शाळा सुरू असताना अनेक सहशालेय उपक्रम घेतले जातात. स्नेहसंमेलन, परिसर भेट, चावडी वाचन अशा काही उपक्रमाचा प्रामुख्याने त्यामध्ये समावेश असतो.स्पर्धा परीक्षा, रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा , संगीत खुर्ची,जिलेबी रेस, विविध खेळ या उपक्रमामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते . सहल हा भौगोलिक आणि ऐतिहासिक माहीतीसाठी उत्तम प्रकार आहे. गड-किल्ले पाहणे, धरण, पर्यटनस्थळ पाहणे किंवा मग ऐतिहासिक किंवा भौगोलिक स्थळ पाहणे हे औत्सुक्याचा विषय ठरतो. मुलांना पर्यटन आवडते. त्यातून जी ज्ञानप्राप्ती होते ती चिरःकाल टिकाऊ स्वरूपाची असते.कायम स्मरणात राहते. मिळविलेल्या ज्ञानाचे उपयोजन आणि दृढीकरण होते किंबहुना ते शिक्षणाचेच कार्य आहे.
शाळास्तरावर सहलीचे आयोजन करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.मुलं उत्साही असतील तरीही ग्रामीण भागातील मुलांचे पालक बसभाडे देण्यास तयार नसतात . दुसरे म्हणजे दिले तर उशीरा . त्यातही शाळेतील मुलांची संख्या कमी असते अशी मुले सहलीचे आयोजन करू शकत नाहीत. ज्या शाळेत जास्तीची मुलं आहेत तेच सहलीचे आयोजन करतात. तिथेही शिक्षक, पालक यांच्या भूमिकेवर ते अवलंबून आहे. सहलीचे ठिकाण, मुक्कामाचे स्थळ, तेथील भोजन व्यवस्था यांचा सारासार विचार करावा लागतो.सुरक्षितता हा एक प्रश्नच आहे. अनुचित काही घडू नये याचीही दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरते. शिक्षक पालक मानसिकतेवर ते अवलंबून असते.
प्रवासाच्या बाबतीत खाजगी वाहनाच्या ऐवजी एस.टी.बसला पसंती दिल्यास तो उत्तम पर्याय ठरतो. सहलीसाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. ती तालुकास्तरावर मिळत नाही. जिल्ह्यावरून परवानगी आणणे खर्चिक काम ठरते. सहलीच्या परवानगीसाठी चिरीमिरी दिल्याचे एका मित्राने खाजगीत सांगितले. मुख्याध्यापक , शिक्षक यांच्या सकारात्मक दृष्टिकोनावर बरेच अवलंबून असते. स्थळांची निवड करताना मुलांना जास्त कष्टप्रद होणार नाहीत असे किल्ले निवडावे लागतात.सहलीसाठी वापरण्यात येणारी बस दुरूस्त असणे आणि चालकास रस्त्याची माहीती असणे गरजेचे असते. डोंगर , दरी , एकेरी वाहतुक, गर्दीची ठिकाणे या बाबी प्राधान्यक्रमाने पहाव्या लागतात. सोबत पाण्याची सोय असावी लागते त्याचबरोबर मुक्कामाची ठिकाणे अगोदरच निश्चित झालेली असावीत. समुद्राच्या किनारी जाणार असाल तर पाण्याची खोली किती आहे ? मुलं काय करताहेत ? हेही लक्षात घ्यायला हवे. मध्यंतरी सहलीसाठी गेलेली काही मुलं बुडून मृत्यूमुखी पडल्याचे आपण ऐकले असेल. अशा दुर्घटना टाळणे आपल्या हाती आहे. इतर वेळी बंदिस्त असणारी मुले आनंदाच्या भरात सैरावैरा धावण्याची शक्यता असते. याबाबत दक्षता घेणे गरजेचे असते. मुलांना शिस्त असणे यावेळी कामी येते . यामुळे स्थळ पाहण्याचा आनंदही घेता येतो. हलका-फुलका म्हणजे पचनास सोपा असा आहार प्रवासात सोबत असावा.तेलकट पदार्थ शक्यतो टाळावेत. त्याचबरोबर प्रथमोपचार पेटीही जवळ असणे आवश्यक आहे. त्यात आवश्यक ते साहित्य असावे. स्थळ पाहणी करताना टिपणे काढण्याची सवय मुलांना लावावी. गाईड, मार्गदर्शकाचे मानधन पुरातत्व विभागाशी संपर्क करूनच ठरवावे. गाईडमुळे योग्य मार्गदर्शन मिळते. सहलीदरम्यान छायाचित्र काढण्याचा मोह होणे साहजिकच आहे तद्वतच काळजी घेणे महत्वाचे असते . किल्ल्यांची तटबंदी किंवा निमुळता कडा फोटोसाठी निवडू नये. अपघात होण्याची शक्यता अधिक असते.त्या स्थळाचे पावित्र्य टिकविणे आपल्या हाती असते. सोबतचा कचरा कचराकुंडीतच टाकावा . इतरत्र तो फेकून देऊ नये. मुलांच्या सोबत आपल्या शाळेचे ओळखपत्र असणे गरजेचे असते. कारण अनेक शाळांचे अनेक विद्यार्थी सहलीसाठी आलेले असतात. मुलांचे गट पाडून यादी आपल्याजवळ ठेवावी. पालकांचे दुरध्वनी क्रमांक असल्यास उत्तमच. प्रसंगी गटनायक पद्धती अवलंबवावी. निरीक्षण नोंदी ठेवल्या पाहिजेत . शिक्षकांनी तेथील स्थळांबाबत अधिकची माहीती अगोदरच दिली पाहिजे. कित्येकवेळा मुलं काय पाहतात हेच त्यांना कळत नाही. पाहणी निरीक्षणानंतर कुणी चुकलेच तर कुठे यायचे याची निश्चिती अगोदरच करावी. कारण सहलीनंतर कोण कुठे कसे चुकले? मग कशी घबराट झाली? याचे मजेदार किस्से ऐकायला मिळतात. सहल हा आनंदाचा क्षण असतो.या आनंदात विरजण पडू नये.या काळात प्रत्येक घटकांचे वर्तन सहकार्याचे एकोप्याचे असावे लागते. बसगाडी पंक्चर , डिझेल व इतर उणिवा दूर करून सज्ज असली पाहिजे. इतकी काळजी घेतली सावधानता बाळगली तर सहशालेय उपक्रमात सहल या उपक्रमास मात्र तोड नाही तो एक अविष्मरणिय क्षण असतो एवढे मात्र नक्की . कारण मोठ्यांना आपण बालपणी ज्या सहलीसाठी गेलो होतो ती सहल आठवतेच ना ?
सहली या शासकीय यंत्रणेने आयोजित केल्यास अधिकाधिक मुलांना त्याचा फायदा होईल. प्रत्येक मुलाचा विमा असावा. स्थळे ठरवून द्यावीत. शिक्षकांना अधिक संरक्षण द्यावे. बसचे वाहक, बसगाडी ठरवून द्यावी.भोजनासाठी परवाने द्यावेत. परवानाधारक हाॅटेलमध्ये निवास आणि भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. सर्वच सहलींसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी. खर्चाची प्रतिपुर्ती वाहतुक खर्चासह शासनस्तरावर झाल्यास या उपक्रमास पाठबळ मिळेल..
विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
मो.9421442995
Leave a Reply