सरस्वतीबाई राणे ऊर्फ सकीना यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी ४ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला.
ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले व त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. परंतु ताराबाईंच्या मातापित्यांचा ह्या विवाहास विरोध असल्यामुळे अब्दुल करीम खाँ व ताराबाईंना संस्थान सोडावे लागले.
त्यांनी मुंबईत संसार थाटला व यथावकाश पाच अपत्यांना जन्म दिला. त्यांच्या दोन पुत्रांची नावे सुरेश उर्फ अब्दुल रहमान व कृष्ण ही होती; तर मुलींची नावे चंपाकली, गुलाब आणि सकीना उर्फ छोटूताई अशी होती. पुढे ही भावंडे अनुक्रमे सुरेशबाबू माने, कृष्णराव माने, हिराबाई बडोदेकर, कमलाबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे या नावांनी प्रसिद्धीस पावली.
उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांच्याकडून सुरू झालेली किराणा घराण्याची परंपरा पुढे सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, कमलाबाई बडोदेकर या भावंडांनी समर्थपणे सुरू ठेवली. त्यांनी किराणा घराण्याला अनेक दिग्गज गायक दिले. संगीत एकच प्याला..संशय कल्लोळ..संगीत सौभद्र या मराठी संगीत नाटकात सरस्वतीबाई राणे यांनी कामे केली होती. ख्याल गायिकेतील जुगलबंदीची सुरवात सरस्वतीबाई राणे यांनीच केली होती.
मराठी चित्रपट ”पायाची दासी” मध्ये महिला पार्श्वगायिका म्हणून सरस्वतीबाई राणे यांनी गाणी गायली होती. १९४३ मध्ये प्रदर्शित झालेल्या निर्देशक विजय भट्ट यांच्या ”रामराज्य” या चित्रपटातील सरस्वतीबाई राणे यांनी गायलेली गाणी खूपच लोकांना आवडली होती. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताप्रमाणेच मराठी-हिंदी चित्रपटांसाठी पार्श्व९गायन, भावगीत गायन, संगीत रंगभूमीवर अभिनय असे त्यांचे विविधांगी कर्तृत्व होते. गायिका मीना फातर्पेकर यांच्या त्या आजी होत. सरस्वतीबाई राणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर वर्षी पुरस्कार देण्यात येतो.
सरस्वतीबाई राणे यांचे निधन १० ऑक्टोबर २००६ रोजी झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply