ज्ञानदेवांनी “शिवशती समावेशन” या पहिल्या अध्यायात शिव आणि शक्ती यांना जे अपूर्व असे मंगल वंदन केले आहे त्यातला अभेद्य विचारांचा वेध जेव्हा आपण घेतो तेव्हां ज्ञानदेवांच्या अवकाशव्यापी प्रज्ञेची ताकद लक्षात येते. दुसऱ्या अध्यायात त्यांनी श्रीगुरुस्तवन केलेले आहे. परमेश्वराशी प्रकट करण्याचा, त्यातून भक्त, भक्ती आणि परमेश्वरी अस्तित्व या त्रिमात्रांतून प्रकट झालेल्या ॐकार धनीचा कैलास आनंद प्रकट होत असतांना सद्गुरुस्वरुपाचा विचार येथे प्रकट झाला आहे. किंबहुना शिवशक्तीचे मूर्तस्वरुप म्हणजे सद्गुरु, त्या सद्गुरुची स्तुती प्रस्तुत अध्यायात केली आहे. आपलं साध्य आहे शिवस्वरुप होण्याचा. तर साधकाला जे साधन लागते ते साधन आपले सद्गुरु आपल्याला उपलब्ध करुन देतात. तो गुरुपदेश फार महत्वाचा आहे. साधन जर लक्षात आले नाही तर साधकाचे साध्य त्याला प्राप्त तरी कसे होणार. त्यासाठी प्रस्तुत ओवीतून ज्ञानदेवांनी एक फार महत्वाचा विचार प्रकट केला आहे. वनाला शोभा नेमकी कोण आणतं तर त्या वनातल्या झाडांवर लगडलेली फळे आणि फुले. फुलांचा सुगंध आणि फळातला रस हेच तर वनाचे वैभव. त्या वनाला वैभव प्राप्त होण्यासाठी माळ्याला परिश्रम जरूर करावे लागतात. परंतु परिश्रम म्हणजे का वनातली वैभव शोभा आहे! तर ती वैभवशोभा माळ्याच्या प्रयत्नानं जरी प्राप्त होत असली तरी त्या वनाच्या वैभवाला मूळ कारण वसंत ऋतु आहे. सद्गुरु म्हणजे साधकांचा वसंत ऋतु आहे. परमेश्वरापाशी जाण्यासाठी म्हणजेच मोक्ष प्राप्त होण्यासाठी तपश्चर्येची गरज जरूर आहे. परंतु ती तपश्चर्या कशी करावी ते सांगणारा शेवटी सद्गुरु असतो. परमेश्वर सदा अमूर्तच असतो. तो कारुण्याची मूर्ती असतो.
परमेश्वराच्या मूर्त-अमूर्त खेळातला सद्गुरु हा मूर्त खेळ आहे. परमेश्वरी अमूर्ताकडे नेणारा हा मूर्त गुरु आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरुची आज्ञा हा अहेव तंतु आहे. कारण सद्गुरु म्हणजेच परमेश्वराचे मूर्त सच्चिदानंदरूप आहे हे जेव्हा लक्षात येईल तेव्हाच शिव-शक्ती स्वरूप लक्षात येईल.
अविद्येचे आडवे। भुंजीत जीवपणाचे भवे।
तया चैतन्याचे धांवें। कारुण्यें जो कीं ॥२॥
प्रत्येक मर्त्य माणूस विचारपातळीवरसुद्धा मर्त्य असतो. म्हणून तर सुखदु:खांच्या संसारचक्रात स्वेच्छेने अडकतो आणि शेवटी संसार वांझ आहे असा आक्रोश करतो. जन्ममरणाच्या ह्या भीषण चक्रात अडकणं म्हणजे अविद्येच्या आडरानात आंधळेपणाने धावत सुटणं आहे. ह्या बंधनात गुरफटणाऱ्या, अविद्येच्या अंधाऱ्या रानात अडकलेल्या जीवांना जर मुक्तता हवी असेल तर साधक होऊन, परमेश्वरी चिंतनात गर्क व्हायला हवे आणि त्यासाठी सद्गुरु भेटावा लागतो. तरच ह्या अविद्येच्या रानातून सुटका होणार ना… आपण “मी” पणाने अहंकाराच्या कवचात घट्ट बसून जगत असतो म्हणून तर हा त्रास भोगावा लागतो. ज्ञानदेव म्हणतात की जीव म्हणजे चैतन्य. चैतन्य कधी “मी” पणात अडकत नाही. ते तर सदैव मुक्त आनंद भोगत असते. आत्म्याचे आनंदस्वरूप जीव पणाच्या दुःखात कधीच अडकत नाही. म्हणून जीवपणाशी एकरूप न होता मूळ चैतन्याशी एकरूप व्हा. जीवपणाच्या दुःखभोगात अडकून टाहो फोडण्यापेक्षा कारुण्यसिंधू सद्गुरुला जर शरण गेले तर तो तुमची सुटका करण्यासाठी अक्षरश: धाव घेतो. तो अनुभव एकदा घ्या.
मोडोनि मायाकुंजरु | मुक्त मोतियाचा वोगरु ।
जेवविता सद्गुरु । निवृत्ति वंदू ।। ३ ।।
ज्ञानदेव म्हणतात की ह्या अविद्येच्या आडरानात मायारुपी प्रचंड मोठे हत्ती वावरत असतात. त्या मायारुपी हत्तीच्या कळपात संसारी जीव अडकून पडतो. जिथे जावे तिथे हे मायारुपी धिप्पाड हत्ती आपला रस्ता अडवून बसतात. त्या हत्तींचा नाश सद्गुरु करतो आणिपरममुक्तीचा मौक्तिक क्षण आपल्याला मिळवून देतो. तिथे मग शांती नांदायला लागते. तो क्षण मला माझ्या सद्गुरु श्री निवृत्तीनाथांनी जन्मक्षणी दिला. त्या सद्गुरुनिवृत्तीनाथांना मी मनःपूर्वक वंदन करतो. नमस्कार करतो. माझ्या ह्या सद्गुरुमुळे तर मी ह्या अज्ञानाच्या आडरानात कधीच शिरलो नाही. सद्गुरु होऊन त्यांनी मला सदैव चैतन्याचा मोत्याचा चारा दिला. म्हणून तर मी हा शिवशक्तीचा अपूर्व खेळ अनुभवू शकलो. त्या माझ्या सद्गुरुने मला मोत्याचा चारा भरवला. मी नित्य तृप्त झालो. ती माझ्या सद्गुरुंची मजवर कृपा झाली आहे. कारण माझ्या साधकावस्थेत माझ्या आडवाटेवर आलेले हे मदोन्मत्त मायावी हत्ती त्यांनीच नष्ट केले.
जयचेनि अपागपातें। बंध मोक्षपणीं आते।
भेटे जाणतया जाणतें । जयापाशीं ।।४।।
सद्गुरुची कृपादृष्टी एकदा का आपल्या परमशिष्याच्या एकूणच लाघवी अस्तित्वावरून फिरली ना अगदी क्षणभर जरी फिरली ना की शिष्याच्या अस्तित्वाचा एकदम कायापालट होऊन जातो. साधक एका रेखीव
महामार्गाने जात असतो त्या साधकाला मोक्षप्राप्ती अगदी अचानकपणे होते. तो बंधमुक्त होतो. त्याच्यासाठी आनंददिशा उजळून येतात. बंध मोक्षापाशी येतो आणि बंधच मुळी मोगरा होऊन जातो. जे काही
ईश्वरस्वरूपाविषयी जाणून घ्यायचे आहे ते स्वरूपच मुळी ज्याला जाणून घ्यायचे आहे त्याच्यापाशी, मंद वाऱ्यावर डुलत रहाणाऱ्या सुगंधासारखे, अलगद जाते आणि ज्ञेयच ज्ञात्याला भेटते. जे जाणून घ्यायचे आहे ते ज्ञेयच मुळी ज्ञाता होऊन जाते. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ह्या त्रिवेणीसंगमावर ज्ञानच ज्ञाता होते. ज्ञेय ज्ञाता होते आणि पुन्हा ज्ञान सुद्धा ज्ञाताच होते. म्हणजे नेमके काय होते तर सद्गुरु आपलीच ओळख आपल्याला करुन देतो. आत्मस्वरूपाची खरी ओळख होते. सद्गुरुच्या कृपाप्रसादाने तो शिष्य सद्गुरुमध्ये आपले रूप न्याहाळू लागतो. ज्ञात्याला ज्ञेयाची ओढच शिल्लक रहात नाही. काही नव्याने जाणून घ्यायचे शिल्लक रहात नाही. ह्याचा एक अर्थ असा की स्वतःची ओळख एकदा का पटली की ह्या विश्वाकडून एकदा का झाली की ज्ञेयाचा प्रवास संपतो आणि ज्ञेय ज्ञाता होतो.
