आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले.
बाबासाहेब पुरंदरे यांचा अल्पपरिचय
बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म.२९ जुलै १९२२ रोजी पुण्याजवळच्या सासवड गावी झाला.
अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पदार्पण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
‘शिवशाहीर’ हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहतात ते अटकर कोट-जाकिटातले, हिमसफेद दाढी आणि मानेवर रुळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र जटा सांभाळत हजारोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे. ‘शिवाजी महाराज’ हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहिरांनी आयुष्यभर जपला आणि या मंत्राच्या साह्याने ‘वन्ही तो चेतवावा। चेतविता चेततो।’ या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ दूर केली. बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं होते.
त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण तरुणपणापासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या लेखनातून व व्याख्यानांतून शिवकाळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य होय.
शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाच्या १८ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, काही कादंबऱ्या तसेच किल्ल्यांचे वर्णन करणारी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४ रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे हे नाटक ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे महानाटय़ असून याशिवाय हत्ती, घोडे, उंट, बैलगाडय़ांचा या महानाटय़ात समावेश असतो.
२०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली होती. जाणता राजा या महानाट्याचे अमेरिका, लंडनसह भारतात महाराष्ट्र, गुजरात, कनार्टक, मध्यप्रदेश, राजस्थान छत्तीसगढ, गोवा या राज्यांतील अनेक शहरात प्रयोग झाले आहेत.
इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहूणे श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ते ‘माणूस’ मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. बाबासाहेब-गोनीदा ही जोडी म्हणजे शिवचरित्राचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे दूतच झाले. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही! शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच.
स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेबांनी सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते. आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, पु.ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी, मंगेशकर कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. या सर्वांच्या माध्यमातून,सहकार्यातून त्यांनी शिवचरित्रप्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले.महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते.
’शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले.
शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच!
बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply