कुठलीही कला, ही किती “अमूर्त” स्वरूपात असते हे जर जाणून घ्यायचे असेल तर त्या कलेचे शास्त्र अवगत करून घेणे अत्यावश्यक ठरते. संगीत आणि रागदारी संगीत याबाबतीत हा विचार फारच आवश्यक ठरतो. पूर्वीच्या काही संस्कृत ग्रंथात, स्वरांबद्दलची बरीच वर्णने वाचायला मिळतात आणि त्यानुसार, स्वरांचे रंग, देवता इत्यादी बाबी वाचायला मिळतात परंतु या वर्णनांना तसा “शास्त्राधार” सापडत नाही. बहुतेक वर्णने ही पारंपारिक संकेतावार आधारलेली आढळतात. याचाच वेगळा अर्थ, स्वरांचे सौंदर्य बघताना, स्वरांतून जाणवणारा “आशय” आणि त्याची व्याप्ती, हेच महत्वाचे असते. याच स्वरांतून, पुढे होणाऱ्या रागदारी संगीताबाबत हाच विचार प्रबळ ठरतो.
शृंगारिक तिलक कामोद
इथे बरेचवेळा, मी रागांविषयी लिहिताना, अनेक भावछटांचा उपयोग करतो पण, ते केवळ, त्या रागाबाबत एक विशिष्ट चित्र मनासमोर उभे राहावे, इतपतच. अन्यथा, एकाच रागातून, एकापेक्षा अनेक भावनांचा आढळ अशक्य. यामागे नेमके म्हणायचे झाल्यास, आपल्याला परत त्या रागांच्या सुरांकडेच वळावे लागते. त्यामुळेच, रागदारी संगीतात, कुठलाही सूर हा “उगीच” म्हणून किंवा “चूष” म्हणून येत नाही. प्रत्येक सुरांमागे काहीना काहीतरी कार्यकारणभाव नक्की असतो आणि तो भाव जाणून घेणे, म्हणजे रागसंगीताचा अननुभूत आनंद घेणे!!
“देस” राग आणि “तिलक कामोद” राग याबाबत हेच अतिशय महत्वाचे आहे. दोन्ही रागांत स्वर तेच आहेत पण, तरीही दोन्ही राग वेगवेगळे आहेत. हे नेमके कसे घडते? यामागे मुख्य कारण हेच आहे, दोन्ही रागांतील स्वरांचे “ठेहराव” वेगळे आहेत आणि स्वरांची खरी गंमत इथे दिसून येते. कुठला स्वर कशाप्रकारे घेतला की, त्या रचनेचे सगळे स्वरूप पालटून जाते, याचा प्रत्यक्षानुभव, हे दोन राग आलटून, पालटून ऐकले तर सहज ध्यानात येऊ शकते. गुरु-शिष्य परंपरा भारतीय संगीतात का आवश्यक आहे, यासाठी या दोन रागांचे उदाहरण चपखल होऊ शकते.
आपल्या भारतीय संगीतात, “षडज-पंचम” भावाला निरातिशय महत्व आहे आणि या रागाचे वादी/संवादी स्वर तर “षडज/पंचम” हेच आहेत!!
पंडिता केसरबाई केरकर हे नाव फार आदराने घेतले जाते. मला काही त्यांची मैफिल प्रत्यक्ष ऐकायचे भाग्य लाभले नाही परंतु त्यांच्या गायनाच्या अनेक रेकॉर्ड्स, सीडी ऐकायला मिळाल्या. अर्थात, प्रत्यक्ष मैफिलीतला आनंद जरी रेकॉर्ड ऐकण्यात तितका येत नसला तरी, आवाजाची जात, गोडवा, शैली इत्यादींचा आपल्याला आनंद घेता येऊ शकतो. आवाजाची जात थोडी “मर्दानी” भासते पण तरीही गायनाची पट्टी “काळी चार” च्या आसपास आहे. विस्ताराची लय, सप्तकाचा धुंडाळलेला जाणारा अर्थ तसेच निकोप, स्वच्छ आणि ताकदवान असा स्वर अशी काही खास वैशिष्ट्ये सांगता येतात. त्यात, आ-कार तर खासच म्हणावा लागेल. जयपूर घराण्याची खास वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात म्हणजे गुंतागुंतीची तानक्रिया हे खास ऐकायला मिळते.
“सूर संगत आज” या बंदिशीत आपल्याला ही सगळी वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. तान दुहेरी विणीची करून, तान बांधणे तसेच तानांचे व्यापक आकृतिबंध जाणीवपूर्वक योजणे, हा विचार अगदी स्पष्ट दिसतो. आणखी एक बारकावा इथे नोंदता येईल. ताना अति दीर्घ नसून, त्याचे छोटे छोटे आकृतिबंध त्यांनी स्वीकारले आहेत. त्यामुळे बरेचवेळा ताना द्रुतगती असल्याचा भास होतो. दुसरे युक्ती अशी दिसते, ठेक्याची लय फार विलंबित न ठेवता, त्याच्या दुप्पट गतीने ताना घ्यायच्या. याचा परिणाम असा होतो, श्रोत्यांचे चित्त जरादेखील विचलित होत नाही आणि गाण्याचा संपूर्ण आनंद मिळतो.
आता आपण, रागाच्या ललित स्वरूपाकडे वळूया. १९७७ साली आलेल्या “भूमिका” या चित्रपट या रागावर आधारित एक सुंदर गाणे आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर, यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला, संगीतकार वनराज भाटीया यांनी नितांत रमणीय गाणी दिली आहेत. प्रस्तुत गाणे, प्रीती सागर या गायिकेने गायले आहे. “My heart is beating” सारख्या पाश्चात्य संगीतावर आधारित गाण्याने प्रकाशात आलेली ही गायिका. हे गाणे गाउन, मात्र तिने रसिकांना चांगलाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. “तुम्हारे बिना जी ना लगे” हेच ते गाणे इथे ऐकणार आहोत.
“तुम्हारे बिना जी ना लगे घर में,
बलम जी तुम से मिलाके अन्खीया”.
काहीशी लाडिक वळणाची चाल, ठुमरीच्या अंगाने गेलेल्या ताना इत्यादी खास बाबी या गाण्यात उठून दिसतात. पारंपारिक पंजाबी ठेक्यावर हे गाणे उचलून धरले आहे. तशी चाल साधी आहे पण गोड आहे. प्रीती सागरने देखील तितक्याच गोडव्याने गायली आहे.
“ये नीर कहा से बरसे” हे गाणे देखील याच रागावर आधारित आहे, “प्रेमपर्बत” चित्रपटातील अतिशय सुश्राव्य आणि गायकी ढंगाचे गाणे आहे. जयदेव आणि लताबाई, या जोडगोळीने खूपच अप्रतिम गाणी दिली आहेत आणि बहुतेक गाणी, चालीच्या दृष्टीने अवघड आणि लयीला कठीण अशी(च) आहेत. जेंव्हा हिंदी चित्रपट सृष्टीत, पाश्चात्य चाली, पाश्चात्य वाद्ये हाच संगीताचा “ढाचा” बनत चालला होता, त्यावेळी जयदेवने मात्र, अपवाद वगळता, आपली बहुतेक गाणी, ही भारतीय संगीतावर आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे, कुठलेही गाणे केले तरी त्याला कुठेतरी रागदारी संगीताचा “स्पर्श” द्यायचा, याच हेतूने बनवली आणि तिथे मात्र कसलीही तडजोड केली नाही. याचा परिपाक असा झाला, त्यांची गाणी ही नेहमीच गायनाच्या दृष्टीने आव्हानात्मक झाली.
“ये नीर कहां से बरसे है,
ये बदरी कहां से आई है”.
या गाण्यातील पहिल्याच वाद्यमेळ्याच्या रचनेतून, आपल्याला तिलक कामोद रागाची झलक ऐकायला मिळते. पहिल्याच ओळीत, “ये बदरी कहा से आयी रे” ऐकताना, आपल्याला ही ओळख अधिक “घट्ट” झालेली आढळेल. या गाण्यात आणखी एक मजा आहे. पहिला अंतरा सुरु होतो तेंव्हाचे शब्द – “गहरे गहरे नाले, गहरा पानी रे” या ओळीत, हा राग बाजूला सारला जातो आणि तिथे “पानी रे” या शब्दावरील हरकत तर, या रागाशी संपूर्ण फारकत घेते. असे होऊन देखील, दुसऱ्या ओळीत चाल, परत “मूळ” रुपाकडे वळवून घेतली आहे. हे जे “वळवून” घेणे आहे, इथे संगीतकाराची दृष्टी समजून घेता येते.
१९८२ मध्ये मराठीत आलेल्या “उंबरठा” चित्रपटात असेच एक अप्रतिम गाणे आपल्याला ऐकायला मिळते. हृदयनाथ मंगेशकरांच्या रचना देखील अशाच “गायकी” ढंगाच्या असतात, किंबहुना काहीवेळेस तर अति अवघड असतात. कवी वसंत बापटांची सघन शब्दकळा आणि मंगेशकरांची चाल, या गाण्यात अतिशय सुंदरपणे जुळून आली आहे. अर्थात, ही चाल मंगेशकरांनी आपल्याच बाबांच्या “वितरी प्रखर” या गाण्यावरून बेतलेली आहे, हे कबूल केले आहे पण तरीही नाट्यगीताचे स्वरूप लक्षात घेऊन, चित्रपटगीत करताना, आवश्यक ते फेरफार करावेच लागतात आणि त्या दृष्टीने, ही रचना ऐकण्यासारखी आहे.
” गगन सदन तेजोमय,
तिमिर हरून करुणाकर,
दे प्रकाश, देई अभय.”
चालीवर खास मंगेशकरी ठसा तर आहेच पण तरीही बऱ्याच ठिकाणी, शब्दाप्रमाणे चालीला “वळण” दिल्याचे दिसून येईल. वास्तविक तिलक कामोद राग तसा सरळ, गोड, फारशा अति वक्र ताना नाहीत,अशा प्रकारे बरेचवेळा सादर होतो पण तरीही अशा रागात अशा प्रकारचे अति अवघड तर्ज बनविणे, हे केवळ हृदयनाथ मंगेशकर(च) करू जाणे. या गाण्याच्या सुरवातीला, रचना मंद्र सप्तकात सुरु होते पण, एकदम “दे प्रकाश, देई अभय” इथे रचना जे काही अकल्पित वळण घेते, ते केवळ आणि केवळ, लताबाई(च) घेऊ जाणे, इतके अवघड आहे.
संगीत नाटक “संगीत मानापमान” मध्ये गायलेले “रवि मी चंद्र कसा” हे पद खास तिलक कामोद रागावर आधारलेले आहे. खरे तर मूळ पद, मास्टर दीनानाथांनी गायलेले आहे पण पुढे पंडित वसंतराव देशपांड्यांनी या गाण्याला अपरिमित लोकप्रियता मिळवून दिली. वसंतरावांच्या गायकीवर मास्टर दीनानाथांच्या गायकीचा दाट ठसा दिसून येत असे पण तरीही या गायकाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. चालीचा आराखडा तसाच ठेऊन, त्यात वसंतरावांनी अनेक सौंदर्यस्थळे निर्माण केली आणि रसिकांना स्तिमित करून टाकले.
“रवी मी चंद्र कसा मग मिरवितसे लावीत पिसे”.
वसंतरावांची गायकी म्हणजे स्वरांवर काबू ठेऊन, लयीच्या अपरिमित बंधांना खेळवीत, गाण्याचा विकास करायचा. तसे करताना, रचनेत अंतर्भूत असलेल्या तानांची इतकी वेगवेगळी रूपे दर्शवायची आणि रचनेचे सौंदर्य अधिक खोल करायचे. बोलताना घेण्यात तर वसंतराव हातखंडा होते. लय एकाच रेषेत चालत असताना, त्याला “वक्र” गती देऊन, रसिकांना आश्चर्यचकित करून टाकणे, त्यांना मनापासून आवडत असे. पंजाबी ढंगाच्या ताना घेऊन, गाण्याला नवीन आयाम द्यायचे, हा त्यांच्या गायनाचा दुसरा विलोभनीय भाग.
मराठी भावगीतांत, सुधीर फडक्यांचे नाव फार वरच्या श्रेणीत घ्यायला हवे. भावगीत गायनात, शब्दोच्चार कसे करावेत, याबाबत त्यांनी आदिनमुना तयार केला. शब्दोच्चार स्पष्ट असावेत पण त्याच बरोबर शब्दांतील आशय ओळखून, त्याचे प्रकटीकरण करताना, आशयवृद्धी कशी होईल, याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले आणि भावगीत गायन समृद्ध केले, प्रसिद्ध कवी, सुधीर मोघ्यांच्या “दिसलीस तू, फुलले ऋतू” या कवितेला संगीतकार राम फाटक यांनी चाल लावली. हे गाणे, आपल्याला तिलक कामोद रागाशी जवळीक दाखवेल.
“दिसलीस तू, फुलले ऋतू,
उजळीत आशा, हसलीस तू”.
गाण्याची चाल काहीशी पारंपारिक नाट्यगीतासारखी आहे आणि त्याच अनुरोधाने गाण्यात मोजकाच वाद्यमेळ आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी मराठी रंगभूमीवर, नाट्यगीताच्या रचनेचा, चालीचा स्वतंत्र ढाचा तयार केला आणि एक वेगळे मन्वंतर घडवले. त्या पायवाटेवरून या गाण्याची चाल जाते. गाण्यात थोड्याफार हरकती आहेत पण त्याचे प्रमाण अतिशय अल्प असे आहे आणि त्यामुळे रसिकांचे लक्ष सतत कवितेकडे आणि त्याचबरोबर गाण्याच्या चालीकडे राहील, याची खबरदारी, संगीतकार राम फाटक यांनी घेतली आहे आणि तोच विचार सुधीर फडक्यांनी आपल्या गायनातून दर्शवला आहे.
हिंदी चित्रपट “गोदान” मध्ये मुकेश यांनी गायलेले “हिया जरत रहत दिन रैन” हे गाणे तिलक कामोद रागावर आधारित आहे. या गाण्याची चाल सुप्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर यांनी तयार केली आहे आणि शब्दरचना शैलेंद्र यांची आहे.
“हिया जरत रहत दिन रैन,
अंबुवा की डाली पे कोयल बोले,
तनिक ना आवत चैन,
हिया जरत रहत दिन रैन”.
गाण्याच्या शब्दावरून गाण्याची “संस्कृती” आपल्याला सहज जाणून घेता येईल. लोकसंगीतावर आधारित शब्दरचना आहे आणि त्याच आधाराने चाल निर्माण केली आहे. वास्तविक, गायक म्हणून मुकेश यांच्या गळ्याला खूप मर्यादा होत्या आणि हे लक्षात घेऊन, जरी रागाधारित चाल असली तरी त्यातील “गायकीचा” भाग वगळून, संगीतकाराने “तर्ज” बांधली आहे. मुकेश यांचा आवाज मंद्र सप्तकात किंवा शुद्ध स्वरी सप्तकात(च) गोड लागतो आणि गाण्याची जडणघडण त्यानुसार केली आहे. त्यामुळे हे गाणे ऐकायला खूपच श्रवणीय होते.
– अनिल गोविलकर
Leave a Reply