नवीन लेखन...

श्री गणेश जन्मकथा

श्री गणेशा नमुनी तुला
नंतर नमितो कुलस्वामिनीला
मातापूरवासिनी रेणूकेला
कृपा प्रसादे   ।१।

तुझा महिमा असे थोर
दुःख नष्ट होती सत्वर
कृपा करिसी ज्याचेवर
पावन होत असे   ।२।

गणेश जन्मकथा सांगतो
तयाचा महिमा वर्णितो
आनंदीभाव समर्पितो
तुम्हासाठी   ।३।

सर्व दुःखे दुर कराया
तुम्हांसी सुखे द्यावया
जन्म घेती गणराया
तुम्हां करिता   ।४।

असतील देव अनेक
देवाधीदेव महादेव एक
सर्व विश्वाचा अधिनायक
तयामध्ये कैलासपती   ।५।

शिवपत्नी पार्वती
रही कैलास पर्वतीं
माता जगताची ती
उमादेवी   ।६।

उमाशंकर मिळून
सर्व जगाते सांभाळून
कैलासावरी राहून
पालनपोषण करताती   ।७।

एके दिनी सकाळी
पार्वति निघाली अंघोळी
पुष्पे घेऊन निरनीराळी
पुजेसाठी   ।८।

आनंदी उमादेवी
शिवप्रतिमा मनी वसवी
अंतःकरणी ती रमवी
रुप सदाशिवाचे    ।९।

स्नानास निघाली पार्वती
पूजासाहित्य बाहेर ठेवती
मनी विचार करि
प्रेमभरे   ।१०।

बेसोनी स्नानघराबाहेर
मनींते बहूत विचार
विचारांना देती आकार
आनंद रुपे    ।११।

हाळद घेतली हातीं
चंदन मिश्रीत गोळी करी ती
बाळरुप प्रतिमा बनविती
तयापासून   ।१२।

जगन्माता पार्वती
विश्वाची श्रेष्ठ शक्ति
कोतुके बाळ पाहे ती
हर्षभरे    ।१३।

सचेतन केला बाळ
प्रेमे आलिंगुनी जवळ
घालितसे पुष्पमाळ
कंठी ज्याचे    ।१४।

बाळाचे तेज निराळे
सुवर्णापरी रुप आगळे
तयाचा महिमा कुणा न कळे
पार्वतीविणे    ।१५।

धावूं लागला छोटा बाळ
आनंदून गेली उमा सकळ
शिरी बांधली पुष्पमाळ
पार्वतीने    ।१६।

बाळासंगे खेळली
स्नानाची तिज आठवण झाली
सांगतसे माय माऊली
बाळाते जवळी घेवूनी   ।१७।

तू एक काम करावे
दारापाशी बसून राहावे
आंत कुणा येवू न द्यावे
आज्ञा माझी    ।१८।

आनंदे लागला बागडूं
कुणासंगे ही लढू
परत जाण्या भाग पाडू
ह्या विचारी    ।१९।

आज्ञा केली मातेने
पाळीन मी आनंदानें
रोकीन तयाते बळजबरीनें
बाळ बोले    ।२०।

छोटे शस्त्र हाती देऊनी
पार्वती सांगे समजावूनी
वाट तयाची रोकूनी
धराविसी    ।२१।

पार्वती गेली स्नानासी
बैसवुनी बाळा द्वारासीं
द्वारपाल तो बनलासी
बाळ माझा   ।२२।

बाळ आनंदे फिरु लागला
तिकडून शिव आला
स्नानगृही जाऊ लागला
बाळ रोके त्यासी   ।२३।

हांसु लागला बाळ बघोनी
कौतूक तयाचे करुनी
प्रेमभरे जवळ घेऊनी
सदाशिवे   ।२४।

शिव चालला स्नानगृहात
बाळ त्याला रोखीत
तुम्ही न जावे आंत
सांगे बाळ   ।२५।

प्रथम त्याचे कौतूक केले
आंत सोडण्या विनविले
वाकून बाळ आलिंगले
विश्वनाथे   ।२६।

कोप आला शिवासी
पाहूनी बाळ हट्टासी
त्याच्या विरोधासी
बघुनिया   ।२७।

बाळ असूनी लहान
मुर्ति गोंडसवानी छान
जगन्मातेची शक्ति अंगिकारुन
प्रतिकार करु लागला   ।२८।

बाळाअंगी पार्वतीचे बळ
म्हणून झाला निश्चयी अवखळ
कांही सुचेना तये वेळ
विश्वेश्वरासी   ।२९।

असे तो जगनेमातेचे बाळ
तयामध्ये विश्वाचे बळ
कठीण वाटली शिवे ती वेळ
तयासी पाहूनी   ।३०।

बाळ हट्टाने पेटून
शिवाचा करिती अपमान
द्वारी त्याना रोखून
अडवितसे    ।३१।

राग येवू लागला मनीं
समज न येई बाळा सांगुनी
संताप आला तत्क्षणी
क्रोधाग्नी पेटला   ।३२।

हांती घेऊनी त्रिशूळ    बनता बाळाचा काळ
शिरच्छेद केला तत्काळ    बाळाचा   ।३३।

बाळ पडला धारातीर्थी
धडावेगळे शरीर होती
तत् क्षणीं निश्चेष्ट पडती
जमिनीवर   ।३४।

पार्वती आली बाहेरी
नजर आता बाळावरी
दुःख होतसे मनावरी
मृत बाळ बघूनिया    ।३५।

एकदम निराश झाली
सारी स्वप्ने धुळीस मिळाली
हूरहूर मनी  लागली
पार्वतीस     ।३६।

शोक न तिजला आवरे
मृत बाळ बघूनी गोजिरे
ज्या पाही ती प्रेमभरे
पार्वती देवी   ।३७।

खिन्न मनाने बैसली
दुःखाश्रु पडती खाली
अत्यंत निराश झाली
उमादेवी   ।३८।

शिव झाले शांत
बघूनी उमेचा आकांत
तियेसी देवूनी हात
उठवितसे   ।३९।

बघूनी शिवाचे शांत रुप
गेला होता त्यांचा कोप
सोडूनी द्यावे मनातील ताप
पार्वती बोले   ।४०।

माझ्या बाळा जीवदान द्यावे
त्याच्या बालहट्टा क्षमावे
विनवितसे जीवेभावे
पार्वतीदेवी   ।४१।

स्तुती केली ईश्वराची
पूजा करुनी शिवाची
विनंती करिसी त्याची
बाळप्राणा   ।४२।

बघूनी पार्वतीभक्ति
पावला उमापती
बाळासी जीवदान देती
सदाशिव   ।४३।

आज्ञा केली शिवगणा
कैलासतील जावे वना
दिसेल  प्राण्याचे शिर आणा
प्रथम दर्शनी   ।४४।

गेले आनंदे शिवदूत
शिर मिळवण्या वनांत
बघितला छोटा ऐरावत
सरोवरी बागडतसे   ।४५।

गजराजाचे शिर छाटले
घेवूनी शिवदूत आले
शिवचरणी अर्पिले
ऐरावत शिर    ।४६।

उठवोनी बाळ शरीर
घेऊनी गजराजाचे शिर
ठेवती तयाचे वर
बाळाचे शरिरी

शिवशक्ति प्राण घातले
पूर्ववत् ते सचेतन पावले
मानवी देही दिधले
गजराज शिव   ।४७।

नवीन बाळ जन्मास आले
गजशिर मानव देह दिधले
माता-पित्यास वंदन केले
बाळ राजे    ।४८।

शिवपार्वतीचे बाळ जाहले
गजानन तयाचे नांव ठेवले
शिवदूतें कौतूक केले
गणेशाचे ।४९।

शिवपार्वतीची अपूर्व शक्ति
गणेशाते मिळती
दोन्ही तेज एकरुप होती
गणेशामध्ये    ।५०।

महादेव आशिर्वाद दिधला
गणेशाते श्रेष्ठ ठरविला
प्रथम पुजा मान तयाला
सर्व देवांमाजी    ।५१।

प्रथम पुजा श्री गणेशाची
कार्ये होतील सार्थ नंतरची
हीच असेल प्रथा पूजेची
आज्ञा केली शिवे   ।५२।

सर्व संकटे निवारसी
कार्ये नेती सिद्धीसी
दुःखापासून मुक्त करिसी
गणेश कृपें   ।५३।

विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती
कार्ये निर्विघ्न पार पडती
सुख समृद्धी घरी नांदती
त्यांचे आशिर्वादे   ।५४।

तू होशील ज्ञानदेवता
सकळजण तुज वंदिता
प्रसन्न होऊनी ज्ञान देता
विद्वान होतील ।५५।

श्री गणेश जन्मसोहळा
सर्वाना भासे आगळा
आकाशातून वाहती पुष्पमाळा
सर्व देव मिळूनी   ।५६।

पुष्पांची वृष्टी केली
पृथ्वीमाता पावन झाली
तिच्यावरील दुःखे शमली
श्री गणेशामुळे   ।५७।

गणेश दैवत सुख समृद्धीचे
ज्ञानविज्ञानाचे
कार्य सिद्ध करिसी सर्वांचे
प्रथम मान तुला   ।५८।

गणेश दैवत सुखसमृद्धीचे
ज्ञानविज्ञानाचे
कार्य सिद्ध करीसी सर्वांचे
प्रथम पुजामान तुला   ।५९।

वंदन तुज गणराया
सर्वांचे भले कराया
सर्व समभाव मनीं यावया
कृपा करावी    ।६०।

रोज  एकदा स्त्रोत्र म्हणूनी
एकविस दुर्वा लाल फूल वाहूनी
गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवूनी
गणेशा पूजावे   ।६१।

नित्यनियमे पठन करावे
चतुर्थीला एकविस आवर्तने
भक्तिभाव मनीं ठेवणे
भक्तासि पावतसे    ।६२।

भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थीला
श्री गणेशाचा जन्म जाहला
आनंदे सण उत्सावूं लागला
सकळजन    ।६३।

।। शुभं भवतू  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

२- ०८०८८३

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..