Image © Kedar Pitkar….
शिल्पांकित गणराय
हंपी आणि बदामी ही दोन वैभवशाली गावं आपल्या असामान्य वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेसाठी गेली शेकडो वर्ष दिगंत कीर्ती बाळगून आहेत. तुंगभद्रा नदीकाठावर वसलेलं ‘हंपी’ त्यावेळच्या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचं ठिकाण होतं. विजयनगर साम्राज्याचा विस्तार दक्खनपासून ते पार सिलोन होता. थोडीथोडकी नव्हे तर अडीचशे वर्ष विजयनगरचा कीर्तीध्वज मोठया दिमाखात फडकत होता. जसजसा साम्राज्याचा विकास होत गेला तसतशी इथली शिल्पकला बहरत गेली. इथली देवळं आणि महाल पाषाणावरील बारीक आणि नाजूक कलाकुसरीची जगभर प्रसिद्ध झाले.
दक्खनच्या पठारावरील हा हजारो मैलांचा विस्तृत मुलुख मोठा सुंदर. काळ्या, लाल आणि अंजिरी रंग यांचं विलक्षण रंगसंगती असलेल्या भूमीचा. नितळ देखण्या तळ्यांचा. विशेष म्हणजे त्यात गेली हजारो वर्ष विसावलेल्या खूप मोठंमोठया पाषाणांचा, शिलाखंडांचा. यातला एक एक भव्य पाषाण म्हणजे इथला पुराणपुरुष. याच पाषाणांनी प्रतिभाशाली वास्तुशात्रज्ञांना, कसबी शिल्पीन्ना भुरळ घातली आणि मग या कलाकारांचे छिन्नी हातोडे कार्यरत झाले. त्यांनी हे पाषाण जिवंत केले. या भव्य आणि कठोर पाषाणांना त्यांनी आपल्या कौशल्याने इतकं मृदू केलं की यातून त्यांनी नाजूक-कोवळी फुलं फुलवली. छाया प्रकाशाचा उत्तम मेळ साधत घाटदार मानवी आकृती साकारल्या. अखंड पाषाणात भव्य देवळं साकारून ईश्वरी शक्तिस्रोताचा अविष्कार साकारला. भारतीय मनाला भावणारा असाच एक सुंदर शिल्पाविष्कार आहे हंपीच्या ‘ससिवेकालू’ या गणरायाचा. हेमकूट टेकडीवरच्या उतारावर अखंड पाषाणात कोरलेलं गणरायाचं हे भव्य सालंकृत शिल्प आपल्याला मुग्ध करतं. पंधरा सोळा फूट उंचीची ही मूर्ती एका मोठया दगडी मंडपात विराजमान आहे. हे स्तंभ आकाशाला स्पर्श करतील असे अतिशय भव्य आणि देखणे असून त्यावर बारीक कलाकुसर आहे … विजयनगर शिल्पशैलीतले हे स्तंभ आणि मंडप आहे … हा देवळातून हंपीच्या दूरवर पसरलेल्या मंदिर समूहाचं उत्तम दर्शन होतं. एका दंतकथेनुसार एकदा या गणपतीने भरपूर खाल्लं. पोट फुटेपर्यंत. मग स्वारी अस्वस्थ झाली. मग त्याने एक मोठा नाग पोटाला बांधला. पोट फुटू नये म्हणून. अर्थात शिल्पीन्नी फार सुरेख साकारलाय हा नाग. त्यावेळच्या तेलंगणातल्या चंद्रगिरी नामक व्यापा-याने हे सुंदर देऊळ १५०६ मध्ये विजयनगरचा राजा नरसिंह-२ (राज्यकाळ १४९१-१५०५) याच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधून घेतलं. या गणपतीच्या डाव्या हातात मोदक आहे. गणपती बसलेला असून कमळाच्या अर्ध्या फुललेल्या अवस्थेत आहे. मूर्तीच्या पाठीला एका हाताने आधार दिलेला आहे. हा हात आहे पार्वतीचा. त्याच्या आईचा. गाभा-यात मागच्या बाजूला उजेड कमी असल्याने ही गोष्ट सहज लक्षात येत नाही. शिल्पीनीं बहुतेक पार्वतीचं रूप जाणत्या रसिकांसाठी कल्पनेसाठी मुद्दामूनच साकारलेलं नाही.
याच परिसरातला बदामीचा ‘वतापी’ गणरायही गेली शेकडो वर्ष भारतीय धार्मिक मनाला भावलेला आहे. ‘बदामी’ हे अगोदर ‘वतापी’ म्हणून ओळखली जायचं. परंपरेने वतापी गणेशाच्या ब-याच कथा सांगितल्या आहेत. एका कथेनुसार मातंगापुरातल्या गजमुखासूर नावाच्या राक्षसाला शंकराकडून अमरत्वाचा वर प्राप्त झाला होता. त्याने लोकांवर बरेच अत्याचार करून दहशत माजवली होती. गणपतीने या राक्षसाचा वध केला. साहजिकच शंकर रागावू नयेत म्हणून गणपतीने शंकराची आराधना केली. गजमुखासुराच्या रक्ताचा सडा पडून इथली सगळी भूमी लाल झाली, असंही ही कथा सांगते. पल्लवांनी चालुक्यांवर विजय मिळवला आणि पल्लवांच्या ‘परंजोती’ नावाच्या पराक्रमी पण भाविक सेनापतीने इथल्या अनेक मूल्यवान वस्तूंबरोबरच या गणरायाची मूर्ती देखील आपल्याबरोबर तामिळनाडूत नेली. या गणपतीची स्थापना मग उथ्रपथीस्वरास्वामी या मंदिरात केली. तिरुचेंकट्टकुडी या तंजावरजवळच्या ठिकाणी आहे. हे देऊळ मुख्यत: शंकराचं असलं तरी भाविक इथल्या गणेशाच्या पूजनासाठीच येतात.
