एक रस्ता हवा सख्या
तुझ्या हाती हात गुंफून
अव्याहतपणे तुला शोषत राहण्यासाठी
तहानलेला भ्रमर जणू मी,
तू एक मस्तवाल मोठ्ठालं फुल
दिमाखदार नि साजर, थोडस बुजरं
एक अथांग क्षितिज हवं सख्या
अधीर अनुरक्त होऊन
कवेत सामावण्यासाठी
तू एक खगेंद्र, उंचच उंच झेप घेऊन
एकटाच मत्त दूरवर काही शोधणारा
एक थिजलेला काळ हवा सख्या
मनाच्या द्वंदातील अनंत गुज
निवांतपणे ओंजळीत देण्यासाठी
तू एक तेज:पुंज वेगाचा वारू
नजरेत फक्त अंगार शोधणारा
एक माझा जिवलग हवा सख्या
आदर, प्रेम नि उत्कटतेने परिपूर्ण
समतोल सावरण्यासाठी
मनाच्या कुपीतले हळवे भाव
अलगद अलवार टिपणारा…. सख्या!!
— वर्षा कदम.
Leave a Reply