बीड येथे गुरूलिंग सोनवणे नामक सेवानिवृत्त चित्रकला शिक्षक आहेत. ते शिरूरकासार (बीड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत होते. दरवर्षी नियमितपणे शासनाच्या चित्रकला परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ट करत असत.
मी आठवीत असताना चित्रकलेची आवड लक्षात घेऊन सरांनी मला परीक्षेस बसवले. बीड येथील मल्टिपर्पज शाळेत या परीक्षा होत. राहण्याची सोय तर नाही. मग सरांच्या बीड येथील घराशिवाय पर्याय नव्हता. तीन-चार दिवस वीस-पंचवीस मुले त्यांच्या घरी मोफत राहण्यासाठी असत. त्यांच्या अर्धांगिनी आनंदाने मुलांना जेवू घालत. अशावेळी गरीब विद्यार्थ्यांचा खर्च सर स्वत: करत असत. मुले परीक्षा देत. घरी जात. रंग, डीश, ब्रश, कागद हा कमी पडला की सोनवणे सर ते मोफत पुरवत असत. मुलांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी सतत धडपडत असत.
त्यांची दोन्ही मुले वैद्यकीय क्षेत्रात आहेत. त्यांचा चित्रसंग्रह अप्रतिम आहे. आमच्यासह अनेक मुले त्यांच्यामुळे संस्कारशील झाली. आमचे हस्ताक्षर आणि चित्र यावर त्यांचीच छाया आहे. आमच्या वडिलांशी ते सातत्याने संपर्क करत. आदरभाव जोपासत. मुलांची प्रगती आणि अडचणी याविषयी बोलत.
असे गुरू भेटणे प्रत्येकाचे भाग्यच असते. विद्यार्थीदशेत असताना त्यांचे महत्त्व कळाले नाही; पण आज नतमस्तक होतोय.
आज सरांचे सर्व विद्यार्थी नावारूपास आले आहेत. विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. उतारवयात त्यांना चांगले आरोग्य लाभो ही सदिच्छा! त्यांचे आमच्या आयुष्यात येणे कलाटणी देणारेच आहे!
विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
Leave a Reply