मालवणपासून १५ कि.मी. अंतरावर असणार्या मसूरे या गांवातील बारा वाड्यांपॆकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गांवच असल्याचा समज सर्व-सामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे.
श्री भरडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. साधारणत: ३०० वर्षापूर्वी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची कथा आहे. आंगणे नामक ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ठ ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी, देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करु लागले. ‘भरड’ भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरुपी देवी अवतरली म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात. या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते कि, ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाहीत.
देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर ? अशी भिती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर नेऊ देत नाहित. असे या नवसाला पावणार्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे. जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो.
या देवीचा जत्रॊत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातून होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. देवदिवाळी झाल्यानंतर देवीचा डाळप विधी (मांजरी बसणं) होतो. या विधीमध्ये आंगणेवाडीतील ठरावीक ठिकाणी पुजारी, गुरव, आंगणे कुटुंबीय व इतर यांसह सहभोजन केलं जातं, या वेळी जत्रेचं नियोजनही ठरवलं जातं. हा विधी झाल्यानंतर मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. ‘‘शिकारेक संपूर्ण गाव जमतोलो, शिकार करुक तू हुकुम दे, शिकार साध्य करून दी…’’ असे गार्हाणे घालून कौल लावला जातो. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला, की सात ते आठ जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते. यालाच ‘रान धरणं’ असं म्हटलं जातं.जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील काम होत नाही.पारध म्हणून डुकराची शिकार झाल्यानंतर, या शिकारीची गावातून मिरवणूक काढली जाते.
मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. तिथे डुकराचे मांस सुटे करून ‘कोष्टी’(प्रसाद) म्हणून वाटले जाते. या पारधीनंतर पुन्हा देवीचा कौल घेतला जाऊन जत्रेची तारीख निश्चित केली जाते. गावाबाहेर इतरत्र असलेल्यांना या जत्रेची तारीख जाहीर होण्याबाबत प्रचंड उत्सुकता असते.
नवसाला पावणारी म्हणून देवीची ख्याती असली तरी कोंबड्या-बकर्यांच्या बळीचे नवस मात्र यात्रेमध्ये आढळत नाही. देवीला सोन्या-चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडी चोळी, नारळाचे तोरण घातले जाते.उत्सवादिवशी देवीची स्वयंभू पाषाण मूर्ती अलंकारांनी सजविली जाते. या पाषाणास मुखवटा घालून
साडीचोळी नेसविली जाते. संपूर्ण अलंकार धारण केलेलं देवीचं रूप मनात घर करून जातं. जत्रेच्या पहिल्या दिवशीच पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांच्या ओटय़ा भरण्यास प्रारंभ होतो. या दोन दिवसीय उत्सवामध्ये देवीचं रूप अवर्णनीय दिसतं. देवीची ओटी खणानारळानं, तर नवस तुळाभारानं फेडले जातात. ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, तांबे याची तुलाभार करून देवीला वाहिली जाते. तुलाभार हा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी झुंबड उडालेली असते.याशिवाय आगळावेगळा नवस म्हणजे भिक्षा मागण्याचा. जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून रात्री देवीला दाखवलेल्या प्रसादापैकी शिते भिक्षा मागून ग्रहण केली जातात. त्यानंतरच उपवास सोडला जातो.यात्रेदिवशी रात्री नऊनंतर देवीचे दर्शन बंद केले जाते. मंदिराची साफसफाई झाल्यावर देवीसमोर नैवेद्याची ताटं लावण्याचा (देवीचा महाप्रसाद) हा कार्यक्रम असतो.हा मान आंगणे समाजातील कुटुंबांचा असतो. उत्सवाच्या दिवशी आंगणे कुटुंबीय उपवास करतात. आंगणेच्या प्रत्येक घरातील एक सुवासिनी प्रसादाची ताटे घेऊन मंदिराकडे येतात. त्या उत्सवात सामील होणार्या आंगणे कुटुंबीयांच्या लेकी व सुनांनी ओटीचे सामान (खण, नारळ इत्यादी) व नवस असेल तर साडी आपल्या सोबत आपल्या घरूनच घेऊन यावे, अशी पूर्वापार प्रथा आहे.
जत्रेच्या दिवशी रात्री हा विधी झाल्यानंतर आंगणे कुटुंबीयांच्या घरी महाप्रसाद घेऊन हा उपवास सोडला जातो. जत्रेचा दुसरा दिवस हा मोड जत्रेचा असतो. या दिवशी इतर ग्रामस्थ देवीची ओटी भरून दर्शन घेतात. मसुरे पंचक्रोशीचं आराध्य दैवत असलेल्या या भराडी देवीची ही जत्रा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्याचा योग वर्षातून एकदाच लाभतो.
Leave a Reply