पंचामध्ये मोठा पंच
गावगाडा सरपंच
सरकारचा दूत जसा
प्रश्नपत्रिकेचा संच!
घडो काहीबी गावात
बोला म्हणे सरपंच
लोकांचे धरी धनुष्य
आपला तुटतो प्रपंच!
बोलणे खातो तसाच
टवाळी विषय होतो
दिसली कडक टोपी
म्हणती माल हाणतो!
आरोपीच्या पिंजऱ्यात
रोजच खडा असतो
मतदानाच्या बुथवर
विरोधी राडा असतो!
आली जर का योजना
भोवती गराडा असे
निघली त्यांची बिले
आभाळी बघत बसे!
खरं बोलायला जावा
शहाणा झाला म्हणती
खोटं बोलायच तर
पंचायत मोठी होती!
तोंडदाबी बुक्की मार
घरावर तुळसीपत्र
शेंबडे पोर देते दम
मग मुळव्याधी सत्र!
नळ बघा, घाण बघा
मिटवा त्यांची भांडणं
नको नको म्हणताना
गळा आयोग लोंढणं!
हापशावरची चर्चा
तशी पांदीलाबी होते
सरपंच वरनं शाबूत
आत भुंगा पोखरते!
याचे दोन, त्याचे दोन
गुमान कामे करतो
भूषण एवढेच की
माणसांत देव पाहतो
पंचामध्ये….
— विठ्ठल जाधव.
संपर्क – ९४२१४४२९९५
शिरूरकासार, जि.बीड
Leave a Reply