महाविद्यालय व शाळातील वाढत्या बेशिस्ती मागील कारणात समाजकारण, राजकारण, अर्थकारण आहे. मूल्याचा अभाव व प्रसारमाध्यमांचा प्रभाव हे ही कारण नाकारुन चालणार नाही. जीवनक्रमाशी व अभ्यासक्रमाशी समायोजन नसणे हेही कारण आहे. शाळा उघडण्यास राजकारण आहे, शिक्षक नेमण्यात राजकारण आहे. शाळा चालवण्यात राजकारण आहे. राजकारण्यांच्या प्रतिमेवर, प्रतिभेवर नव्हे, शाळा मिळत आहेत. हव्या त्या धर्माची व जातीची विचारसरणी पेरण्यासाठी एक मळा म्हणजे शाळा असे काही जणांना वाटत आहे. देव व संत यांचे लेबल लावून परमीटरुमइतके स्वस्त शाळेला केले आहे.
शाळा नावाचं मंदिर असो की, परमीटरुम, राजकारण्यांची शिफारस लागते, “अर्थ” असल्याशिवाय शैक्षणिक संस्था मिळत नाहीत, विनाअनुदान, अनुदानित करण्यासाठी “अर्थ” आवश्यक आहे. विनाअनुदानाचे दुकान उघडण्याचे व त्याला अनुदान मिळवून घ्यायचे. राजकारणातल्या अस्तित्वासाठी, तिकिट मिळवण्यासाठी, शैक्षणिक संस्था, साखर कारखाना, सहकारी संस्था, परमीटरुम, वर्तमानपत्र, खून, बलात्कार हा स्वतःच्या साम्राज्याचा भाग अनेकांना आवश्यक वाटायला लागला.
शिक्षकांचे मूल्य, कौशल्यापेक्षा “दर” महत्वपूर्ण ठरु लागला. लाखमोलाचे शिक्षक यायच्या ऐवजी लाखदराचे शिक्षक यायला लागले. अनेक शैक्षणिक संस्था राजकारण्यांच्या, लक्ष्मीपुत्राच्या पायाशी लोटांगण घेत आहेत. सरस्वती वरदहस्ताचा केव्हाच सूर्यास्त झाला आहे. विनाअनुदानाचा वसंत, लोकांना शरदाचे चांदणे, मनोहर, सोनियाप्रमाणे वाटायला लागला, तर त्याला तुम्ही, आम्ही काय करणार? पात्र नसलेले पण शिक्षकाचे पात्र वठवणारे हे विनाअनुदानाचे वैशिष्ट्य. शिक्षकांतील कमतरता (आशयातील, विषयातील, प्रशिक्षणातील, कौशल्यातील) त्यांना कमी पैशांत काम करण्यास प्रवृत्त करत आहे. अध्यापनात असमर्थ असलेले शिक्षक धाक, शिक्षा व इतर अनैतिक गोष्टींचा सहारा घेतानाच शिस्तीचा प्रश्न निर्माण करतात.
अभ्यासक्रम कठीण म्हणून विद्यार्थ्यांची आत्महत्या, मार्गदर्शन नावाखाली विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, यासाठी शासनाला परिपत्रक काढावे लागते की, मार्गदर्शनासाठी घरी मुलींना बोलावू नये, परीक्षेत हवे ते करु न देणार्या शिक्षकांना मारहाण, या गोष्टी सर्वसामान्य झाल्या आहेत.
शिस्तीचे बाळकडू पाजणारी कुटुंबसंस्था, जिची कधीच उद्ध्वस्त धर्मशाळा झाली आहे. शाळांचे कोंडवाडे झाल्यावर शिस्त लागणार कशी? कुटुंब, शाळा, समाज हे शिस्तीचे महामार्ग, अपघाताने ओतप्रोत भरले आहेत. आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चाहीकडे हे वेगळ्या संदर्भात म्हणावे लागत आहे. संदर्भ बदलले की अर्थ बदलतो. कुटुंबात भावनिक जडणघडण होण्यासाठी गोतावळे संपले, शाळेत अजून खडुफळेच आहेत, समाजात घोटाळे वाढतच आहेत. नको असणारी फळे, जीवन सळो की पळो करीत आहे. आपणच पेरायचं व निसर्गाला व दैवाला दोष द्यायचा हे किती दिवस चालणार? व्यवस्थेतील घोटाळेच बेशिस्तीच्या पायावर दिमाखाने उभे राहत आहेत. शिस्तीला गाडून उभा राहणारा मनोरा, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो. शिस्त नसलेल्या समाजाला जबरस्त किमत मोजावी लागते.
राजकारणातही शिस्त राहिली नाही. एके काळी शिस्तीसाठी प्रसिध्द असलेल्या सर्व संस्था बेशिस्तीच्या आहारी गेल्या आहेत. सगळीकडेच त्रिशंकू अवस्था असल्यामुळे शिस्त दुरापास्त झाली आहे. निकालाची उत्सुकता, संपलेली लढाई खेळणे सर्वत्र चालू आहे. शिस्तीतून राष्ट्र उभे राहते, बेशिस्तीतून भ्रष्ट निपजतात. कुटुंबात वळण लागण्याऐवजी धोक्याचे वळण मिळत आहे. दूरदर्शनवरची कोणतीही मालिका घ्या, सगळीकडे नाजायजचाच आवाज, दिवस-रात्र अंगप्रदर्शन, शरीर चाळवणार्या घटना कुटुंबात अव्याहत चालू आहेत. वाचन, चितन, मनन याला कधीच फाटा मिळाला आहे.
गुरुकुल पध्दतीत गुरुची सेवा करत यायची. गुरुतील चांगल्या गोष्टीचा शिष्यांना अभिमान असायचा. आज शिक्षकाची टिगलटवाळी व त्यांच्यातील दोष शोधणे हेच विद्यार्थ्यांचे काम राहिले आहे. उत्कृष्ट अध्यापन व शिस्त यासाठी लक्षात राहणारे शिक्षक मुलांना सहज आठवणार नाहीत. शिक्षकांशी संबंध संपला की, नाव घेण्याऐवजी, नाव ठेवण्याची वृत्ती विद्यार्थ्यांत जास्त दिसते. शाळेपेक्षा कोचिग क्लासच महत्वच बिबवले जात आहे. प्रचंड जाहिरात, एअरकंशिन रुम, नटीसुध्दा जाहिरातीत कारण कोचिगमुळे ती मेरीटमध्येत येत नाही तर कलागुण जोपासण्याची संधी तिला मिळते, जाहिरात ही लोकांची कमकुवत मानसिकता बनली आहे. सातत्याने, मोठी जाहिरात लोकांना आकर्षित करत आहे. ऑल क्लिअर शाम्पू, ट्रिपल रिफाईन्ड तेल, जीवनरेखा न मिटवणारी धुण्याची पावडर, बायको माहेरी गेल्यावर पितांबरी भांडे चकचकीत करण्यासाठी पावडर, पण व्यक्तिमत्व रिफाईन्ड करण्यासाठी काय?
शैक्षणिक संस्था या वॉशिग मशीनसारख्या झाल्या आहेत. वॉशिग मशीनमध्ये पावडर व कपडे घासले तरच कपडे शुभ्र होतात. नाही तर मळकट तसेच धुऊन निघतात. विद्यार्थी कमी संस्कार व सोपस्कार होऊन शिक्षण घेतल्याप्रमाणे बाहेर पडत आहेत. शिक्षण प्रक्रियेत आयोजन आहे, नियोजन आहे पण उपयोजन नाही. भविष्यातील उत्तर न शोधणारी शिक्षण पध्दती आहे, भविष्याचा वेध न घेणारी शिक्षणपध्दती आहे. शिक्षणातले विषय व जीवनातील आशय यात महद् अंतर आहे. सर्वच क्षेत्रांत पुनःर्विचार आवश्यक बनला आहे.
शिक्षणाला प्राप्त झालेल्या खोट्या प्रतिष्ठेमुळे वर्गातील नोंदणी वाढली आहे. शैक्षणिक संस्था या विद्यार्थ्यांचा सामाजिक, भावनिक, बौध्दिक व शारीरिक असा सर्वांगीण विकास करण्यास कमी पडत आहेत. कुटुंब व शाळा यात सुप्तगुण सुप्तच राहत आहेत. तणाव इतके प्रचंड वाढत आहेत की, आजच्या विद्यार्थ्यांला केवळ अस्तित्वासाठी शिक्षण घेऊन चालणार नाही.
परीक्षेपुरतीच माहिती विद्यार्थ्यांना जीवन जगण्यास पुरणार नाही. ज्ञान व त्यांचे उपयोजन याताले अंतर समाजात प्रश्न निर्माण करते. विद्यार्थी स्वयंअध्ययन करत नाहीत व त्यांना ते न करु देणार्या यंत्रणा आज कार्यरत आहेत.
बुध्दीला आव्हान मिळेल अशी परिस्थिती आज शैक्षणिक संस्थात आहे का? तेच अध्यापन, तेच प्रश्न, तीच परीक्षा, परीक्षेआधीच शिक्षक व विद्यार्थी प्रश्नपत्रिकेचे पोस्टमार्टम करत आहेत. परीक्षेत काय येणार? यापेक्षा कसे लिहिणार? याची चिता विद्यार्थ्यांना असते. शिक्षणाची गुणवत्ता वर्गातील चार भितीतच अडकलीय. अध्यापकांच्या वर्तन कौशल्यावर, स्नेहपूर्ण संबंधांवर, प्रेरणा देण्याच्या क्षमतेवर, स्वतःच्या अध्यापन क्षमतेवर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा डोलारा उभा असतो.
पॅटर्नने विद्यार्थी गुणवत्तायादीत येत आहेत. पण अब्राहम लिंकनने लिहिलेल्या मुख्याध्यापकांच्या पत्रातील अनेक प्रश्न शेवटी अनुत्तरीतच राहत आहेत. अनुत्तरीत प्रश्न यशश्री खेचून आणत नाहीत. हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला शिस्तच लगाम घालू शकते. केवळ बेशिस्तीची कारणे शोधून चालणार नाही. तर शिस्तीसाठी योग्य आचरण आवश्यक आहे. ढासळलेल्या बुरुजाला डागडुजी आवश्यक असते, शिस्तीचेही असेच आहे.
– डॉ. अनिल कुलकर्णी
मोबा. नं. ९४०३८०५१५३
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन, कोथरुड, पुणे ४११ ०३८.
Leave a Reply