समर्थांचे वर्णन फक्त दोन शब्दात करता येईल – विवेक आणि वैराग्य !
या दोन्ही गोष्टी त्यांच्या ठायी मुबलक होत्या.
रामनवमीला जन्मलेले रामदास स्वामी ,पूर्वाश्रमीचे ” नारायण !” आपण सहज म्हणतो – ” नराचा नारायण होणे यातच मानवी जीवनाची वाटचाल सार्थक होते.” हे तर जन्मतःच नारायण होते त्यामुळे त्यांना आणखी काही वेगळे प्रयास करावे लागले नाहीत. रोज वारंवार “सावधान”च्या पाट्या आपण चहुकडे बघत ,वाचत असलो तरीही अद्याप सावध होत नाही. त्यांच्या कानी एका मोक्याच्या क्षणी हा शब्द पडला आणि त्यांनी अखंड जीवन सावधानतेमध्ये घालवलं आणि त्यांच्या काळच्या समाजालाही सावध केलं .
नाशिकमधील बारा वर्षांच्या साधनेनंतर त्यांनी शारीरिक ,मानसिक ,बौद्धिक आणि भावनिक दृष्ट्या स्वतःला पोलादी बनवलं .स्वतःमधील एवढी गुंतवणूक पुरेशी वाटल्यावर ते डोळस यात्रेला निघाले-स्वजनांची अवस्था स्वतः बघण्यासाठी !
दुष्काळ ,अतिवृष्टी /महापूर ,यवनी हल्ले आणि त्यासाठी घरभेद्यांची होणारी कुमक यामुळे समाजवीण खिळखिळी झालेली त्यांना दिसली. पदोपदी उध्वस्त झालेलं जीवन त्यांना भेटलं. हतबल,खिन्न,घाबरट , उदासीन ,जिजीविषा गमावलेलं मन दैववादावर विसंबलेलं पाहून त्यांना नक्कीच दुःख झालं असणार . सूक्ष्म निरीक्षणाद्वारे आलेल्या अनुभवांवर आधारित त्यांनी दोन पुस्तके लिहिली – “अस्मानी सुलतानी” , आणि “परचक्र निवारण !”
त्याकाळची परिस्थिती वर्णन करणारी भारतातील संत साहित्यात केवळ ही दोन पुस्तके आहेत. दैव हा कायम मानवी नियंत्रणाबाहेरचा घटक मानला गेलेला आहे. या अनिश्चिततेचेही नियोजन करणे समर्थांना आवश्यक वाटले.
दैव शब्द दिसला की हाती पांढरं निशाण ! त्याच्याशी पंगा घ्यायचा नाही ,मैदानातून पळ काढायचा या मानसिकतेशी लढण्यासाठी समर्थांनी दोन प्रतीके निवडली – प्रभू रामचंद्र ! आराध्य दैवत ,आदर्श राजा ,आसेतूहिमाचल जनसामान्यांच्या हृदयातील श्रद्धास्थान, रावणाचा निःपात आणि यातून दुष्टांचे निर्दालन हा प्रतीकात्मक संदेश देणारा मर्यादा पुरुषोत्तम !
दुसरा हनुमंत -मारुतीराया ! तेज,भक्ती,ज्ञान ,निःस्वार्थ सेवा ,वैराग्य ,ऊर्जा यांचा संदेश देणारा रामाचा ” पहिला ” दास ! जगात खऱ्या अर्थाने दोनच रामदास फक्त होऊन गेले – पहिले मारुतीराया आणि दुसरे समर्थ !
या दोन लढवय्यांना ओळखत नाही अशी भारतीय व्यक्ती दुरापास्त. दैववादापासून परावृत्त करून लढण्यासाठी प्रवृत्त करणारे प्रभू श्रीराम आणि त्यांचा मारुतीराया म्हणजे भारतातील घराघरातील दैवते !
समर्थ रामदास नामक शल्यविशारदाने समस्या सोडविण्याचा शास्त्रोक्त आणि शिस्तबद्ध मार्ग निवडला कारण त्यांना चिरकाल उत्तर हवे होते , तात्कालिक मलमपट्टी नको होती. व्यवस्थापन क्षेत्रात आम्ही त्याला डायग्नोस्टिक जर्नी आणि रेमेडीअल जर्नी म्हणतो. देशाटन करून समाजाच्या व्याधीचे निदान तर झाले होते ,आता उपचारांचा प्रवास सुरु करायचा होता.
ना . गोपाळ कृष्ण गोखल्यांनी गांधीजींना हाच मार्ग दाखविला होता – देशाटन करून भारतीयांची दुःखे /वेदना यांना जवळून बघण्याचा ! तरच खरा भारत “आतून ” समजू शकेल. आम्हीही म्हणतो – HR is not on TOP FLOOR ! It is on shop floor !! विपणन क्षेत्रातही हीच विचारसरणी आहे – ग्राहकांच्या जवळ जा ,तरच त्यांच्या खऱ्या गरजा समजू शकतील. मग त्यानुसार उत्पादन करा.
हा निदान करण्याचा ,रोगाची लक्षणे शोधण्याचा प्रवास खडतर,खर्चिक आणि वेळखाऊ असतो आणि म्हणूनच तो टाळण्याकडे सर्वसाधारणपणे कल असतो. रामदास स्वामींनी तो हेतुपूर्वक निवडला कारण त्यांना मन,बुद्धी, आत्म्याचे शल्यविशारद व्हायचे होते. तेच त्यांचे जीवितकार्य होते.
सर्वप्रथम त्यांनी “मनावर” लक्ष केंद्रित केले. ” मनाचे श्लोक “लिहिले. हा त्यांचा अंतर्प्रवास होता. त्यांच्या भावनामयी प्रज्ञेचे ते दृश्य स्वरूप होते.
पहिलाच श्लोक त्यांनी लिहिला –
“गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा I
नमू शारदा ,मूळ चत्वारवाचा
गमू पंथ आनंत या राघवाचा II ”
पहिल्या ओळीत जनसामान्यांसाठी सोपी मूर्तिपूजा, सगुणोपासना पण दुसऱ्या ओळीत निर्गुण -निराकारचे सूचन. तिसऱ्या ओळीत विचारशक्तीची देवता -शारदेचा उल्लेख पण शेवटी विवेकी राघव आहेच. राघव जोडला गेला आहे दुसऱ्या ओळीतील निर्गुणाशी ! जागतिक साहित्यात लेखक म्हणून समर्थांचे स्थान अधोरेखित करणारी ही रचना !
दुसरी लोकप्रिय आणि प्रसिद्ध रचना म्हणजे “ दासबोध “!
समर्थांनी जेव्हा दासबोध लिहिला त्यावेळी त्यांच्या अंतरंगात नेमके कोणते भाव होते? मनातील समस्त विचार कधीच सांगितले जात नाहीत हा आपणा सर्वांचा सार्वकालिक अनुभव ! शब्दांमध्ये फार थोडं लिहिलं जातं, शेष असतं ते क्रियात्मक (कृतीतून दिसतं .) दासबोध हा कृतीशास्त्राचा मोठा दाखला.
कल्याण स्वामींसारखा एखादाच साधक साधनामार्गावर चालून समर्थांच्या मनीचे जाणून घेऊ शकतो. ज्या एका स्तरावर समर्थ होते,ती अवस्था प्राप्त करून घेतलेले साधकच दासबोध काय सांगतो ,समर्थांचं समर्थपण कशात आहे, हे जाणू शकतात.
साधकांचे तपःवैभव असे की ते फक्त दासबोधातील ओळींचा पुनरुच्चार करीत नाहीत तर त्यामागील समर्थांचे भाव पण स्पष्टपणे सांगू शकतात. कारण दासबोध लिहिताना समर्थांच्या नजरेसमोर जे दृश्य होते,ते दृश्य साधकांना समोर दिसत असते आणि इतरांना ते दाखवू शकतात. या दोन्ही रचनांमधून समर्थ “मनोविकास तज्ज्ञ ” म्हणून समोर येतात.
REBT (विवेकनिष्ठ उपचारपद्धती) चा प्रणेता अल्बर्ट एलिस ! पण त्याच्याही आधी समाजमनावर उपचार करण्यासाठी समर्थांनी हे तंत्र वापरले. डॉ. आनंद नाडकर्णी (आय पी एच , ठाणे ) त्यांच्या रुग्णांवर उपचार करताना संत साहित्याचा आधार घेतात. मग हे साहित्य सार्वकालिक /अक्षर मानायला नको कां ?
खरंतर आजच्या प्रत्येक प्रश्नाला समर्थांजवळ उत्तर आहे. वानगीदाखल काही उदाहरणे पाहू या –
अ ) लोकसंख्यावाढ – “लेकुरे उदंड झाली I तो ती लक्ष्मी निघोनि गेली II ” GDP जवळ याचं उत्तर नाही. Rate of economic growth will not control dangers of population growth ! म्हणून लोकसंख्या नियंत्रण कायद्याची आता निकड भासू लागली आहे. आज जी सूज आहे, तिचा नजीकच्या भविष्यात स्फोट होण्याची शक्यता आहे. त्याबरोबर बेरोजगारी ,निरक्षरता ,दहशतवाद ,भ्रष्टाचार या गोष्टी येतात.
