मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले त्यात राम कदम यांचे स्थान वरचे आहे. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९१६ रोजी मिरज येथे झाला. राम कदम यांच्या घरात कलेचं काहीही वातावरण नव्हतं, परिस्थिती यथातथाच, शाळेतील अभ्यासातही लक्ष नव्हते. त्यांना लहानपणापासून वाद्यांबाबत फार आकर्षण होतं यामुळे राम कदम यांच लक्ष कायम बॅंन्डपथकाकडे जायचं. इथेच ते क्लॅरोनेट वाजवायला शिकले. पुढे पथकात वाजवू लागले. प्रभात चित्र संस्थेचे छायाचित्रकार ई.महमद मूळचे मिरजेचेच. त्यांनीच राम कदम यांना पुण्याला बोलावून घेतलं. वयाच्या २२ व्या वर्षी राम कदम प्रभातमध्ये दाखल झाले ऑफिसबॉय म्हणून!
पगार महिना ७ रुपयेप्रमाणे सेवा सुरू झाली. शांतारामबापूंची खोली झाडताना राम कदम यांना कमीपणा कधीच वाटला नाही. उलट एवढय़ा प्रतिभासंपन्न व्यक्तीची सेवा करण्याची संधी मिळतेय याचा आनंद झाला. हळूहळू प्रभातच्या संगीत विभागात त्यांचा प्रवेश झाला आणि मान्यवर संगीतकाराचा त्यांना सहवास लाभला. प्रभात चित्र संस्था आदर्श विचार मूल्यांवर चालणारी होती त्यामुळे इथे जे घडत असे ते पवित्र, सर्वोत्कृष्ट आणि चिरंतन टिकणारे असायचे. राम कदमांच्या आयुष्यातील ही १० वर्षे त्यांच्यातील कलावंताला घडवणारी होती. इथेच त्यांना पु. ल. देशपांडे, देव आनंद, गुरुदत्त यांचा सहवास लाभला, पण स्वातंत्र्यानंतर प्रभातचाही उतरणीचा कालखंड सुरू झाला. राम कदम प्रभातमधून बाहेर पडल्यावर त्यांना कोल्हापूरहून भालजी पेंढारकर यांनी बोलावले.
गांधीहत्येनंतर भालजींचा जयप्रभा स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला व त्यावेळी ‘मीठ भाकर’ या चित्रपटाची प्रिंटही भस्मसात झाली. भालजी यांनी तो सिनेमा परत बनवला. त्याचं संगीत राम कदम यांचं होतं! (पण पूर्वीच्या शर्थीनुसार संगीतकार म्हणून कशाळकर यांचेच नाव श्रेयनामावलीत राहिलं!) रामभाऊ नाराज झाले, पण लवकरच त्यांना ‘गावगुंड’ हा सिनेमा स्वरबद्ध करायला मिळाला. पण सुरुवातीची १० वर्षे कदमांची परीक्षा पाहणारी ठरली. यश कायमच हुलकावणी देत होतं. नशिबाचे फासे कायमच उलटे पडत होते. सुधीर फडके, वसंत पवार यांच्याकडे सहायकाचं काम चालूच होतं. १९५९ सालच्या अनंत मानेच्या ‘सांगते ऐका’तील ‘बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला’ ही फक्कड लावणी रामभाऊ कदम यांनी स्वरबद्ध केली होती. पण ही कामगिरी सहाय्यकाच्या रूपातली असल्याने रसिकांना उशिरा लक्षात आली.
‘पिंजरा’, ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘झुंज’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘पाहुणी’, ‘सुशिला’, ‘पारध’, ‘गड जेजुरी जेजुरी’ अशा कित्येक संगीतमय चित्रपटांची देणगी मराठीला मिळाली ती केवळ राम कदम यांच्यामुळे. त्यांच्या संगीतामुळे अनेक चित्रपट तरले, विक्रमी ठरले. मराठी लावणीचे लावण्या खुलवून राम कदम यांनी तिला एका उंचीवर नेऊन ठेवलं. मायबाप रसिकांनी दिलेली ‘लावणी सम्राट’ ही बिरुदावली अभिमानाने मिरवली. कलाकाराला आयुष्यात किमान एक संधी अशी मिळते की जिचे तो सोने करुन जातो. राम कदम यांनी जवळपास १२० मराठी चित्रपटाना संगीत दिले. यात त्यांनी तब्बल ११४ गायकांना संधी दिली. यात लता मंगेशकर, आशा, उषा, मोहम्मद रफी, पं.भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, शोभा गुर्टू , मन्ना डे आदी मान्यवरांचा सहभाग आहे.
बाजीराव मस्तानीच्या पिंगा गाण्याबाबत पानीपतकार विश्वास पाटील यांनी या गाण्याबाबत एक नवा मुद्दा समोर आणला होता. तो म्हणजे, मुळात ‘पिंगा ग पोरी पिंगा…’ याची चाल प्रसिद्ध मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधली आहे. पिंगा.. ही चाल मूळ मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधलेली असून त्यांनी संगीतबद्ध केलल्या तीन चित्रपटांतील गाण्यांत त्यांनी ही चाल वापरली असल्याचे विश्वास पाटील म्हणाले. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६२ सालचा अनंत माने दिग्दर्शित भाग्यलक्ष्मी, १९७५ सालचा व्ही शांताराम प्रोडक्शनचा चंदनाची चोळी अंग अंग जाळी आणि १९७६ साली अनंत माने दिग्दर्शित पाहुणी या चित्रपटांतील गाण्यांत राम कदमांनी ही चाल वापरली होती.
श्री.मधु पोतदार यांनी ‘संगीतबद्ध राम कदम’ या नावाने मा.राम कदम यांचे पुस्तक लिहिले आहे. या संगीतकाराच्या संपूर्ण कारकीर्दीचा तपशीलवार आढावा त्यात घेतला आहे. मा.राम कदम यांचे १९ फेब्रुवारी १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply