यमेकाक्षरं निर्मलं निर्विकल्पं !गुणातीतमानन्दमाकारशून्यम् !!
परं पारमोंकारमाम्नायगर्भं !
वदन्ति प्रगल्भं पुराणं तमीडे !!७!!
भगवान श्री गणेशाच्या निर्गुण-निराकार स्वरूपाला अत्यंत सुस्पष्ट रीतीने आपल्या समोर ठेवणारा हा श्लोक.
यमेकाक्षरं – या पहिल्याच पदात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज श्री गणेशांच्या ओंकार स्वरूपाचे वर्णन करीत आहेत. एकाक्षर हा शब्द ॐ कारा करिता योजिला जातो. ‘ ॐ इति एकाक्षरं ब्रह्म ! ‘ अशी शास्त्राची स्पष्ट कथनी आहे. ॐकारालाच एकाक्षर ब्रह्म असे म्हणतात. तेच श्री गणेशांचे स्वरूप आहे. श्री गणेशच ॐकार ब्रह्म आहेत.
निर्मल- शास्त्रामध्ये मायेलाच मळ असे म्हटले आहे. त्या मायेच्या पार असणारे, मायामल विरहित शुद्ध परब्रह्म आहे निर्मल.
निर्विकल्पं- निर्विकल्प अर्थात पर्यायरहित. विकल्प शब्दाचा अर्थ आहे दोन किंवा अधिक पैकी एक निवडण्याची समस्या. ‘हे की ते?’ हे आहे विकल्पाचे स्वरूप. मोरया च्या सोबत अन्य कोणत्याही बाबतीत पर्यायच नाही. ते एकमेवाद्वितीय असल्याने त्यांना निर्विकल्प असे म्हणतात.
गुणातीत- तिन्ही गुणांच्या अतीत.
आनंद हेच ज्यांचे स्वरुप आहे.
आकार शून्य- साकारतेच्या पार, निराकार. आकारासह ते सगुण- साकार. मोरया निर्गुण निराकार. त्यामुळे आकारशून्य.
परं पार – सर्वाधिक श्रेष्ठ ते पार. त्याच्याही पलीकडे परं पार. ज्येष्ठाहून ज्येष्ठ. ज्येष्ठराज.
सर्व श्रेष्ठ तत्वांना ब्रह्म असे म्हणतात. सगळ्या ब्रह्मांचे अधिपती, श्री ब्रह्मणस्पती. त्यामुळे परंपार.
ओंकार ब्रह्म हेच ज्यांचे स्वरूप आहे असे.
आम्नायगर्भ- आम्नाय म्हणजे वेद, शास्त्र. त्याचा गर्भ अर्थात अंतस्थ अर्थ. कथनीय. भावार्थ. रहस्य. असे ते आम्नायगर्भ.
प्रगल्भ अर्थात परिपूर्ण.पूर्ण विकसित. प्रफुल्लित.
पुराण अर्थात प्राचीनतम.आदितत्व. मूलतत्व.
अशा स्वरूपात वर वर्णिलेल्या स्वरूपात शास्त्रकार ज्यांचे वर्णन करतात त्यांना मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply