आटपाट नगर होतं. तेथे एक दरिद्री माणूस बायकोमुलांसह रहात होता. खायचे वांधे, ल्यायचे वांधे. अख्खे कुटुंब भिक्षा मागून जगायचे. सकाळी जेवण मिळाले की रात्री जेवण मिळेल याची खात्री नसायची.
एकदा भिक्षा मागता मागता तो दरिद्री माणूस एका बंगल्यापाशी आला. तेथे माणसांची प्रचंड गर्दी होती. झेंडे होते, मोठमोठे फलक होते, मोटारी होत्या, प्रत्येकाच्या हातात नोटांची पुडकी होती, कुणाचातरी जयजयकार चालला होता. भीतभीतच त्याने तेथल्या एका माणसाला विचारले
……साहेब येथे काय चालले आहे? मला भिक्षा मिळेल का?. तो माणूस तुच्छतेने म्हणाला ..अरे भिकारड्या बाजूला हो..दुसऱ्याला विचारले …त्यानेही झिडकारले…तिसऱ्याला मात्र दया आली.. त्याने विचारले .. तू मतदार आहेस का? त्या दरिद्री माणसाने हो म्हटले.. साहेबाचा विचारपालट झाला…
त्या माणसाने त्या दरिद्री माणसाला बंगल्यात नेले.. हातपाय धुवायला गरम पाणी दिले, तोंड पुसायला स्वच्छ टॉवेल दिला, खायला वडापाव दिला, प्यायला चहा दिला. दरिद्री माणसाला एव्हढे आदरातिथ्य जन्मात मिळाले नव्हते.
मग त्या तिसऱ्या माणसाने सांगितले….बाबा, येथे दर पाच वर्षांनी सत्तानारायणाची पूजा होते. सत्तानारायण प्रसन्न झाला तर पूजा करणारा नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो, पाच वर्षात त्याची भरभराट होते. प्रत्येक वर्षाला त्याच्या एका पिढीची ददात मिटते. पाच वर्षात पाच पिढ्यांची भरभराट होईल इतकी माया जमते. एका बंगल्याचे पाच बंगले होतात, पाच वर्षात पाच पंचतारांकित हॉटेले बांधता येतात, पेट्रोल पंप विकत घेता येतात….तू फक्त एव्हढंच करायचं ….मतदान यंत्राचं आमच्या निशाणी समोरचं बटण दाबायचं…
दरिद्री माणूस खुश झाला……तुमच्या निशाणीचंच बटण दाबीन म्हणाला ..
भक्तिभावाने सत्तानारायणाच्या खुर्चीला साष्टांग नमस्कार करून, तो दरिद्री माणूस मनातल्या मनात म्हणाला …सत्तानारायणा, पाच वर्षानंतर मीही तुझी पूजा करीन म्हणतो.. माझ्यावर कृपा कर, भिक्षा मागून मागून माझे कुटुंब फार कंटाळले आहे रे….
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply