संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद प्रियायाः ॥
संदेशं मे हर धनपतिक्रोधविश्लेशितस्य ।।
गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां ।।
बाह्योद्यानस्थितहरशिरश्चंद्रिकाधौतहर्म्या ।।
गद्यार्थ– हे मेघा, संतप्तांचा, व्यथितांचा तू निवारा आहेस. स्वामींच्या शापामुळे मी माझ्या सखीचा विरह फार कष्टाने सहन करतो आहे. तेव्हा माझा निरोप तेवढा माझ्या प्रिय सखीला पोहोचवण्याची विनंती तुला करतो आहे. तुला यक्षांच्या अलकानगरीमध्ये जायचे आहे. तिच्यामधले महाल, वाडे, बाहेरच्या उद्यानात असलेल्या शंभूशीर्षांवरील चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघाले आहेत.
(पूर्व मेघ-श्लोक ७वा, वृत्त – मंदाक्रांन्ता )
पर्यटन विशेषांकासाठी संस्कृत साहित्यातील मेघाचा रामगिरी ते अलका व्हाया उज्जैन असा प्रवास किंवा रघुवंशातील रामाने सीतेसह वानर आदींचा घडलेला लंका ते अयोध्या प्रवास या दोन विषयांबाबत काही लिहाल का? अशी विचारणा झाली. त्याला पूर्वी कधीतरी मीच उल्लेख केलेल्या डॉ. भावे आणि डॉ. सोहोनी यांच्या सदीप व्याख्यानाच्या स्मृतीची पार्श्वभूमी होती पण मग मी म्हटलं, त्या प्रवासांवर स्वतंत्र पुस्तके प्रकाशित झाली आहेत तेव्हा त्यापेक्षा एकूणच संस्कृत साहित्यात वेगवेगळ्या कारणांनी जे प्रवास घडलेत, ज्याची वर्णने येतात आणि त्या प्रवासांचे काही वेगळे वैशिष्ट्य किंवा महत्त्वही त्या त्या ठिकाणी दिसते, अशा प्रवासांबाबत लिहू का? असा एक जनरल लेख म्हणजे त्या प्रवासांची माहिती लोकांना होईल. यावर होकार आल्यामुळे हा धावता आढावा संस्कृत साहित्यातल्या प्रवासाचा – अर्थात यथाशक्ती!
वेदपुराण काळातील प्रवास
वेदकाळी माणूस हा एके ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरीत होणाराच होता. त्यामुळे जरी तो हळूहळू संपन्न प्रदेशात स्थिरावू लागला असला तरी फिरण्याचे, प्रवास करण्याचे लाभ त्याला कळले असल्यामुळे ‘चरैवेति चरैवेति चराति चरतो भगः’ – फिरत राहा, फिरत राहा, फिरणाऱ्याचे, चालणाऱ्याचे भाग्य फिरते/चालत राहते हा त्याच्या जीवनाचा मूलमंत्र होता.
व्यापार उदीमाच्या निमित्ताने तो प्रवास करीत असे. ऋषिमूनी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात देवकार्यासाठी व तपश्चर्यादी करण्यासाठीही जात असत. म्हणजे त्यांचा प्रवास कधी जगाचिया सुखोद्देशे असे तर कधी स्वान्त सुखाय! अगस्ति हे असे ऋषी होते ज्यांनी उत्तरेत राहणारे असूनही दक्षिणेतील लोकांच्या हितासाठी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिण दिशेला प्रस्थान ठेवले आणि नंतर कायमचे ते दक्षिणदेशवासी झाले. विश्वामित्र ऋषी प्रवास करीत असताना वाटेत आलेल्या विपाशा आणि शनुद्रि अशा दोन नद्यांना पलीकडे जाण्यासाठी त्यांनी मार्ग द्यावा म्हणून विनवतात. असे वर्णन ऋग्वेदातील विश्वामित्र – नदीसंवाद सूक्तात येते. म्हणजे वेदकालीन ऋषींना ‘प्रवास’ ही नित्याची बाब होती. रामाकडून पराभूत झालेले परशुराम अयोध्या मिथिला हा प्रांत सोडून महेंद्र पर्वताकडे जातात. तेही असाच प्रवास करून. अर्थात सकाळचा प्रवास हा प्रामुख्याने पायी प्रवास असे.
प्रवास रामलक्ष्मणांचा आणि इतरांचा
कधी कधी काही विद्यार्थी शिक्षणाच्या सोयीसाठी एका ऋषींच्या आश्रमातून दुसऱ्या ऋषींच्या आश्रमातही जात असत. ‘उत्तररामचरितम्’ मधील तापसी आत्रेयी ही वाल्मिकींच्या आश्रमातील शिकवणे – लवकुशांच्या बुद्धीच्या वेगाने आत्मसात करता येईनासे झाल्यावर आपले शिक्षण थांबू नये म्हणून वाल्मिकींच्या आश्रमातून प्रवास करत दण्डकारण्यातील अगस्त्याश्रमात येताना दिसते. रामलक्ष्मण विश्वामित्रांबरोबर राक्षसांच्या नाशासाठी जातात खरे पण त्यांचा जो अयोध्या ते सिद्धाश्रम, सिद्धाश्रम ते मिथिला असा सगळा प्रवास होतो तो त्यांना त्यांच्या राज्याच्या सीमा दाखवणारा, आसपासच्या प्रांतांच्या इतिहास व भौगोलिक परिस्थिती यांचे ज्ञान करून देणारा ठरतो. प्रत्यक्ष रावणाची गाठ पडण्यापूर्वी ताडका, मारिच, सुबाहू अशा त्याच्या अनुचरांशी गाठ घालून देणारा ठरतो. त्यातून सहजपणे त्या राजपुत्रांचे प्रबोधन होते. त्यांना प्रत्यक्ष राज्यकारभार करण्यापूर्वी राज्यातील व राज्याबाहेरील परिस्थितीची जाणीव होते.
अहल्या आणि ताडका दोन स्त्रिया. दोघी अपराधीच पण एकीचा अपराध क्षम्य आणि दुसरी वधास पात्र हेही या प्रवासामुळे, प्रवासात लाभलेल्या विश्वामित्रांसारख्या समर्थ मार्गदर्शकामुळे कळते. प्रवासातील निरीक्षण आणि प्रवासातला मार्गदर्शक नेहमी माणसाला अनुभवसमृद्ध करून जातात, परिपक्व बनवतात त्याचाच प्रत्यय रामलक्ष्मणांच्या विश्वामित्रांबरोबरच्या प्रवासातून येतो.
पुढे वनवासात सीतेसह प्रवास करत असताना रामलक्ष्मणांना विश्वामित्रांबरोबर प्रवास करताना मिळालेली ज्ञानाची शिदोरी उपयोगी पडतेच त्याशिवाय उपयोगी पडतात ती त्या प्रवासात त्यांना लाभलेली अस्त्रे, बला, अतिबलासारख्या विद्या. या सगळ्याच्या सहाय्याने ते विराध, कबंध आदिंना शासन करू शकतात. जटायू, सुग्रीव, संपाती यांना जवळ करू शकतात. यावेळी त्यांचा प्रवास रानावनातून वाटा काढीत पायी होतो किंवा गंगा इ. नद्या पार करताना नावेतून होतो. पुढे लंकेत जाताना तर या प्रवासाला साहाय्यभूत होणारे सेतूसारखे माध्यमही राम वानरांच्या सहाय्याने निर्माण करतो व लंकेत पोहोचतो. उपलब्ध वाहनांनी व साधनांच्या सहाय्याने प्रवास सारेच करतात पण साधन उपलब्ध नसताना ते निर्माण करणंही संस्कृत साहित्यातल्या प्रवासात घडताना दिसतं. शेवटी लंकाविजयानंतर राम लंकेहून अयोध्येकडचा प्रवास करतो तो मात्र अगदीच वेगळ्याच वाहनाने !
अयोध्या ते लंका पूर्वी पायी आणि नावा इ. तून आलेला शेवटी कुबेराच्या पुष्पक विमानातून प्रवास करतो आणि तो प्रवास करताना खाली दिसणाऱ्या स्थळांचे तो रसभरीत वर्णन सीतेसह साऱ्या वानरांना ऐकवतो. त्यामुळे त्याचा हा प्रवास वेगळेपणाने कळतो. या त्याच्या प्रवासाचे वर्णन रघुवंश आणि महावीरचरित अशा दोन वेगळ्या रचनांमध्ये वेगवेगळे आढळते. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. कारण कालिदास आणि भवभूति अशा दोन प्रतिभावान लेखकांच्या अलौकिक प्रतिभेतून ते निर्माण झाले आहे. आपण समुद्रावर बांधलेला सेतू त्या समुद्राचे पार मलयपर्वतापर्यंत असे दोन भाग करतो आहे की जणू आकाशगंगेने शरदऋतूच्या शोभेलाच दोन भागात विभागले आहे. असे अलौकिक वर्णन राममुखाने कालिदासाने केलेले दिसते. आणि भवभूतीचा लक्ष्मण त्याच सेतूचे वर्णन ‘रामाच्या चरित्राचा अभूतपूर्व असा कीर्तिस्तंभ असे करतो.
रामायणात वाल्मिकींनीही रामाच्या तोंडून अयोध्या ते लंका या दरम्यानच्या वेगवेगळ्या स्थळांचे वर्णन केले आहे. विजेसह मेघ असावा तसा सुवर्णमय धातूंनी युक्त ऋष्यमूक असे अलंकारिक वर्णन इथे आढळते.
कृष्णाचा प्रवास
रामाचा प्रवास आबाल्यात् झाला हे खरे पण कृष्णाचा तर तो पार जन्मापासूनच झाला असे दिसते. जन्मताच त्याला वसुदेवाने कंसापासून वाचवण्यासाठी मथुरा ते गोकुळ असा प्रवास घडवला. तो प्रवास थोडा जमिनीवर तर बाकी तुफान वेग धारण केलेल्या नदीतून पायी! Travel For Survival असा तो प्रवास होता. त्यानंतर पुन्हा कंसाच्या बोलवण्यानंतर अक्रुराबरोबर रथातून केलेला प्रवास हा Travel For Victory असा होता. हा प्रवास खूप सुखात/ सुखाचा झाला. पुढे पुन्हा जरासंधाचा ससेमिरा चुकवण्यासाठी बलराम व कृष्णांनी केलेला प्रवास मथुरा ते करवीरपर्यंतचा, पुढे गोमंतक पर्वतापर्यंतचा, पुढे मथुरा ते द्वारका हा प्रवास आणि त्यानंतरचा कृष्णाचा कालयवनाला मृत्यूच्या दाढेत नेवून सोडण्यापर्यंतचा एकट्याचा पायी प्रवास हे सारे प्रवास Travel For Survival प्रकारातलेच !
शंकराचार्यांचा प्रवास
ज्ञान मिळविण्यासाठी, दुर्जननाशासाठी हे प्रवास अनेक घडलेले दिसतात पण केवळ ज्ञान मिळविण्यासाठी नाही तर त्या ज्ञानाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी, वैदिक धर्माचा अस्त्यंगत होत चाललेला असताना तो पुनरूज्वीवित करण्यासाठी घडलेल्या प्रवासाचे वर्णन संस्कृत साहित्यात आढळते. ते आदि शंकराचार्यांच्या जीवनचरित्रातून ! केरळहून नर्मदेपर्यंत ज्ञान मिळविण्यासाठी प्रवास करणाऱ्या आचार्यांनी उऱ्यापुऱ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम असा चहूदिशांना प्रवास करत अद्वैत तत्वज्ञानाचा प्रवास केला, चार दिशांना ४ पीठे स्थापन केली, त्या पीठांना राजाश्रय आणि लोकाश्रय दोन्ही मिळेल अशाप्रकारे प्रयत्न केले – त्यांच्या या प्रवासाचे तपशील वाचताना मन थक्क होते. त्यांच्या शरीरशक्तीबरोबर मनःसामर्थ्याचे देखील दर्शन त्यातून होते.
एक आगळा प्रवास
रसिकहो, संस्कृत साहित्यातले असे वेगवेगळे प्रवास सांगायचे तर एका लेखात ते मावणार नाहीत. त्यामुळे मेघदूतातला जो यक्षाने मेघाला सांगितलेला त्याचा नियोजित प्रवास आहे, तो बघून आपण थांबणार आहोत. हा प्रवास अन्य प्रवासांसारखा प्रत्यक्ष झालेला नाही. स्वतःच्या पत्नीपासून दूर असलेल्या एका प्रेमिक यक्षाची इच्छा आहे, की दूरदेशी राहणाऱ्या आपल्या पत्नीला निरोप मिळावा आणि तो निरोप पाठवायचा तर कुणी वेगाने तिकडे जाऊ शकणारा हवा अशा मनस्थितीत त्या दिशेला सरकरणारा एक मेघ त्याला दिसतो, तेव्हा त्या मेघाने आपल्यासाठी रामगिरी ते अलका असा दीर्घ प्रवास करावा असे यक्षाला वाटते आहे. त्यामुळे तो त्या प्रवासाचा मार्ग, मार्गात टप्पे, मेघाला भेटू शकणारे, सुखवू शकणारे सहप्रवासी, त्याला कंटाळा न येऊ देणाऱ्या गोष्टी सर्वांचे वर्णन अशा रसभरीत मेघदूतात करताना प्रत्यक्ष दिसतो. कुणीच जात नसलं तरी त्या वर्णनातली ताकद अशी आहे की आपल्यापैकी प्रत्येकजण त्या मार्गाने प्रवासाला निघतो. मेघाने सांगितलेले अनुभव घेऊ शकतो. म्हणूनच संस्कृत साहित्यातला हा अनोखा प्रवास आहे. प्रत्यक्ष न करताही केल्याचा आनंद देणारा! म्हणून तर या प्रवासाची खुमारी स्वतःच्या मालकीचे विमान असणाऱ्या प्रयोगशील पुणेकर असणाऱ्या डॉ. भावे यांनी – प्रत्यक्ष मेघ जसा आकाशमार्गे प्रवास करेल तसा प्रवास करून कालिदासाने वर्णन केलेल्या या प्रवासातील आनंदाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यांच्यामुळे संस्कृत साहित्यामधल्या एका अनोख्या प्रवासाचा परिचय रसिकांना झाला होता.
उपसंहार
रसिकहो, संस्कृत साहित्यातल्या या साऱ्याच प्रवासांकडे बारकाईने पाहिले तर जाणवतं की हे सारे प्रवास त्या त्या माणसांना वेगवेगळे ऐहिक आणि भावनिक लाभ करून देणारे ठरले. रामकृष्णांना या प्रवासांनी जगरहाटीचं ज्ञान दिलंच पण समाजमनात स्थानही दिलं. मनासारख्या पत्नी दिल्या, जिवाला जीव देणारे मित्र दिले. कुणाचे प्रबोधन प्रवासामुळे झाले तर कुणाचे निसर्गाशी नातेही प्रवासामुळेच अतूट झाले. आचार्यांनी तर वैदिक धर्माचा डिंडिम आपल्या प्रवासाच्या सहाय्याने सर्वत्र पोहोचवला. या सर्वांना आपापले प्रवास असे सफल, यशस्वी करता आले. कारण त्यांनी त्यांचं मन, बुद्धी आणि डोळे सतत जागे ठेवले. आजही प्रवास करताना सारे वडीलधारे आपल्याला हेच सांगतात ना! त्यामुळे लेख संपवता संपवता मला एक कविता आठवते आहे, प्रवास या विषयावरची! त्यात म्हटलं आहे
प्रवास आयुष्याचा
हे जन्ममृत्यूचक्र
तयाची असे गती
विचित्र आणि वक्र
पाथेय प्रवासाचेवि
विवेक आणि नीति
प्रवासाचे दोघेही
फलित ठरविता !!
मला वाटतं आपणही विवेक आणि नीति या दोन गुणांना आत्मसात करू या म्हणजेच डोळे, मन, बुद्धी सारं जागं ठेवू या, म्हणजे मग संस्कृत साहित्यातल्या प्रवासांसारखाच आपला आयुष्याचा प्रवासही सफल, सुफल होईल.
डॉ. अंजली पर्वते
(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply