जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेत्रेचाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार….भाग एक
आयुर्वेद म्हणजे फक्त आरोग्यच नाही. तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. त्यामुळे जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते सर्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे, हे दिनचर्येमधे सांगितले आहे. सकाळी आह्निके आटोपून, शुचिर्भूत होऊन, मग आपला धन मिळवण्यासाठी जो धंदा नोकरीउद्योग आहे तो करावा. कारण दीर्घ आयुष्य असले तरी जवळ धन नसेल तर, असे आयुष्य निंदीत मानले आहे. समर्थ रामदास स्वामी देखील सांगितात, प्रपंची पाहिजे धन !
धन कसे मिळवावे, हे पण पुढे वर्णन केले आहे. जी क्रिया सर्व सामान्य लोक वाईट किंवा निंद्य समजत नाहीत, असा उद्योग निवडावा. म्हणजे अभिमानाने सांगता येईल असा मार्ग असावा. चोरी करून कुणाची फसवणूक करुन, लबाडीने धन अपहार करून, विना श्रमाचा पैसा हा कधीही यशदायी होत नाही. काम कोणतेही असूदेत, त्यातुन आनंद आणि समाधान मिळाले पाहिजे. आपण करीत असलेल्या कामावर आपल्या घरचे खुश असले पाहिजेत.
वाल्या कोळी लोकांना लुटुन धन मिळवून आपल्या कुटुंबाची काळजी घेत होता, पण जेव्हा नारदमुनींच्या सांगण्यावरून, मी करीत असलेल्या अर्थाजनात तुम्ही आनंदी आहात का, असे जेव्हा बायको मुलांना विचारले, तेव्हा त्यांनी नाही म्हणून सांगितले. नंतरच वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषि झाले. यावरून हेच शिकायचे आहे की माझा उद्योग व्यवसाय हा समाजाभिमुख असावा. जुगार, मटका, सट्टा, बेटींग, लाॅटरी,अशा मार्गाने मिळवलेला पैसा हा कधी आरोग्यप्राप्ती करून देत नाही. असा पैसा मिळवताना मनामधे पाप भावना निर्माण होते. ती व्हावी. त्याआधी पाप ही संकल्पना मनात रुजायला हवी. पापपुण्याची व्याख्या करताना, तुकाराम महाराजांनी देखील सांगून ठेवले आहे, पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा.
शेती, वस्तूविक्री, गोपालन, गुणी राजाच्या आश्रयाने नोकरी, स्वतःचा व्यवसाय, अथवा बलुतेदारीने चालत आलेला व्यवसाय निवडून अर्थार्जन करावे. शक्यतो जो व्यवसाय आपण लहानपणापासून पाहात आलो आहोत, त्यातील सर्व खाचाखोचा अनुभवाने पाहिलेल्या असतात. पण काही कारणानी, काळानुरुप, व्यवसायात बदल करणे अपेक्षित असेल तर जरूर करावा. काही व्यवसाय आता लुप्तच होत चालले आहेत, जसे कल्हई लावणे. तांब्या पितळीची भांडीच मोडीत काढायला सुरवात केल्यावर कल्हईचे महत्त्व कमी झाले. आता पुनः लक्षात येत आहे की, कल्हई केलेल्या भांड्यातील जेवण जोपर्यंत सुरू होते, तोपर्यंत मधुमेह स्वयंपाकघरात आला नव्हता.
आता पुनः कल्हई लावणे, हा व्यवसाय म्हणून स्विकारायची वेळ लवकरच येणार आहे. फक्त गोऱ्या चामडीच्या लोकांनी, हे सांगण्याची वाट बघितली जातेय एवढंच !
कालाय तस्मै नमः दुसरं काय !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
Leave a Reply