कैवल्यकनकाचिया दान। जो न कडसी थोर साना।
द्रष्ट्याचिया दर्शना। पाढाऊ जो॥ ५ ॥
सद्गुरु कैवल्यरुपी सोन्याचे दान करतांना कधीही लहान-मोठा हा भेद करीत नाही. सर्वांना तो एकाच दृष्टीने पहातो. सर्वांनाच मोक्षाचा मार्ग दाखवतो. ज्ञानदेव म्हणतात की गुरु हा द्रष्टा आहे तो संपूर्ण विश्व जणू तुमच्या ओंजळीत दान म्हणून टाकतो. परंतु ह्या द्रष्ट्याला स्वतःला मात्र पाहता येत नाही. सत्शिष्याच्या स्वरूपात तो स्वत:ला पाहतो आणि पाहणाऱ्या शिष्याला द्रष्टा करून टाकतो. दृश्य पाहणारे डोळेच दृष्य होऊन जातात. सद्गुरुची ही कृपामयी दृष्टी ही शिष्याच्या आयुष्यातला मोक्षाचा उंबरठा होतो. दर्पणाने दर्पणाला पहावे तसे दोन ज्ञाते जणू एकमेंकांना भेटतात.
सामर्थ्याचेनि बिर्के। जो शिवाचेंही गुरुत्त्व जिंके।
आत्मा आत्मसुख देखे । आरिसा जिये || ६ ||
ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरु हा कृपामयी आहे. कैवल्याचे सोने प्रत्येकाच्या पदरात टाकणारा विश्वउदार आहे. तो विचारश्रीमंत आहे. आचारश्रीमंत आहे. तो विवेकश्रीमंतही आहे. इतकेच नव्हे तर सद्गुरु हा खरा सामर्थ्यवान आहे. सद्गुरु हा इतका सामर्थ्यवान आहे की प्रत्येक शिवाचेही सामर्थ्य तो आपल्या केवळ कैवल्य-अस्तित्वाने जिंकून घेतो. कारण एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे ती ही की शिव हा निराकारात स्थिर आहे. त्याचे सामर्थ्य हे त्याच्या भक्तांच्या सामर्थ्याच्या तुलनेतच त्या भक्ताकडून तोलले जाते. परंतु सद्गुरुचे सामर्थ्य दृश्य आहे आणि ते काही शिष्यांच्या सामर्थ्यदृष्टीकोनातून कधी तोलले जात नाही तर तो स्वयंभू सामर्थ्यवान आहे. इतका की तो शिवाचे गुरुत्वसुद्धा जिंकून घेतो. कारण सद्गुरुच तर शिवाचे दृश्य रूप प्रकट करतो. शिष्याला जर शिवदर्शन हवे असेल तर ते सामर्थ्य सद्गुरुंपाशी आहे. शिवदर्शन म्हणजेच मोक्षाप्राप्ती आणि ती मोक्षप्राप्ती सद्गुरु देतो. कारण शरीर हे जीवभावाने जगत आते. त्यामुळे मानवी सुखदुःखाने ते पछाडलेले असते. त्या मीपणाने जगणाऱ्या शरीराला सद्गुरु आत्मसुख म्हणजे काय हे दृश्यरूपात दाखवणारा जणू आरसा स्वत:च्या अस्तित्ववाने देतो. त्या आरशात शिष्य स्वत:चे दर्शन घेतो आणि आपल्या आत्म्याची खरी ओळख त्याला सद्गुरुच्या सहवासातच घडते. आत्म्याची जेव्हा खरी ओळख होते तेव्हाच “मी” पण गळून पडते आणि मोक्षाचा प्रकाशवान मार्ग आरशासारखा लख्ख दिसायला लागतो. हे सारे सद्गुरु करतो. म्हणून तर तो शिवाचे गुरुत्त्व पद जिंकून घेऊ शकतो.
बोधचंद्राचिया कळा। विखुरलिया येकवळा।
कृपापुनीवलीळा। करी जयाची।।७।।
सद्गुरुकृपेविषयक ज्ञानदेव भारावून सांगत आहेत. ज्ञानाचा चंद्र जेव्हा उगवतो तेव्हा तो कलेकलेने वाढत जातो. त्याच्या सर्व कळा विखरुन पडलेल्या असतात. परंतु ह्या विखुरलेल्या ज्ञानचंद्राच्य कळा सद्गुरुकृपेने एकत्र येतात आणि ज्ञानाची पौर्णिमा म्हणजे काय ह्याचे फार सुरेख वर्णन ज्ञानदेव अनुभवाच्या अमृतभाषेत करतात. थोडक्यात ज्ञेयाचे ज्ञान ज्ञात्यापाशी सद्गुरुकृपेच्या पौर्णिमेने एकवटून जाते. तीच खरी “गुरुपौर्णिमा”. म्हणजेच शांतचित्त ज्ञानपौर्णिमा…
— श्री. वामनराव देशपांडे.
मोबाईल: ९१६७६८६६९५
सौजन्य: गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक १ ला
Leave a Reply