किती छोटीशी गोष्ट असते, शुभेच्छा देणं! शुभेच्छा मिळाल्या की प्रसन्न वाटतं… कुणाला तरी आपली आठवण आहे, याचा आनंद होतो. हुरूप येतो. राजकारणी लोक आणि व्यापार-व्यवसायातले शुभेच्छा देण्या-घेण्यात तरबेज असतात. मोठमोठी होर्डिंग्ज लावतात आणि शुभेच्छांच्या बदल्यात मोठमोठ्या हॉटेलमधून पार्ला देतात. त्या झाल्या गणिती शुभेच्छा. अपेक्षा ठेवणाऱ्या. पुष्पगुच्छांची ओझी वाहणाऱ्या.
पण साध्या पोस्टकार्डवरच्या दोन ओळींच्या आंतरिक शुभेच्छा किती गोड असतात! किती अगदी खऱ्याखुऱ्या! स्वत:च्या हस्ताक्षरातल्या… मध्येच थोडी शाई सांडलेल्या… शुद्धलेखनाच्या चुका असणाऱ्या… पण शुद्ध अंत:करणानं दिलेल्या.100-200 रुपयांच्या ग्रिटिंग्जकार्डमधल्या छापील भावनांपेक्षा मला अशी साधी-सुधी शुभेच्छापत्रं नेहमीच मोलाची वाटत आलीत. मी ती जपून ठेवलीत.
माझी एक मैत्रीण होती. (होती म्हणजे अजून आहे, पण-) तर ती तिचं लग्न व्हायच्या आधी खूप छान निरभ्र शुभेच्छापत्र पाठवायची मला. खेड्यात राहते. तिचं शुभेच्छापत्र आलं की एखादं निष्पाप पाखरू आपल्या खांद्याच्या फांदीवर मजेत बसलंय गाणं गात… असं मला वाटायचं. मग एकदा तिच्या नवऱ्यानं तिला दटावलं. खूप दुःखी होऊन तिनं मला शेवटच्या शुभेच्छापत्रात तसं कळवलं. काही वर्षांपूर्वी. पण आजही दिवाळीचा पहिला दिवस उजाडला की माझ्या घराच्या खिडकीतल्या ग्रिलवर येऊन तिच्या शुभेच्छा आकाश कंदिलाला झोके देतात…
दिवाळीच्या, लग्नाच्या, वाढदिवसाच्या अशा किती तरी शुभप्रसंगांसाठी मराठी शब्दांची शुभेच्छापत्र मिळत नाहीत, म्हणून मध्यंतरी मी काही मित्रांसाठी शुभेच्छा लेखन केलं. मराठीत आणि मालवणीत. एका मालवणी मित्राचं लग्न होतं, मी लिहिलं-
न्हवरो हळुच मुंडावळे उचलुन
तिरप्या नदरेन मदीच बगता
न्हवरी तोंडाक पदर लावून
चान्न्यासारी गालात हसता
जोडो कसो सोबान दिसता…
आता समजा लग्न झालेल्या बालमैत्रिणीच्या साठाव्या वाढदिवसाला जर शुभेच्छापत्र पाठवायची कुणाला इच्छा झाली तर काय लिहायचं –
ढीगभर शुभेच्छापत्र मिळाली ना
परवा कपाट लावतांना?
तुझी कित्ती उडाली धांदल
झुरळांमागे धावतांना!
हे माझं शुभेच्छापत्र मात्र
कपाटात नको ठेऊस
बाटलीमध्ये ठेवतात का कुणी
बंद करून पाऊस!
तर अशी ही शुभेच्छापत्रांची गंमत आहे. मोबाईलवरच्या मेसेजीसना त्यांची सर नाही. ज्याला आपण शुभेच्छा पाठवतो त्याच्या काळजात काहीतरी जुनं किंवा नवं हललं पाहिजे. रुटीन गण्याच्या उन्हाळ्यात शुभेच्छांची थंडगार झुळूक…
नको माका सोना-चांदी, नको गाडी-घोडे
रोज भेट माका राजा, नको करू खाडे
— डॉ. महेश केळुसकर
(अनघा प्रकाशनच्या खिरमट या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च 2017 मध्ये प्रकाशित झाले.)
Leave a Reply