सुवक्षोजकुम्भां सुधापूर्णकुम्भां
प्रसादावलम्बां प्रपुण्यावलम्बाम् ।
सदास्येन्दुबिम्बां सदानोष्ठबिम्बां
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् ॥१॥
भगवान गणेशांच्या स्तोत्रांनंतर जगदंबेच्या स्तोत्रांच्या रसग्रहणाला आरंभ करताना आज नेमकी वसंत पंचमी असावी हा नियतीचा सुंदर योगायोग. वसंत पंचमी हा ज्ञानदायीनी देवी शारदेच्या, सरस्वतीच्या पूजनाचा दिवस
भगवान श्री गणेशांच्या नंतर वंदन केले जाते विश्वमोहिनी शारदेला.
भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांच्या श्री शृंगेरी पीठाची अधिष्ठात्री देवता आहे, देवी शारदांबा.
आपल्या या आराध्य देवतेचे, विश्वजननीचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भावविभोर होतात.
माता म्हटल्यानंतर पहिला संबंध येतो तो तिच्याद्वारे प्राप्त होणाऱ्या प्रथम अमृतप्राशनाचा.
व्यक्तिगत मातेच्या या संबंधाला वैश्विक पातळीवर नेत आई जगदंबेच्या विश्वतृप्ती कारक अमृतकुंभाचा विचार करीत
आचार्य म्हणतात, ‘सुवक्षोजकुम्भां सुधापूर्णकुम्भां ‘.
संपूर्ण विश्वाच्या पोषणासाठी आई शारदेच्या स्तनमंडलात अमृत भरलेले आहे. सकल विश्वाला ज्ञानामृत पाजून तृप्त करणारी देवता आहे देवी शारदा.
प्रसादावलम्बां- तिची ही कृपा हाच खरा प्रसाद आहे. तो प्रदान करणारी. ज्ञानरूपी वास्तविक प्रसादाचा आधार असणारी ती प्रसादावलंबा.
प्रपुण्यावलम्बाम्- आई जगदंबेच्या कृपेने माणूस असंख्य पुण्यकर्मे करतो. सत्कर्मांचा आधार असते ज्ञान. त्या दृष्टीने सर्व पुण्यकर्मांचा आधार असणारी ती प्रपुण्यावलम्बा.
सदास्येन्दुबिम्बां- आई जगदंबेचा मुखचंद्र कायम पौर्णिमा- प्रफुल्लित असतो. बाह्य चंद्राला क्षय आहे. पण आईचा मुखचंद्र कायम पूर्णप्रदीप्त आहे.
सदानोष्ठबिम्बां- आई जगदंबेचे ओठ पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे, गुंजेप्रमाणे लालबुंद आहेत.
भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम्- त्या अजस्त्र अर्थात अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या माझ्या आई शारदेचे मी भजन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply