‘सत्यनारायणाचं व्रत’ हा अनेकांच्या भक्तिभावाचा विषय तर अनेकांच्या चेष्टेचा. देवधर्म, सणवार या गोष्टींतील निरर्थक रूढींकडेच ज्यांचं लक्ष जातं, त्यांच्या दृष्टीनं हा चेष्टेचाच विषय. पण अध्यात्माच्या गूढ चर्चेत रमणाऱ्यांच्या दृष्टीनेही हे ‘काम्य व्रत ! ‘ म्हणजे कमी महत्त्वाचंच एकदा कशावरून तरी विषय निघाला आणि मी म्हटलं, ‘काही गोष्टी खरंच कळत नाहीत हं. ‘ सत्यनारायणाचा प्रसाद म्हणे, ‘सव्वा ‘च्या मापानं करायचा. म्हणजे सव्वा मापटं किंवा सव्वापाच वाट्या, सव्वा किलो… या ‘सव्वा ‘च एवढं कसलं कौतुक कळत नाही. ‘ आम्ही मनसोक्त हसत होतो. हे बोलणं ऐकणारे वडील म्हणाले, ‘अग, हा सव्वा आकडा निरर्थक नाही.
सव्वा म्हणजे किती भाग सांगू बघ.
मी म्हटलं, ‘पाच भाग. ‘
‘बरोबर, आणि सत्यनारायणाची कथा तू कुठे तरी ऐकली असशीलच.
ती पूजा कुणी कुणी केली? ‘
मला काही नीटसं आठवेना तेव्हा तेच पुढे म्हणाले,
पहिल्या अध्यायात ही एका ब्राह्मणानं केली. दुसऱ्या अध्यायात एका वाण्यानं म्हणजे वैश्यानं तिसऱ्या अध्यायात ती दोन स्त्रियांनी केली. चौथ्यात गोप म्हणजे त्या काळच्या दृष्टीनं शूद्रांनी नि पाचव्यात राजा म्हणजे क्षत्रियांनी ‘ ‘मग? ‘ मी विचारलं. चारही वर्ण आणि स्त्रिया अशा पाचही जणांना धर्माचा अधिकार देणारं हे व्रत आहे. समाजाचे हे पाचही घटक एकत्र आले तरच समाज ‘प्रसादा ‘सारखा मधुर, सुखकर होऊ शकतो. या पाच घटकांचे प्रतिक हे पाच भाग म्हणून सव्वा’ या आकड्याला महत्त्व आहे. कळलं? ‘
या व्रतात उच्च-नीच हा भेदभाव नाही. ते कुणी करावं, केव्हा करावं, कुठं करावं यासाठी कडक नियम नाहीत. एवढंच नव्हे, गोपांच्या हातून प्रसाद न घेणाऱ्या राजाला यात परमेश्वर शासन करतो. म्हणजे शूद्रांना फक्त धर्माचा अधिकारच नाही तर त्यांचा अपमान हा प्रत्यक्ष परमेश्वराचा अपमान आहे आणि नंतर त्यांच्यासह जेव्हा राजा ही पूजा करतो नि आदरपूर्वक त्यांच्याकडून प्रसाद ग्रहण करतो, तेव्हाच त्याची संकटं पुन्हा दूर होतात. सामान्य जनांचा अपमान करणाऱ्या राजसत्तेला पदभ्रष्टच व्हावं लागतं हा अर्थ यात आहे.
व्रतवैकल्यात असा गूढ अर्थ कधीकधी निरर्थक रूढीच्या रूपातून भरलेला असतो. या रूढींच्या मागचा अर्थ कळला की त्या रूढी पाळल्या गेल्या नाहीत तरी चालतं. मात्र त्यामागचा अर्थ मनात असायला हवा. हा अर्थ लक्षात घेतला नाही तर बऱ्याच गोष्टी आपल्याला निरर्थक वाटतात किंवा त्यांचा बाऊ तरी केला जातो.
समाजमनात रुजून बसलेल्या अशा व्रतवैकल्यांची नुसती चेष्टा करणारे समाज बदलवू शकत नाहीत. कारण प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून पाहण्याच्या नादात समाजाच्या मनाचा, भावनांचा त्यांनी विचार केलेला नसतो. चार बुद्धिमंतांमध्ये त्यांचं कौतुक झालं, तरी समाज त्यांना स्वीकारत नाही. अशी व्रतं आंधळेपणानं करणारे तर साधेच लोक असतात. त्यांच समाजाबद्दल, लोकजीवनातील धर्मपालनाबद्दल काही खास विचार नसतातच.
म्हणूनच आज गरज आहे ती समाजात रुजलेल्या अशा व्रतांमागचा अर्थ शोधणाऱ्या श्रद्धाशील जिज्ञासूंची! भावनांचा अनादर न करता बुद्धीला जागृत करणं ही आजची गरज आहे. आपण जे परंपरेनं करत आलो आहोत, त्यामागे आजच्या काळाला योग्य असलेला अर्थ शोधणं महत्त्वाचं आहे आणि बहुतेक वेळा हा अर्थ असतो. पूर्वी कुणी बोलावलं की कर्तव्यबुद्धीनं मी सत्यनारायणाच्या पूजेला जायची. आता श्रद्धापूर्वक जाते आणि त्याला प्रार्थना करते.
‘परमेश्वरा, तुझ्या त्या काळात समाजाचे पाच ठळक भाग होते. आता तर समाज असंख्य तुकड्यांत विभागला गेलाय. हे सगळे विभाग एकत्र येऊन समाजजीवन तुझ्या प्रसादासारखं मधुर, आनंददायी बनू दे.’ आजकाल प्रसादाच्या ‘सव्वा’ या आकड्याला मी हसत नाही.
Leave a Reply