( माहूर – मातापुर वासिनी )
श्री रेणुका देवि जगदंबे
पार्वती आदिशक्ती तूं प्रारंभे
शरण आलो तुज अंबे
कृपा करी मजवरी ।।१।।
कोल्हापुरी लक्ष्मी तुळजापुरी भवानी
रेणीका देवी माहूर वासिनी
सप्तशृंगी राहते गडवणी
कुलस्वामिनी महाराष्ट्राच्या ।।२।।
श्री रेणुकेची महती थोर
करण्यास दुष्टांचा संहार
अवतार घेती परमेश्वर
तिच्या उदरी ।।३।।
संकटकाळीं धावून येसी
दुरितांचे दुःख दूर करिसी
भक्ताना पावन होसी
थोर तुझा महिमा ।।४।।
मनोंभावे तिला पुजिती
सुख समाधान पावती
दुःखे तयांना न येती
श्री रेणुकेचे कृपे ।।५।।
श्री रेणुकेच्या उदरी
परशुराम अवतरी
त्याची कथा श्रवण करी
पुण्य लाभतसे ।।६।।
दुष्ट मातले फार
ब्रह्मा विनविले सत्वर
पाप हलके करण्या
त्यावेळी ।।७।।
सर्व देवासंगे सागरीं
ब्रह्मा विनविती श्री हरी
पापभार कमी करी
पृथ्वी मातेचा ।।८।।
रेणुकेचे उदरी येईन
परशुराम म्हणून अवतरीन
दुष्टांचा संहार करीन
सांत्वन केले प्रभूनीं ।।९।।
रेणुराजा असे थोर
अपत्याविना दुःखी फार
प्रेम करी प्रजेवर
मनोभावे ।।१०।।
तपश्चर्या केली कठोर
पावला शिव सत्वर
मागतां दिधला वर
कन्या प्राप्तीचा ।।११।।
यज्ञ केला महान
थोर ऋषिगण
जमुनी करती हवन
यज्ञामध्यें ।।१२।।
यज्ञ देवता प्रसन्न झाली
यज्ञातून कन्या अवतरली
रेणुराजाचे हाती दिली
यज्ञ देवतेने ।।१३।।
रेणुराजा आनंदला
जवळ घेऊनी कन्येला
रेणुका दिले नांव तिला
प्रेमभरें ।।१४।।
त्रिभुवन फिरुनी नारद आले
रेणुराजाशी सांगू लागले
भाग्य तुझे उजळले
रेणुकेमुळें ।।१५।।
विश्वचालक ईश्वर
रेणुकेच्या पोटी अवतार
घेईन तो सत्वर
ह्या जगतीं ।।१६।।
रेणुकेसी सांगे नारद
तप करुन व्हावे सिद्ध
मागुनी घ्यावा आशिर्वाद
शिवपार्वती कडून ।।१७।।
पिता आज्ञा मिळूनी
रेणुका गेली तपोवनी
कठोर तपश्चर्या करुनी
शिवपार्वती प्रसन्न केले ।।१८।।
शिव झाले प्रसन्न
रेणुकेस आशिर्वाद देऊन
वर घ्यावा मागुन
शिव बोले ।।१९।।
माझें उदरी ईश्वरी येती
मजला द्यावी पार्वती शक्ति
पतीचे रुपी तुम्ही असती
ही माझी इच्छा ।।२०।।
बघून निर्मळ भक्ति
सदाशिवे ‘तथास्तू ‘ म्हणती
अवतार पेलण्या मिळेल शक्ति
रेणुकेस ।।२१।।
आदिशक्ति पार्वती
रेणुकेमध्यें विलीन होती
जगदंबेचे रुप मिळती
श्री रेणुकेस ।।२२।।
जमदग्नीरुपे शिव अवतरला
रेणुका वरिसी तयाला
पती म्हणूनी संसार केला
त्याच्यासंगे ।।२३।।
वैशाख शुद्ध तृतीयेला
परशुरामाचा जन्म झाला
पृथ्वी पावन करण्याला
ईश्वर अवतरती ।।२४।।
जगन्माता पार्वती
विश्वाची आदिशक्ति
रेणुकेच्या रुपें अवतरती
महाराष्ट्रामध्ये ।।२५।।
महाराष्ट्रातील जिल्हा नांदेड
जवळ आहे माहूर गड
शिखरावर झाली आरुढ
श्री जगदंबा रेणुका ।।२६।।
आश्विन शुद्ध प्रतिपदेला
नवरात्रीचा उत्सव झाला
लाखो भाविक दर्शनाला
जाती गडावरी ।।२७।।
नवरात्रीचे होई पूजन
अष्टमिला होम हवन
भावभक्तीचे वातावरण
जगदंबेच्या चरणीं ।।२८।।
जाऊन एकदा माहूर क्षेत्री
श्री रेणूकेचे दर्शन करी
सुखसमाधान त्याचे घरीं
नांदत असे ।।२९।।
भक्तासाठी येई धाऊनी
दुःख तयाचे दूर करुनी
श्रद्धा नवसास पावोनी
जगन्माता रेणुका ।।३०।।
नित्य स्मरावे जगदंबेला
रेणुका माहूरवासिनीला
मनोभावे पुजावे तिजला
हेच जीवनाचे सार ।।३१।।
“ शुभं भवतु “
डॉ. भगवान नागापूरकर
३- १००९८३
Leave a Reply