वतापी गणरायावर त्यावेळचे अत्यंत प्रतिभाशाली कवी आणि कर्नाटकी संगीतकार मुथुस्वामी दीक्षितर यांची खूप श्रद्धा होती. इतकी की त्यांनी ‘वतापी गणपतीम भजे’ ही कवनं संस्कृत मध्ये रचली आणि संगीतबद्ध केली. हंसध्वनी रागात साकारलेली ही गणरायाची स्तुती ही स्तुती कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात अत्यंत लोकप्रिय आहे. इतकी की दक्षिणेत बहुतेक मोठया सांगीतिक कार्यक्रमाच्या सुरवातीला ही म्हणायची प्रथा आहे. असं म्हणतात की मुथुस्वामीनीं नंतर त्यांच्या कुठल्याही सांगीतिक रचनेत हंसध्वनी हा राग नंतर वापरला नाही. मुथुस्वामींची ही कवनं त्यांच्या पुढच्या पिढयांकडे जात राहिली. त्यांच्या अकराव्या पिढीतले सुब्बाराम यांना त्यांच्या आजोबांकडून ही गाणी ऐकली. त्यावेळचे त्यांचे स्नेही आणि इट्टयापुरमचे राज्यकर्ते वेंकटेश्वर इटाप्पा-३ आणि सुप्रसिद्ध प्रकाशक चिन्नास्वामी मुदलियार यांनी त्यांना विनवून ही कवनं प्रसिद्ध केली. सुब्बाराम यांनी ही कवनं आणि त्याच्या संगीताच्या नोंदी बारकावेही प्रसिद्धी साठी दिले. पल्लवी आणि अनुपल्लवी हे दोन संग्रह १८९६ मध्ये चिन्नास्वामी मुदलियार यांनी प्रसिद्ध केले. त्यानंतर मद्रासच्या म्युझिक अकादमीने तामिळ भाविकांसाठी ही कवनं १९६१ साली प्रसिद्ध केली.
गणपती आले की हंपी-बदामी आठवतं. हंपीच्या हेमकूट टेकडीवरचा आकाशाला स्पर्श करणारा भव्य स्तंभांचा मंडप डोळ्यांसमोर उभा राहतो. खरंच अगदी अनादी कालापासूनच कुठल्याही लहान-मोठया निर्मितीपूर्वी प्राचीन माणसाने गणरायाचंच आवाहन केलेलं दिसतं. गेल्या काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशातल्या सांची जवळच्या ‘उदयगिरी’च्या गुंफामधल्या पाषाणात कोरलेल्या गणरायाची सालंकृत मूर्ती दिसते. मग आपण पाहिलेलं हंपीच्या गणरायाचं रुप मनाला अजून भावतं. मुथुस्वामींच्या “वतापी गणपतिम भजेssअहम! वतापी गणपतिम भजेssअहम!” या ओळी सहज गुणगुणल्या जातात. पाषाणांची ही कुलवंत चिरंजीव भाषा आपल्याला चक्क थोडी थोडी समजायला लागते… आणि मन थोडं का होईना जाणतं झाल्याचा आनंद होतो. हा अनुभव फार सच्चा आणि सहजसुंदर असतो. खूप मस्त वाटतं.
— प्रकाश पिटकर
(येसूदास यांची मुथुस्वामींची ही भजनं फारच सुंदर आणि लोकप्रिय आहेत … त्यांच्या युट्युब लिंक्स खाली दिल्या आहेत) (काही फोटो कमेंटमध्ये दिले आहेत)
https://www.youtube.com/watch?v=BSq0islk3XY
https://www.youtube.com/watch?v=XP2thJLUJsE
Vatapi Ganesh….Badami…. Deccan Plateau…. Karnataka…
शनिवार … ३१.९. २०१९ च्या महाराष्ट्र टाइम्समध्ये (मुंबई, ठाणे, नवी मुंबई आवृत्ती) हा लेख प्रसिद्ध झाला.
My article on Vatapi Ganesh, Badami and Sasivekalu, Hampi was published on 31.8.2019 in Maharashtra Times … Mumbai- Thane, Navi Mumbai Edition. Sincere thanks to Kalpana Rane …. Rui Gawand … Rajesh Waghmare and Team…. (Images are given in the comments including image of the article…) (Youtube links of Vatapi Ganapati Bhaje …. devotional songs by Saint Muthuswami… beautifully sung by legendary singer Yesudas .. are given at the bottom of this article) …
Leave a Reply