नमः शिवाभ्यां पशुपालकाभ्यां
जगत्रयीरक्षणबद्धहृद्भ्यां |
समस्तदेवासुरपूजिताभ्यां
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ‖ १२ ‖
भगवान श्रीशंकर आणि देवी पार्वती च्या या युगुल स्वरूपाचे दिव्य वैभव वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
नमः शिवाभ्यां – भगवान शंकर आणि देवी पार्वती यांना वंदन असो.
पशुपालकाभ्यां – हे दोघेही पशूंचे पालन करतात.
येथे पशु शब्द वेगवेगळ्या अर्थाने अपेक्षित आहे. पशु म्हणजे जीव. या विश्वातील समस्त जीवांचे पालन कर्ते या अर्थाने या दोघांना पशु पालक म्हंटले आहे .
या दोघांच्या वाहन स्वरूपात देखील दोन पशूंचा विचार भारतीय संस्कृती आपल्यासमोर ठेवते.
भगवान शंकर नंदीवर आरूढ असतात. नंदी हे धर्माचे प्रतीक आहे. नंदी हे मनाचे देखील प्रतीक आहे. त्यावर ज्यांचे नियंत्रण ते वृषभवाहन.
दुसऱ्या बाजूला म्हणजे बैल हा अत्यंत शांत जीव तर आई जगदंबेचा सिंह सर्वात क्रूर जीव. या दोन्ही प्रकारच्या, अर्थात सर्व प्राणिमात्रांवर, सर्व प्रवृत्तीच्या सजीवांवर या उभयतांची सत्ता चालते हे सांगण्यासाठी आचार्य श्री शब्द वापरतात पशुपालक.
जगत्रयीरक्षणबद्धहृद्भ्यां – जगत्त्रयी अर्थात स्वर्ग ,मृत्यु, पाताळ. या तिन्हींच्या, त्यात राहणाऱ्या देवता मानव आणि दानव यांच्या संरक्षणामध्ये नित्य सिद्ध असणारे.
हे संरक्षण करणे त्यांना मनापासून आवडते. ते त्यांचे प्रिय कार्य आहे हे सांगण्यासाठी आचार्य श्री बद्धहृदयाभ्याम् असा सुंदर शब्दप्रयोग करतात.
समस्तदेवासुरपूजिताभ्यां – समस्त देवता आणि असुर म्हणजे राक्षसां कडून देखील पूजिल्या जाणाऱ्या,
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां – भगवान शंकर आणि देवी पार्वतीला नमस्कार असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply