नमः शिवाभ्यां विषमेक्षणाभ्यां
बिल्वच्छदामल्लिकदामभृद्भ्यां |
शोभावतीशान्तवतीश्वराभ्यां
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ‖ ११‖
श्री शिवपार्वतीच्या एकत्रित स्वरूपाला अभिवादन करताना आचार्य श्री म्हणतात,
नमः शिवाभ्यां – भगवान शंकर तथा देवी पार्वतीला वंदन असो.
विषमेक्षणाभ्यां – हे दोघेही विषम ईक्षणाने युक्त आहेत.
हा शब्द दोन अर्थांनी समजून घेता येतो.
साधा सरळ बाह्य अर्थ पाहिला तरी ईक्षण म्हणजे डोळा. या दोघांच्याही तृतीय नेत्राचा विषय त्यात अपेक्षित आहे.
सामान्य माणसाला किंवा देवतांना दोन हे समान संख्येचे डोळे असतात. या दोघांना तीन नेत्र असल्याने त्यांना विषम ईक्षण म्हटले.
ईक्षण शब्दाचा लक्षार्थ म्हणजे दृष्टिकोन. संसाराकडे पाहण्याचा सामान्य जीवाचा दृष्टीकोन लाभ हानी, मान-अपमान, सुखदुःख अशा विविध स्वरूपातील द्वंद्वांनी युक्त असतो.
मात्र हे दोघे संसाराकडे केवळ लीला म्हणून पाहतात. त्यांच्या या लोकविलक्षण दृष्टिकोनामुळे त्यांना विषमेक्षण म्हटले आहे.
बिल्वच्छदामल्लिकदामभृद्भ्यां |
या दोघांमधील भगवान शंकर बेलाची पाने तर आई जगदंबा मल्लिका म्हणजे मालतीच्या फुलांचा गजरा लावून बसते.
तीन पानांच्या रचनेतून त्रिगुणाला समर्पित करण्याचा संदेश देणारा बेल भगवान शंकरांना आवडतो.
तर छोट्याशा कळीतून शेकडो पाकळ्यांसह उगवणारा आणि भ्रमरांना आकर्षित करणारा, सुख,शांती ,सुगंधदाता मोगरा आई जगदंबेला प्रिय आहे.
शोभावतीशान्तवतीश्वराभ्यां
देवी पार्वती परम शोभा संपन्न आहे. तसेच अत्यंत शांत आहे. त्या शांत असणाऱ्या जगदंबेचे पति असणारे भगवान शांतवतीचे ईश्वर आहेत.
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां – अशा या भगवान शंकर आणि पार्वतींना नमस्कार असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply