ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ परशुराम यशवंत वैद्य खडीवाले यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९३२ रोजी झाला.
परशुराम वैद्य यांनी भारतीय हवाई दलात सुमारे सतरा वर्षे नोकरी केली.१९६८ मध्ये ते या सेवेतून निवृत्त झाले. खडीवाले वैद्य हे भारतीय हवाई दलात नोकरी करत असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मृत्युपत्रात परशुरामाने आयुर्वेदाचे शिक्षण घ्यावे तसेच आपल्या औषधी कारखान्याकडे लक्ष द्यावे, अशी इच्छा १९६४ साली व्यक्त केली होती. त्यानुसार परशुराम वैद्य यांनी हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर पुण्यात येऊन ‘हरी परशुराम औषधालय’ सुरू केले. याचबरोबर त्यांनी आयुर्वेदाशी संबंधित अनेक पुस्तकेही लिहिली. नाडीपरीक्षा आणि आयुर्वेदातील औषधे निर्माण करण्याच्या क्षेत्रात खडीवाले वैद्य यांचे मोठे योगदान होते. शेवटच्या श्वासापर्यंत ते आयुर्वेदाच्या कामात कार्यरत होते.
१९७४ साली “वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थे’ची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आयुर्वेदाचे शिक्षण घेता यावे यासाठी गुरूकुल सुरू केले. त्याचबरोबर “अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय’ येथे अनेक वर्षे कोणतेही मानधन न घेता “रसशास्त्र’ या विषयाचे अध्यापन केले. खडीवाले वैद्य यांनी ऋषीतुल्य महर्षी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या नावाने १९७० साली पंचकर्म रुग्णालयाची स्थापना केली. वैद्यकीय संदर्भ ग्रंथालयासाठी त्यांनी वैद्य अप्पासाहेब शास्त्री साठे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ग्रंथालय सुरू केले. वैद्य खडीवाले यांनी ३० वर्षे पुणे महापालिकेच्या गाडीखाना येथील कोटणीस रुग्णालयामध्ये एड्सग्रस्त रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि उपचार सुरू केले.
खडीवाले वैद्य यांना पुणे महापालिका, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, नाशिक आरोग्य विद्यापीठ तसेच ऑक्टो बर २००९ मध्ये दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन येथून त्यांना शताब्दी महर्षी म्हणून सन्मानीत करण्यात आले.
२०११ मध्ये त्यांनी दुर्गाताई परांजपे मुक्त वाचनालयाची स्थापना केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी स्वखर्चातून औषधी वनस्पतींचे उद्यान उभारले. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सक्रीय होते.
वैद्य खडीवाले यांनी आयुर्वेदासंदर्भात सामान्य नागरिकांचे वर्ग घेतले. लोकांना आयुर्वेदाच्या ३०० हून अधिक औषधांचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. त्याशिवाय, त्याबाबतच्या श्लोयकांचे पाठांतरही ते करायला लावत. हे काम त्यांनी विनामोबदला अनेक वर्षांपासून केले.
त्यांचे ‘आयुर्वेद सर्वांकरीता’ हे पुस्तक खूप गाजले. याशिवाय, ‘आयुर्वेदीय उपचार’, ‘आयुर्वेदीय वनौषधी’, ‘ए टू झेड आरोग्यवर्धिनी’, “औषधाविना उपचार’, ‘कानाचे विकार’, ‘निरामय सौंदर्य आणि आयुर्वेद’, ‘पूर्णब्रह्म’, ‘सहज सोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार’ अशी त्यांची विविध पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचे चिरंजीव विनायक प. खडीवाले हेही वैद्य आहेत.
वैद्य खडीवाले यांचे २८ डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply