( अर्थात वटपौर्णिमा व्रत )
स्त्री जातीचा मुकुटमणीं महासती मान मिळोनी
धन्य झाली जीवनीं पतीव्रता सावित्री //१//
ब्रह्मा लिखित अटळ ह्या सूत्रीं केला बदल
हे तिच्या तपाचे फळ सावित्रीने मिळविले //२//
जरी येतां काळ चुकवावी वेळ
बदलेल फळ हेच दाखविले तीने //३//
समजण्या धर्म पतिव्रता ऐकावी सावित्री कथा
मनीं भाव भरुनी येतां आदर वाटे तिच्या परीं //४//
मद्रदेशाचा नृपति नांव तयाचे अश्वपति
कन्या त्याची सावित्री प्रेम करी तिजवर //५//
कन्या होती उपवर धाडीले शोधण्या वर
राजा करी कदर कन्येच्या इच्छेची //६//
फिरुनी सर्व देशी न मिळे कुणीही तीजशी
आली एका आश्रमापाशी दृष्टीस पडला एक युवक //७//
नजर त्यावरी पडूनी स्तंभित राजकन्या होऊनी
रुप लागली न्याहाळूनी सत्यवान युवकाचे //८//
तेजोमय युवक पाहूनी भान जाय हरपूनी
राजकन्येने वरिले मनोमनी संकल्प लग्नाचा करी //९//
राजपूत्र होता सत्यवान पिता जाई राज्य गमावून
अंधत्व पित्याचे त्यास कारण वनवासी झाले सारे //१०//
सावित्री परतूनी घरीं सर्व हकीकत कथन करी
आवड तिची सत्यवानापरी मनीं त्यास वरिले //११//
चर्चा करीत समयीं नारदाचे आगमन होई
आनंदी भाव भरुनी येई पुता पुत्रीचे //१२//
वंदन करुनी देवर्षीला कन्येचा संकल्प सांगितला
आशिर्वाद मागती लग्नाला सावित्री सत्यवानाच्या //१३//
नारद वदले खिन्न होऊनी लग्न संकल्प द्यावा सोडूनी
विचार काढावा मनातूनी सत्यवानाविषयी //१४//
दुर्दैवी आहे सत्यवान त्याची आयुष्यरेषा लहान
एक वर्षांत जाईल मिटून जीवन त्याचे //१५//
हे आहे विधी लिखीत म्हणून होत निश्चीत
कोण करील बदल त्यांत प्रभूविना //१६//
ब्रह्मा लिखीत अटळ झडप घालीतो काळ
न चुके कधी ही वेळ हीच निसर्ग शक्ती //१७/
थर्रर्र कापला नृपति चकीत झाली सावित्री
ऐकून भयंकर भविष्याती सत्यवानाच्या //१८//
सावरोनी स्वतःशी विचार करी मनासी
वदू लागली नारदासी निश्चयीं स्वरानें //१९//
प्रथम दर्शनी वरिले मनोंमनीं पती मानिले
सर्वस्वी अर्पिण्या संकल्पले कशी त्यागू मी त्याना //२०//
काया वाचा मन सत्यवाना अर्पून
पतिठायी त्याना वरुन ह्रदयीं बसविले //२१//
निवड करता पतीची मनीं बसवुनी प्रतिमा त्याची
कल्पना न यावी दुजाची हाच स्त्रीधर्म //२२//
सप्त-पावली हा उपचार होण्या सर्व जगजाहीर
धार्मिक विधी एक प्रकार राहीला असे //२३//
स्त्रीचा असता हा धर्म कां सुचविता अधर्म
सांगा यातूनीच मार्ग सावित्री विनवी नारदासी //२४//
पतिव्रता ही श्रेष्ठ शक्ति करोनी पति भक्ति
ईश्वर मिळविण्याची युक्ती सांगू लागले नारद //२५//
पतिभक्ति करुन तपसामर्थ्य येइल महान
तेच नेईल उध्वरुन पावन होता प्रभू //२६//
बघूनी सावित्रीचा निश्चय नारद आनंदी होय
आशिर्वाद देऊनी जाय नारायण नाम घेत //२७//
दृढ निश्चयाची शक्ति सावित्रीस चेतना देती
माहित असून भविष्याती उडी घेई जीवनयज्ञांत //२८//
राजकन्या सावित्री सत्यवानासंगे वनाती
लग्न करोनी राहती संसार करण्या //२९//
पतीसी समजूनी देव त्याचे ठायीं आदर भाव
मनीं बसवी त्यांचे नांव अवरित //३०//
नामात असते लय लयांत एकाग्रता होय
एकाग्र मनी ईश्वरी भाव परमेश्वर सान्नीध्याचा //३१//
पति हाच परमेश्वर न पूजे दुजा ईश्वर
सावित्री त्याचे चरणावर अर्पण करी सेवा //३२//
सेवेत असते तप शक्तीचा तो दीप
प्रज्वलीत होईल आपोआप तपः सामर्थ्य वाढता //३३//
