शिक्षणाचं वाटोळं, online झालंय.
गेटचाच उडालाय रंग आणि –
गंजून कराकरा वाजायला लागलय ,
सताड उघडून पडणच संपलय,
कारण शिक्षणाचं वाटोळं –
online झालंय.
वॉचमनकाकांच्या दंडुक्याला, न उरलय काम,
पोरं नाही मस्ती नाही, न नोकरीत राम.
दटावणं रागावणं संपूनच गेलंय ,
कारण शिक्षणाचं वाटोळं –
online झालंय.
जिन्याला-मैदानाला पोरांची आस,
अंगाखांद्यावर खेळवणं हाच त्यांचा ध्यास.
एकटेपणाचं दुःख नेमकं, आता उमगलय,
कारण शिक्षणाचं वाटोळं –
online झालंय.
प्रयोग-वाचन नाही, बुकं कडीकुलपात बसलीयत,
काचेच्या कपाटातून , दाटीवाटीने घुसलीयत.
त्या सांगाड्यालाही जिणं, असह्य होऊन गेलंय,
कारण शिक्षणाचं वाटोळं –
online झालंय.
शाळा भरणं, तास संपणं आता नाही काही,
मधली सुट्टी, शाळा सुटली घणघणतच नाही.
शिपाईदादाशी घंटेचं नातंच हरवून गेलय,
कारण शिक्षणाचं वाटोळं –
online झालंय.
पन्नास बाकं आम्ही, पडलोय आपले धूळ खात,
सकाळ होताच आशेने, दाराकडे असतो पहात.
दफ्तरं नाही, मुलं नाहीत जगायचं कसं?झालंय,
कारण शिक्षणाचं वाटोळं –
online झालंय.
गृहपाठ-खोड्या, मस्ती आणि शिकवणी ,
तिमाही-सहामाही, परीक्षा अन तपासणी .
समोरासमोर शिकवण्याचं समाधानच सरलय ,
कारण शिक्षणाचं वाटोळं –
online झालंय.
आमचा विचार सांगतो, कुणीच करेना झालंय,
शाळा नाही, मित्र नाही कंटाळवाणं खूप होतंय
घरात बसून मन मात्र, अगदी कोंडून गेलंय ,
कारण आमच्या शिक्षणाचं वाटोळं –
online झालंय.
wfh सांभाळत यांचं online पहायचं ,
कधी?कधी? हे सुरळीत, सांगा सगळं व्हायचं ?
मुलांच्या आयुष्याचं तुम्ही, काय करायचं ठरवलंय?
‘परिक्षेशिवाय पास’ हे त्यांनाही आवडू लागलंय ,
कारण शिक्षणाचं वाटोळं –
online झालंय.
कारण शिक्षणाचं वाटोळं, online झालंय.
प्रासादिक म्हणे
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply