मध्यमवयात खांदादुखीला सुरुवात झाल्यास अनेक कारणे असू शकतात. याही वयात खांदा वळविणाऱ्या स्नायूंना इजा होऊ शकते. निरनिराळ्या प्रकारच्या संधीवाताच्या रोगामुळे खादा दुखू शकतो. अनेक वेळा मानेतील हाडात वयोमानाने होणाऱ्या बदलाने (स्पॉन्डिलेसिस) तसेच दोन मणक्यातील गादी सरकल्याने खांद्याच्या भागात तसेच खांद्याच्या आजुबाजूला दुखू शकते. पुन्हा पुन्हा एकच प्रकारचे छोटे वजन उचलण्याचे किंवा सुतारासारखे सतत हातोडा चालविण्याचे काम केल्याने खांद्याभोवती असलेल्या बायसेप्स या स्नायूच्या टेन्डनना सूज येते व खांदा दुखू लागतो.
कधी कधी सुप्रास्पोयनॅटस या स्नायूच्या टेन्डनमध्ये रक्ताद्वारे बरेच कॅल्शियमचे चुन्यासारखे पांढरे डाग येऊन पडतात आणि रुग्णाला दुखू लागते. काही वेळा गोळ्यांनी ते आटोक्यात येत नाही तर निरनिराळ्या प्रकारच्या शस्त्रक्रियांच्या उपायांनी हे कॅल्शियम बाहेर काढून टाकल्यास रुग्ण खडखडीत बरा होतो.
खांद्याचा जंतूसंसर्ग तसा विरळाच; परंतु आपल्या देशात टीबीचे प्रमाण अधिक असल्याने कधीकधी खांद्याच्या सांध्याचा टीबी उद्भवू शकतो. योग्य चिकित्सेनंतर टीबी विरोधी औषधांनी तो पूर्ण बरा होतो. काही रुग्णांना खांदा वर डोक्याकडे घेताना दुःख होते. अशावेळी ह्युमरस हे खांद्याचे हाड व ॲक्रोमियन हे दुसरे हाड यामधील अंतर कमी झालेले असते. ॲक्रोमियन हे हाड शस्त्रक्रिया करून तासून टाकल्यास रुग्ण बरा होतो. अर्थात हे करण्यापूर्वी एम.आर.आय. चिकित्सा करावी लागते. खांद्याच्या हाडात कधीकधी काही गाठी (सिस्ट) निर्माण होतात. हे बहुधा जन्मजातही असतात व पूर्ण वाढ झाल्यावर दृष्टोत्पत्तीस येतात.
अशावेळी पुढे या भागात हाड कमकुवत होऊन तुटू नये म्हणून शस्त्रक्रिया करून दुसऱ्या भागातून हाड काढून येथे रोपण केले जाते. खांद्याच्या जवळ मोठे फ्रॅक्चर झाल्यास योग्य शस्त्रक्रिया वेळीच करून ते बसवावे लागते. नाहीतर खांद्याची हालचाल कायमची गमावून बसावे लागेल. प्रत्येक खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर योग्य फिजिओथेरपी केल्यासच चांगले यश मिळते.
-डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply