माणसाच्या तोंडात सदैव असलेली गोष्ट म्हणजे शिवी. क्रोध,तिरस्कार व्यक्त करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. त्या सर्वच भाषेत उपलब्ध आहेत. कधी राग आला म्हणून तर कधी राग यावा म्हणून शिव्यांचा उपयोग होतो.अगदी जन्मापासूनच त्याचे बाळकडू मिळते.
लहान मुले आई बापावरुन शिव्या घालतात.पुढे बहिण वगैरेंचा उद्धार होतो.आई,वडील आणि बहिण यांचा शिव्यांसाठी जास्त वापर होतो.विवाहित असेल तर बायकोच्या नावाने शिवी दिली जाते. सभ्य लोक अत्यंत सभ्य शिव्या देतात.असभ्य लोकांकडे त्याची कमतरता नसते.शिवी मनातल्या मनात देखील दिली जाते.शिवीमध्ये तिरस्कार असतो.मित्रामंध्ये गंमतीने त्या दिल्या आणि घेतल्या जातात.
बायांच्या भांडणातील शिव्या पुरुषांना लाजवतात.काही माणसे गरज नसतांना शिव्या देतात. अर्थात त्या कुणी मनावर घेत नाही. शिव्या देण्याचा काहींचा स्वभाव असतो.बरीच माणसे राग शिव्यावाटे व्यक्त करतात. मित्र मैत्रीपूर्ण शिव्या देतात.शिव्यांचे आपले एक वजन असते. लहान शिव्यांनी इच्छित यश येत नसेल तर वजनदार शिव्यांचावापर होतो.शिव्या हे तोंडावाटे मारा करणारे शस्त्रच असते. इतरांना घाबरविण्यासाठीही शिव्यांचा वापर होतो.अनेक शिव्या रोजच्या वापरातल्या वस्तू प्रमाणे झाल्या आहेत.खुप शिव्यांचे अर्थ उलगडून कुणी बघत नाही, फक्त शिवी या सदरात ती मोडते.शिव्यांचा वापर सिनेमात देखील होतो.कुठल्याही भांडणाची सुरुवात शिव्याने होते. शिव्यांचा कोटा संपला की मग हाताचा वापर होतो.
शिवी कोण देतय यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो.घरातील भांडणात नाव न घेता शिव्या दिल्या जातात. परिणाम मात्र अचूक होतो.कधी कधी लेकी बोले सूने लागे,या उक्तीप्रमाणे वापर होतो. शाळेत अनेक शिक्षक शिव्या देतात,एखादी तरी शिवी जवळ बाळगून असतात. गाढवा,मूर्खा ,नालायक असल्या सौम्य शिव्यांचा वापर होतो.काही शिव्या खुप जहाल असतात.शिवी कोणती दिली यावरुन रागाची तीव्रता कळते.शिव्या हे राग व्यक्त करण्याचे अमोघ शस्त्र आहे.शिवी न खाल्लेला माणूस शोधणे कठीण.
शिव्या मनावर न घेणारे लोक असतात,शिवी सहन होणारे ही असतात.सहजच शिवी घालणे कित्येकांचा सवयीचा भाग असतो तर कुणाचे शिवीशिवाय पान हलत नाही.शिवी चालतांना स्वर चढलेला असतो.शिव्या पुटपुटल्याही जातात.शिवीमधून राग,संताप, तिरस्कार व्यक्त होतो.शिवी ही पूर्वसूचनाच असते. काही माणसे साध्या बोलण्यात देखील शिव्या घालतात. शिव्या हि युद्धाची सुरुवात असते, किंवा युद्ध जन्य परिस्थिती निर्माण करतात. कुणी समोर शिव्या देऊ शकत नसेल तर माघारी देण्याची सुविधा देखील आहे. शिव्या मानवाची गरज आहे. शिव्या देणे आणि शिव्या खाणे कधीच संपणार नाही.
— ना.रा.खराद
Leave a Reply