नवीन लेखन...

शिवाजी पार्क

एखाद दिवशी संध्याकाळी थोडा मोकळा वेळ मिळाला की मी शिवाजी पार्कच्या कट्टयावर जाऊन बसतो. तिथे माझ्याचसारखी संध्याकाळचा मोकळा वेळ घालविण्यासाठी अनेक मंडळी जमलेली असतात. कुणी कट्टयावर गप्पा छाटत बसलेले असतात, कुणी शिवाजी पार्कला राऊंड मारण्यात दंग असतात, तर कुणी शेंगदाणे, भेळ वगैरे टाईमपास खाण्याचा आस्वाद घेत असतात. हा सर्व माहौल निरखीत कट्टयावर शांत बसून राहणं हा माझा आवडीचा छंद. तासादोनतासांच्या या विरंगुळ्यात माणसांचे अनेकविध नमुने पाहायला मिळतात. पार्कवर फिरायला येणारी ही मंडळी कोण असतील, त्यांची घरची बॅकग्राऊंड काय असेल एवढंच नव्हे तर त्यांचा स्वभाव कसा असेल याचे तर्क लढवीत बसलं की वेळ सहज निघून जातो. हातापायांच्या व्याधींनी त्रस्त मंडळी व्यायामासाठी पार्कला रडतखडत फेऱ्या मारताना पाहिली की आपली तब्येत अजून बऱ्यापैकी ठाकठीक आहे याचं समाधान मिळतं आणि काहींच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव टिपले की आपल्यापुढील समस्या अगदीच किरकोळ असाव्यात याची शाश्वती मिळते. तासाभरानंतर मनाला तरतरी येते आणि आज चांगला विरंगुळा मिळाला याचं समाधान वाटतं. म्हणूनच संध्याकाळी थोडा मोकळा वेळ मिळाला की शिवाजी पार्कच्या कट्टयावर जाऊन बसणं मला मनापासून आवडतं.

कट्टयावर वेगवेगळ्या वयोगटांचे ग्रुप्स संध्याकाळचा आनंद लुटण्यात दंग असतात. तरुणांचे ग्रुप्स दंगामस्तीत व्यग्र असतात. कुणी बाईकवरुन जातयेत असतं, कुणी मोबाईलवरील गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरीत असतं तर कुणाचा नुसताच आरडाओरडा सुरु असतो. सळसळणाऱ्या रक्ताच्या या तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. अर्थात या तरुणांमध्ये तरुणीही सहभागी झालेल्या असतात. या तरुणींचा उत्साह आणि त्यांची दंगामस्ती तरुणांपेक्षा कांकणभर अधिकच भासते. युवा पिढीचं हे उत्साहाने बागडणं पाहिल्यानंतर मनात नकळत आपल्या मनातील तरुणपणाच्या स्मृती जागृत होतात. आपण कधी आणि कुठे आपल्या मित्रांना भेटत होतो, कुठल्या विषयांवर आपले हास्यविनोद रंगत असत याची उजळणी होते. मन एका वेगळ्याच विश्वात भ्रमंती करु लागतं.

पार्कच्या कट्टयावर बसणाऱ्या वयस्क मंडळींच्या ग्रुप्सचं मला मोठं अप्रूप वाटतं. जीवनातील सर्व खेळी खेळून झाल्यानंतर निवृत्तीचं आयुष्य जगणारी ही मंडळी. या मंडळींचे बोलण्याचे विषय काय असतील, यांच्या कसल्या चर्चा झडत असतील याची मला फार दिवसांपासून उत्सुकता होती. एक दिवस मी मुद्दामहून या मंडळींच्या शेजारीच ठाण मांडून त्यांच्या गप्पा ऐकण्याचं ठरवलं. गुडघेदुखीनं आपल्याला कसं हैराण केलं आहे, सून वेळेवर कधीच चहा देत नाही, असल्या तक्रारींचे सूर आता आपल्याला ऐकायला मिळणार याची मला खात्री होती. मात्र त्यांच्या गप्पा ऐकल्यानंतर मी अक्षरशः चकीत झालो. एक जख्ख म्हातारेसे गृहस्थ चक्क परवीन बाबीने स्यूसाईड का केलं यावर हळहळ व्यक्त करीत होते! जवळ बऱ्यापैकी पैसा अडका असताना परवीन बाबीने आत्महत्या का करावी याचा संभ्रम त्या आजोबांना पडला होता आणि त्यांचा मित्रपरिवारही या चर्चेत उत्साहाने सामील झाला होता! जीवनाचा आनंद आकंठ लुटण्याची त्यांची हौस मला कौतुकास्पद वाटली. केवळ दिवसाचीच नव्हे तर आयुष्याची संध्याकाळही ही मंडळी मजेत जगत होती.

शिवाजी पार्कला राऊंड मारणारी अनेक मंडळी माझ्या आता परिचयाची झाली आहेत. म्हणजे या मंडळींची माझी प्रत्यक्ष ओळख झालेली नाही. मात्र त्यांचे चेहरे मी ओळखतो. चालण्याच्या त्यांच्या लकबी मी मनात टिपल्या आहेत. ही मंडळी दिसली की फारा दिवसानंतर मित्र भेटावा असा आनंद मला होतो. या मंडळींतल्या एका अतिउत्साही म्हाताऱ्याचा पेहराव मला मात्र खटकतो. मांडयांपासून संपूर्ण पाय उघडे टाकणारी आगदी छोटीशी चड्डी, बिनबाह्यांचा बनियन आणि मानेवर लटकणारा पिकलेल्या केसांचा बुचडा अशा विक्षिप्त पेहराव्यात हे गृहस्थ रोज संध्याकाळी शिवाजी पार्कला राऊंड मारण्यासाठी येतात. त्यांना पाहिल्याबरोबर चारचौघात जरा चांगल्या कपडयात वावरत जा असा सल्ला त्यांना द्यावा असा विचार मनात येतो. पण मी उठत नाही. जो पोषाख घालायला त्या सद्गृहस्थाला स्वतःला लाज वाटत नाही, आणि शिवाजी पार्कवर जमलेल्या अन्य कुणालाही त्यांच्या पेहरावाबद्दल काहीच वाटत नाही त्याच्याबद्दल तक्रार करण्याचा आपल्याला काय अधिकार अशी स्वतःची समजूत घालून मी शांत बसून राहतो. कधीकाळी या गृहस्थाची आपली ओळख झाली तर मात्र त्याला खडे बोल सुनवायचे असंही मी मनातल्यामनात ठरवून गप्प राहतो.

शिवाजीपार्कवर संध्याकाळी आणखी हमखास दिसते ती एका मायलेकींची जोडी. यातील लेक बहुधा कॉलेजात वगैरे जात असावी. टी शर्ट आणि जीन्स हा नव्या पिढीचा पेहराव तिने अंगावर चढवलेला असतो. तिची आई तशी साडीतच असते. मात्र गंमत अशी की त्या दोघीत ती आईच अधिक तरुण दिसते! मला राहूनराहून आश्चर्य वाटतं ते याच गोष्टीचं. संसारात विवंचनांना तर सर्वांनाच सामोरं जावं लागतं. या विवंचनांचं जाळं नकळत माणसांच्या चेहऱ्यावर आधी उमटतं. अगदी कितीही सुखवस्तु कुटुंबातील व्यक्ती असली आणि फारशा विवंचना नसल्या तरी वयानुसार चेहऱ्यावर थकवा हा जाणवतोच. मग एका वयात आलेल्या मुलीच्या त्या आईचा चेहरा स्वतःच्या मुलीपेक्षाही अधिक टवटवीत कसा राहतो? शरीर सौष्ठव जपण्याचे कोणते रहस्य त्या स्त्रीला उमगलं असावं? या मायलेकी समोरुन गेल्या की माझ्या मनात हे विचार पिंगा घालू लागतात. अर्थात इथेही मला शांतच बसून राहावं लागतं. त्या मायलेकींशी संवाद साधणं अशक्यच असतं. मायलेकी पुढे निघून गेल्या की मी अन्य मंडळींचे चेहरे निरखू लागतो.

शिवाजी पार्कच्या फेरीवाल्यांना निरखण्यातही माझा बऱ्यापैकी वेळ जातो. रुपया दोन रुपयांचे चणेशेंगदाणे विकणाऱ्या त्या भैयाच्या हाती दिवस अखेरपर्यंत किती मिळकत जमा होत असावी? या अगदीच तुटपुंज्या मिळकतीत तो आपल्या संसाराचा गाडा कसा हाकत असावा? चणेशेंगदाणे विकणाऱ्या भैयाचा हा कदाचित पार्टटाईम बिझिनेस असावा. पण त्या कुल्फीवाल्याचं काय? दिवसा राबराबून बिचारा कुल्फी तयार करत असावा आणि संध्याकाळी ती विकण्यासाठी वणवणत असावा. कसं भागतं या मंडळींचं अशा नगण्य व्यवसायांवर? प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. माझ्या विचारांचं चक्र भरकटतच राहतं.

सूर्य कलला की शिवाजी पार्कच्या शेजारी वसलेल्या खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सवर खाद्यप्रेमी मंडळींची जत्रा जमू लागते. शेवपुरी, पाणीपुरी, वडापाव, बर्गर, फ्रॅन्की, बर्फाचे गोळे यावर जिभेचे चोचले पुरविण्यात आनंद मानणारी मंडळी तुटून पडतात. तासदोन तास बसून माझ्याही पायाला रग आलेली असते. मी कट्टयावरून खाली उतरतो. थोडे पाय झटकून चालू लागतो. जाताजाता एखादं आईस्क्रीम मीही विकत घेतो. आईस्क्रीमची मधुर चव जीभेवर रेंगाळते. मनात शिवाजीपार्कचा तो प्रसन्न माहौल रेंगाळतच असतो. पुन्हा कधी मोकळा वेळ मिळाला की कट्टयावर नक्की यायचं असा बेत पक्का करत मी सपासप चालू लागतो. शिवाजीपार्क मागे राहतं. मी माझ्या दैनंदीन व्यापात व्यग्र होतो.

– सुनील रेगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..