सोडूनी काळजी काळाची पर्वा नव्हती वेळेची
अंतरीक इच्छा समर्पणाची पतीच्या अल्प अयुष्यी //३४//
वर्षा अखेरचा दिवस भयाण घेत विश्रांति सत्यवान
वटवृक्षाखाली होता झोपून सावित्री देत मांडीचा आसरा //३५//
आयुष्याची रेखा संपता जीवन दोर जाई तुटतां
प्राणज्योत नेई यमदुता त्याक्षणीं //३६//
फांस घेऊन यमदूत नेण्या सत्यवान प्राणज्योत
टाकले फांस गळ्यांत सत्यवानाच्या //३७//
सावित्रीची तपशक्ति देई तिज दिव्य दृष्ठी
सोडून फास गळ्याभोवती देई दूर फेकून //३८//
यमदूत जाई घाबरुन हतबल झाले ते बघून
सावित्रीची शक्ति जाणून रिक्त हस्तें गेले यमपूरीं //३९//
यमराज मृत्युदंडाधिपती संतापून ते येती
नेण्या प्राणज्योती सत्यवानाची //४०//
यमराज प्रभूचे दिक् पाळ मृत्युरुपी ते महाकाळ
अपूर्व त्यांचे बळ राज्यकरीं यमपूरी ///४१//
नेवून मानव प्राणज्योत कर्माप्रमाणे शिक्षा देत
पाठवूनी नविन देही परत जीवन गाडा चालवी //४२//
रेड्यावर बैसूनी यमराज आले धाऊनी
हातीं फांस घेऊनी प्राण नेण्या सत्यवानाचे //४३//
बसूनी सत्यवाना शेजारीं पतीधर्माचे ध्यान धरीं
रक्षण कवच उत्पन्न करी पती पत्नी भोवती //४४//
तपाची दिव्य शक्ति यमराजासी येण्या रोकती
फांस त्याचे न पोहोंचती सत्यवाना पर्यंत //४५//
बघूनी ते तेजोवलय यमराज चकीत होय
शोधूं लागला उपाय सत्यवानाची नेण्या प्राण ज्योत //४६//
पतीकडून पाणी मागवून सावित्रीस दूर सारुन
प्राण ज्योती घेई काढून सत्यवानाची //४७//
यमराज निघाला स्वर्गी सावित्री त्याच्या मागे मार्गी
पतिव्रता शक्ति तिचे अंगीं चेतना देई मार्गक्रमण्यास //४८//
मनीं तिच्या पतिभक्ति बघून अपूर्व शक्ति
यमराज प्रसन्न होती सांगतले वर मागण्या //४९//
श्वशुराचे अंधत्व गेले राज्य तया परत मिळाले
वडीलांस पुत्र प्राप्त झाले सावित्री मिळवी तीन वर //५०//
न पावली समाधान पाठलाग चालूं ठेवून
यमासी ठेवीत झुलवून चर्चुनी विषय निराळे //५१//
शेवटचा मी वर देईन परी तू जावे परतून
मानव देहा स्वर्ग कठीण कसे राहशील तूं तेथें ? //५२//
जीवन आतां माझें व्यर्थ न उरे जगण्या अर्थ
एकटेपणा ठरेल अनर्थ माझ्या आयुष्यीं //५३//
इच्छा माझी व्हावे माता सानिध्य मुलाचे मिळतां
एकटेपणाचा भाव न राहता उर्वरीत जीवनामध्यें //५४//
पाठलाग घेण्या सोडूनी तथास्तू म्हटले यमानी
मान्य तिची विनंती करुनी वर देई तिला //५५//
तथास्तू म्हणतां क्षणी धरती गेली हादरुनी
भयंकर विजा चमकोनी निसर्ग उत्पात माजला //५६//
मान्य केले मातृत्व नसता जीवित पितृत्व
शक्य कसे हे अस्तित्व चुक उमगली यमराजा //५७//
निसर्गाच्या नियमाला तथास्तूने धक्का दिला
नियतीचा डाव उलटला सावित्रीच्या शक्तिनें //५८//
जसा सुटावा बाण तसा शब्द जाऊन
यमराज पेचांत पडून हारला सावित्रीपूढे //५९//
सोडून देई प्राणज्योत सत्यवान जीवदान मिळत
अखंड सौभ्याग्यवती वरदान मिळाले सावित्रीला //६०//
वटवृक्षाखालती पाऊनी सतीशक्ति
जीवदान मिळती सत्यवाना //६१//
ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला स्त्रीया पूजती वटवृक्षाला
अखंड मिळण्या सौभाग्याला सावित्रीप्रमाणे //६२//
पतिपत्नीतील प्रेमभाव समजोनी मनाचा ठाव
एकमेका आदरभाव हीच दिर्घायुष्याची गुरु किल्ली //६३//
// शुभंभवतु //
डॉ. भगवान नागापूरकर
१३- २५११८३
Leave a Reply