीचे ठरू नये. दुर्दैवाने, या माणसाची प्रसिद्धी, अति विक्षिप्त, लहरी आणि अत्यंत तापट म्हणून झाली आणि त्यावरून, नेहमीच शेलक्या शब्दात संभावना केली गेली. माणूस, अतिशय तापट, नक्कीच होता परंतु संगीतातील जाणकारी, भल्याभल्यांना चकित करणारी होती.
सुगम संगीतात, नेहमी असे म्हटले जाते, गाण्याचा “मुखडा” बनविण्यात खरे कौशल्य असते!! तो एकदा जमला, की पुढे सगळे “बांधकाम” असते. या वाक्याच्या निमित्ताने, आपण, सज्जाद हुसेन यांच्या काही गाण्यांची उदाहरणे बघूया.
सुमारे ७० वर्षांच्या दीर्घ आयुष्यात केवळ १४ चित्रपट, संख्येच्या दृष्टीने, ही आकडेवारी क्रियाशील सर्जनशीलतेचे उदाहरण ठरत नाही!! परंतु, त्यामागे, चित्रपट क्षेत्रातील राजकारण, व्यक्तीचा स्वभाव इत्यादी गोष्टी अंतर्भूत आहेत. नूरजहानच्या आवाजातील “बदनाम मुहोब्बत कौन करे” हे गाणे बघूया. बागेश्री रागाच्या सावलीत तरळणारी चाल असली तरी, “बदनाम” हा शब्द जसा उच्चारला आहे,तो ऐकण्यासारखा आहे. (पुढे, सी. रामचंद्र यांनी, “मलमली तारुण्य माझे” मधील “मलमली” शब्दामागे हाच विचार केला आहे. अर्थात, हे त्यांनीच सांगितलेले आहे) कुठलेही गाणे, “आपण गाऊ शकतो” असा जर विश्वास ऐकणाऱ्याला झाला, तर ते गाणे प्रसिध्द होऊ शकते!! इथे सुरवातीला असेच वाटते, पण जसे गाणे पुढे सरकते, तशी, चालीतील अंतर्गत “ताण” कुठेच कमी होत नाही आणि स्वरपट्टी मर्यादित तारतेचीच आहे. त्यामुळे, ऐकणारा, आपली उत्कंठा ताणून धरतो!!
“भूल जा ऐ दिल” हे लताबाईंनी गायलेले गाणे बघूया. हे सुद्धा, बागेश्री रागाचीच “छाया” घेऊन वावरते. गाण्याचे चलन, द्रुत गतीत आहे पण, चाल बांधताना, शब्दांच्या मध्ये आणि शब्दांची शेवटी, चमकदार हरकती असल्याने, चाल अवघड होते तसेच काही ठिकाणी, शब्द निश्चित स्वरांवर न संपविता, त्या दिशेने लय जात आहे, असे नुसते दर्शविले आहे!! हा जो सांगीतिक अनपेक्षितपणा आहे, हेच या संगीतकाराच्या सांगीतिक क्रियेचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागेल.
“ये हवा ये रात ये चांदनी” हे गाणे बघूया. आरंभी धीम्या लयीतले आहे असा भास होतो. वास्तविक संथ लयीत गाणे नसून, कवितेच्या शब्दांची लांबी दिर्श असल्याने, त्याच्या बरोबर जाणारी अशी सुरावट असल्याने, तसा भास होतो. भैरवी रागीणीच्या छायेत वावरत असताना, आपल्या पहिल्या मात्रेस “उठाव” न देणारा ७ मात्रांचा रूपक ताल, यामुळे हे गाणे फारच सुंदर झाले आहे.
“रुस्तम सोहराब” चित्रपटातील “ऐ दिलरुबा” ऐकताना, असे जाणवते, हा संगीतकार आता अत्यंत वेगळ्या शैलीने गाणी बनवत आहे. कारण एकाच वेळी भारतीय व अरब भूमीची संगीतसंपदा जागवणारी वाटते. आवाजाचे विशिष्ट कंपयुक्त लगाव, आधारभूत घेतलेली स्वरचौकट आणि ओळीच्या मध्येच अनपेक्षितपणे वरच्या स्वरांत लय बदलणे, यामुळे सगळे गाणे अत्यंत उठावदार आणि परिणामकारक होते.
“जाते हो तो जाओ”, “तुम्हे दिल दिया”,’दिल मी समा गये सजन” ही आणि अशीच बरीचशी गाणी, “चाल” या दृष्टीकोनातून ऐकावी, म्हणजे या संगीतकाराच्या व्यामिश्रतेचे परिमाण समजून घेत येईल.
वास्तविक इतक्या अफलातून प्रतिभेचा धनी असून देखील, केवळ १४ चित्रपट, यात रसिकांचा तोटा झाला, हे निश्चित. त्यांच्या रचनांचा प्रभाव इतर संगीतकारांवर बराच होता, इतका की बरीचशी गाणी, या चालीच्याच सावलीत वावरतात किंवा त्यांचा प्रभाव टाळू शकत नाहीत. काही उदाहरणे बघूया.
१] ये हवा ये रात ये चांदनी – तुझे क्या सुनाऊ मैं दिलरुबा (मदन मोहन)
२] आज प्रीत ने तोड दे बंधन – जीवन मे पिया तेरा साथ रहे (वसंत देसाई)
३] कोई प्रेम देके संदेसा – प्रीतम तेरी दुनिया में (मदन मोहन)
४] खयालो में तुम हो – (“आह” चित्रपटात Accordion चा तुकडा शंकर/जयकिशन यांनी वापरला)
अशा सगळ्या संगीतचौर्यामुळे, सज्जाद अधिक तापट झाले, त्यातून, ही गाणी सगळी अमाप प्रसिध्द झाली आणि आपल्या “मूळ” चाली असून, आपल्याला काहीच श्रेय मिळत नाही, यामुळे मनात सतत खंत बाळगली!!
वास्तविक, हा संगीतकार मेंडोलीन वादक, मेंडोलीनवर सतारीचे सूर काढू शकणारा असामान्य ताकदीचा कलाकार. या वाद्याला प्रतिष्ठा लाभावी, यासाठी त्यांनी अमाप धडपड केली. अगदी, संगीत मैफिलीत देखील ते, फक्त रागदारी संगीतच सादर करीत. अशाच एका मैफिलीत, एका श्रोत्याने, ” ये क्या क्लासिकल बजा रहे हैं आप, कुछ लाईट म्युझिक हो जाय” अशी फर्माईश झाल्यावर, सज्जादनी समोरच्या दिव्याकडे बोट दाखवले आणि उठून नाराजीने चालू पडले!! अशा स्वभावावर काय औषध?
हाच प्रकार, हिंदी चित्रपट संगीताच्या बाबतीत घडला. संगदिल चित्रपटाची गाणी बनविणे चालू होते आणि तेंव्हा तिथे चित्रपटाचा नायक, दिलीप कुमार आले आणि त्याने काही सूचना केल्या!! झाले, ठिणगी पडली!! सज्जादने तिथल्या तिथे, “तुझ्या चेहऱ्याला ना आरोह, ना अवरोह आणि तू मला संगीताचे धडे देतोस?” आता, असे ऐकविल्यावर पुढे काय घडणार!!
कारणे अनेक देता येतील, त्यांच्या दोषांवर पांघरून घालता येईल परंतु अशा विक्षिप्त स्वभावाने, त्यांनी चित्रपट क्षेत्रात बरेच शत्रू निर्माण केले!! जेंव्हा आजूबाजूला मित्रांपेक्षा शत्रू अधिक झाले, म्हणजे त्या क्षेत्रातून बाहेर पडण्यावाचून वेगळे काय घडणार!!
– अनिल गोविलकर
Leave a Reply