ब ) निरक्षरता – एकीकडे चांद्रयान ,मिशन मंगल बाबत अभिमान बाळगणारे आपण निरक्षरतेकडे मात्र सोयीस्कर डोळेझाक करतो. अंगठा छाप भारतीयांसाठी “सर्व शिक्षा अभियान ” चालवितो. समर्थ म्हणतात-
” विद्या नाही , बुद्धी नाही ! विवेक नाही,साक्षेप (ANALYSIS) नाही !!
कुशलता (SKILLS) नाहीत , व्याप (ENTERPRISE) नाही !! ”
“विद्येविण करंटा वसे ! विद्या तो भाग्यवंत !! ”
क ) नेतृत्व – मुघल /क्रौर्य /धार्मिक असहिष्णुता /जिझीया कर याविरोधात समर्थांनी समाजाची विचारधारा बदलली . सर्वसामान्यांना “समर्थाचिया सेवका वक्र पाहे ” असा आत्माभिमान दिला. “कष्टेविण फळ नाही ” म्हणता म्हणता “रिकामा जाऊ ने दी एक क्षण ” हा संदेश दिला. “केल्याने होत आहे रे ” पासून “यत्न तो देव जाणावा ” पर्यंत नेतृत्वासाठी सक्षम अनुयायी तयार केले. “महंते महंत करावे” या शिकवणुकीत SUCCESSION PLANNING या संकल्पनेचा उगम आढळतो. MENTORING ची विचारधारा समर्थांनी प्रथम मांडली. कार्याचे वाटप (WORK DISTRIBUTION ) , साक्षेप पाहून विश्वास धरणे , ” युक्ती (STRATEGY ), बुद्धीने (COMPETENCE) भरावे (MOTIVATION) हा सल्ला नेतृत्वाच्या पायाभरणीत महत्वाचा आहे. स्वार्थी /आत्मकेंद्रित ,स्वभावतः दुष्ट ,सत्शील अशी सर्व प्रवृत्तीची माणसे आसपास असतात. तेव्हा “दोष देखोनि झाकावे I अवगुण अखंड न बोलावे I ” असेही सावध बोल समर्थांचेच आहेत. नेतृत्वाने सकारात्मक राजकारण करावे -समाजविकास ,सुरक्षा ,निर्बलांना आधार,समान संधी हे सूत्र त्यांनी मांडले. स्वतः बुद्धिवादी असल्याने त्यांनी राजकारण , समाजकारण , अर्थकारण,आरोग्य,कला,अध्यात्म अशा HOLISTIC मार्गावरून नेतृत्वाने जावे असे प्रतिपादन केले.
“जेणे जैसा निश्चय केला ! तयासि तैसाचि फळला !! ”
ही इच्छाशक्तीची महती समर्थ सांगतात तेव्हा १० टक्के इच्छाशक्तीतून १०० टक्के परिणाम मिळतात हे नेतृत्वाला समजायला हवे.
ज्याकाळी आजच्याप्रमाणे संचार साधने नव्हती, वाहतूक ,संगणक,मोबाईल ,इंटरनेट नव्हते आणि अस्मानी -सुल्तानी प्रकोप होता तेव्हा नेतृत्वाच्या पाठीवर थाप मारून “तू लढ ” अशी शिकवण रामदास स्वामींनी दिली.
समाजात सर्वकाही आहे पण आत्मकेंद्री /स्वार्थामुळे संघटन नाही, संघटन नसल्याने शक्ती नाही,शक्ती नसल्याने साहस नाही ,प्रतिकारक्षमता नाही त्यामुळे मुकाट्याने अत्याचार सहन करणे ही जीवनप्रवृत्ती झालेल्या निखाऱ्यांवरची राख त्यांनी झटकली . वाड्या -वस्त्यांवर हिंडून सापडलेले निखारे पुनःप्रज्वलित केले आणि स्वराज्य /स्वधर्माचे वन्ही पेटले.
मठांची उभारणी ,लोकसंग्रह ,व्यक्तिमत्व विकास,मठांचे जाळे ,परस्पर संपर्क शृंखला याद्वारे हळूहळू जनमानस अनुकूल होत गेले आणि शून्यातून ब्रह्माण्ड उभे राहिले.
ड ) चंगळवाद – ऋण काढून सण साजऱ्या करण्याच्या प्रवृत्तीला आजकाल आम्ही EMI कल्चर असं गोंडस नांव दिलंय. आर्थिकदृष्ट्या आपण आणि आपला देश सक्षम आहोत कां ? महागाई आणि वेस्टेजेस यांनी घेरलेले आपण -आपल्यासाठी ४-५ शतकांपूर्वी समर्थांनी लिहून ठेवलंय – ” मेळविती तितुके भक्षिती “. त्यांच्या मते “आधी प्रपंच करावा नेटका ” याचबरोबर ” आपल्या पुरुषार्थ वैभवे I बहुतांसी सुखी करावे II ” हा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा सल्लाही देतात. आपल्या शिष्यांनाही स्वावलंबी ,समाजाभिमुख बनविण्यासाठी त्यांनी ” आधी मेळवी , मग जेवी ! ” हा नियम बनविला होता, तेव्हाच ज्ञान ,सदाचार,भक्तिभाव यांनी युक्त असलेले तेजस्वी ,संस्कारी शिष्य ते तयार करू शकले.
समर्थांमध्ये शहाणीव तुडुंब होतं. ते अद्यापही प्रत्ययाला येतंय. म्हणूनच काल संदर्भयुक्त असलेला हा द्रष्टा /भाष्यकार आजही तितकाच उपयुक्त आहे. बेळगावचे सुरेश हुंदरे (पॉलीहायड्रोन -मच्छे इंडस्ट्रियल इस्टेट ) आणि मुंबईचे सुधीर निरगुडकर या दोघांनी समर्थांची शिकवण आत्मसात केली आणि आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे अंमलात आणली.
मोहनबुवा रामदासींना मी विचारलं होतं – ” समर्थ मार्ग एका वाक्यात सांगू शकाल कां ?”
ते म्हणाले होते- ” सोप्पा आहे. कर्म ⇒ साधना ⇒ ज्ञान ⇒ मोक्ष !”
पण मोक्षानंतर संत थांबत नाहीत. त्यांचे अनुभव त्यांच्या लिखाणातून , शिकवणुकीतून समाजाला कळावे म्हणून ते अहोरात्र जगतात /जागतात. जगातील अध्यात्मिकता जिवंत ठेवतात. म्हणून समर्थांवर पी एच डी करणारे, लेख लिहिणारे ,पुस्तके लिहिणारे दिवसेंदिवस वाढताहेत. मराठी ,हिंदी ,इंग्रजी ,बंगाली ,तमिळ ,गुजराथी , तेलगू ,कन्नड,आणि उर्दू भाषांमध्ये आजवर समर्थांवर लेखन झालेले आहे.
संत हे समाजाचे HR Managers असतात.
उद्या Artificial Intelligence , Internet of Things, Machine Learning आणि Industry ४. ० सारखं तंत्रज्ञान येऊ घातलंय.
मनोकायिक समस्या वाढीला लागणार आहेत , ताण -तणाव , आत्महत्या , मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन इत्यादी समस्या असतील. Anxiety , Depression, दूषित होणारं कौटुंबिक /सामाजिक /राजकीय पर्यावरण पुन्हा आपल्याला समर्थांकडे नेणार आहे.
थोडक्यात काय तर समर्थांची आजपेक्षा अधिक गरज उद्या भासणार आहे. बलोपासना ,शारीरिक /भावनिक/मानसिक/अध्यात्मिक गरजांचा समतोल ,धार्मिक असहिष्णूता सगळ्यांना सावरणारे भक्कम हात रामदास स्वामींचेच असतील. त्यांचं प्रयोजन ,अस्तित्व कालजयी आहे.
प्रश्न आहे तो आपण कोण आहोत – ऊर्जेचे दीपस्तंभ की कचऱ्याची कुंडी?
सर्वांना ज्ञानाचा प्रकाश ,कृतीचा आनंद वाटण्यात समर्थ कधीच भेदभाव करीत नाहीत. आपण काय करू शकतो किंवा काय नाही हा कधीच आपल्या क्षमतांचा प्रश्न नसतो. असलाच तर तो आपल्या समजुतींचा असतो. Walk the Talk ( बोले तैसा चाले ) वर ठाम विश्वास असणारे रामदास स्वामी सदैव क्षमतांवर विश्वास ठेवतात. दासबोधात नुसती शिष्यांच्या प्रश्नांना उत्तरे नाहीत तर अनेक FAQs आहेत ज्याला समर्थांनी स्वतः उत्तरे दिली आहेत. आणि अर्थातच आपण त्यांचा वापर करू नये अशी समर्थांची इच्छा खासच नसणार. “आनंदवन भुवनी ” हे त्यांचे स्वप्न साकार करायचे आहे.
मित्रांनो, खिडकीतून आभाळाचा तुकडा दिसतो,तद्वतच दिलेल्या वेळात मी समर्थ रामदास स्वामी नामक अवकाशाचा एक तुकडा दाखविण्याचा प्रयत्न केला. माझी खिडकी नक्कीच तोकडी असेल. पण बाहेर मोकळ्या हवेत जाऊन पाहिलंत तर हे अवकाश किती विस्तीर्ण ,अथांग ,सर्वव्यापी आहे याची तुम्हांला कल्पना येईल.
जय जय रघुवीर समर्थ !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply