उदञ्चदृभुजावल्लरीदृश्यमूलोच्चलद्भ्रूलताविभ्रमभ्राजदक्षम् !!
मरुत्सुंदरीचामरै: सेव्यमानं !
गणाधीशमीशानसूनुं तमीडे !! ५!!
भगवान श्रीगणेशांच्या निवास लोकांला ‘श्रीस्वानंदलोक’ असे म्हणतात. तेथे भगवान गणेश आपल्या सहस्रदल कमळावर विराजमान असतात. त्यांच्या सेवेसाठी अष्ट महानायिका सुसज्ज असतात. विविध साधनांनी त्या भगवंताची सेवा करतात. त्या सेवा करणाऱ्या दिव्य अप्सरांचे वर्णन प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी केलेले आहे.
उदञ्चदृभुजावल्लरीदृश्यमूल- पूज्य आचार्य श्री शब्द योजतात ‘भुजावल्लरी’. वल्लरी शब्दाचा एक अर्थ आहे स्त्री. तो घेतला तर भुजावल्लरी याचा अर्थ स्त्रियांचे हात. त्याचप्रमाणे वल्लरी शब्दाचा दुसरा अर्थ आहे वेल. तो स्वीकारला तर भुजावल्लरी म्हणजे वेलीं प्रेमाणे नाजूक असणारे हात. गंमत म्हणजे दोन्ही लागू पडतात. तसेच दोन्हीचे एकत्रीकरण करून ‘स्त्रियांचे वेलीप्रमाणे नाजूक हात.’ असा अधिक सुंदर अर्थ होतो. असे ते हात उंच उभारल्यामुळे सुंदर दिसणारे दृश्य ते, उदञ्चदृभुजावल्लरीदृश्यमूल.
च्चलद्भ्रूलताविभ्रमभ्राजदक्ष- भ्रू अर्थात भुवई. त्यांची नाजुक सुंदर रचना म्हणजे भ्रूलता. त्यांनी नेत्रांनी जे एक कटाक्ष टाकले जातात ते भ्रूलताविभ्रम. हे नेत्र चंचल असल्यामुळे त्याचाही उल्लेख केला.
भ्राज शब्दाचे नाजूक आणि सुंदर असे दोन अर्थ आहेत. नेत्र कटाक्षांना ते दोन्ही लागू पडतात.
अशा नेत्र कटाक्षां मध्ये त्या सेविका दक्ष असल्याने, च्चलद्भ्रूलताविभ्रमभ्राजदक्ष.
मरुत्सुंदरीचामरै: सेव्यमान- मरुत् अर्थात देवता. त्या स्वर्गीय दैवी सुंदरी, मरुत्सुंदरी. त्यांनी मोरयाला वारा घालण्यासाठी हातात चवरी घेतली आहे. त्या ज्यांची सेवा करतात ते मरुत्सुंदरीचामरै: सेव्यमान.
भगवान शंकरांच्या घरी अनेक अवतार घेतल्याने शिवसुत म्हणविल्या जाणाऱ्या या गणाधीशाची वंदना करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply