(१) काल कौशल इनामदारांचे “कौशलकट्टा ” बघत/ऐकत होतो. त्यांनी ठाण्यातील एक हृद्य प्रसंग सांगितला- एका संगीत विषयक कार्यक्रमात ते गेले असताना एक गाजलेले वृद्ध संगीतकार त्यांच्या शेजारी येऊन बसले. त्यांनी इनामदारांना विचारले-
“हा स्टेज वरचा गायक सुरात गातोय ना?”
कौशलने होकार दिला.
” काही नाही, आजकाल सगळंच बेसुरं ऐकू यायला लागलं आहे.”
(२) काल मला ” मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेयर्स च्या” वतीने मला एक मेल आली- ” सिटीझन पर्सेप्शन सर्व्हे २०२२” मध्ये सहभागी होऊन ” तुमच्या शहरातील जीवनाची गुणवत्ता ” या विषयावर प्रश्नावलीची उत्तरे द्या. मी उत्सुकतेने माझी प्राथमिक माहिती भरली आणि प्रश्नावलीकडे वळलो. मी राहतो त्या शहरातील वाहतूक, शिक्षणाची सोय,नोकऱ्यांची उपलब्धता, गृहविषयक समस्या, कचरा-केर आणि स्वच्छतेची पातळी याविषयीचे माझे प्रतिसाद त्यांना हवे होते. व्यक्तिशः मला वरील कोणत्याही विषयांबद्दल तक्रार नसली तरी सगळ्याच बाबतींमधील रोजचे अनुभव (वाहतूक कोंडी टाईप, घरांच्या आवाक्यात नसलेल्या किंमती, शाळा-महाविद्यालयांमधील फिया, नोकऱ्यांची वानवा) माझ्या नजरेतून नकारात्मकतेकडे झुकत होते. “इझ ऑफ लिविंग ” मध्ये खरे गुणांकन करायचे तर पंचाईत ! मी सर्वेक्षण अर्धवट सोडले. बऱ्यापैकी नावाजले गेलेले पुणे माझ्याकडून अन्यायी (?) गुणांकनामुळे यादीत उगाच खाली घसरले असते. मावळतीमुळे अपेक्षा उंचावतात पण “दिसणं ” मंदावत असेल का ?
(३) आज संकष्टी म्हणून प्रभात फेरीला निघून गणपती मंदिरात जात होतो. शेजारून एक वयस्क गृहस्थ काहीतरी पुटपुटत गेले. पाठमोरी मूर्ती ओळखीची वाटली आणि उजेड पडला- अरे, गेली ८-१० वर्षे खड्या सुरात अथर्वशीर्ष, हनुमान चालीसा म्हणत झपाझप चालणारे हेच कि ते ! आता गती आवाक्यातील संथ आणि स्वर खोल गेलेला ! मावळती याही इंद्रियांवर आली की काय?
(४) मंदिरातील आरती च्या वेळी गुरुजी माझ्याकडे शंख घेऊन आले. दर संकष्टीला शंख वादनाचा प्रघात आहे. आज तो मान मला मिळावा अशी त्यांची इच्छा होती. मी खुणेनेच नकार दिला. माझ्या कंठात आता ते बळ नाही. शेजारील तरुणाने त्रिभुवनाला गवसणी घालेल असा शंखनाद केला आणि माझ्याकडे नजर टाकली. मी आशिर्वादाचं हसलो.
मोठ्यामोठ्याने आरती,सोबत शंखनाद तरीही एक सदगृहस्थ विचलित न होता शांतपणे मंदिराला प्रदक्षिणा घालत होते. भोवतीच्या गल्बल्यापासून अलिप्त !
अपरिहार्य मावळतीचा मोठा धडा त्यांच्याकडून मला मिळाला.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply