प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारादेवी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२० कोलकाता येथे झाला. त्यांची गेल्या सहा दशकांहून अधिक त्यांची प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना अशी ख्याती राहिली होती. सितारा देवींनी देशविदेशांमध्ये कथ्थक नेले. लोकप्रिय केले आणि कथ्थकला रसिकांच्या मनात कायमसाठी एक उन्नत स्थान त्यांनी मिळवून दिले. त्यांचे वडिल सुखदेव महाराज मिश्रा यांनी त्यांना कथ्थकची उत्तम तालीम आणि प्रशिक्षण दिले.
आपल्या वडीलांप्रमाणेच लखनौ घराण्यातील अच्छन महाराज, लच्छू महाराज आणि शंभू महाराज यांच्याकडूनही त्यांनी कथ्थकचे धडे गिरवले. बनारस आणि लखनौ घराण्यांचा मिलाफ त्यांच्या नृत्यातून दिसून येत असे. भावविभोर डोळे, ठसठशीत सौंदर्य आणि त्याला भारतीय भारदस्तपणाची डुब हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़ होते. एक नर्तकी म्हणून त्यांच्या अदाकारीमुळे त्यांच्या सौंदर्यामध्ये काही औरच जीव ओतला गेला होता.
सितारादेवी या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक के. आसिफ यांच्या पत्नी. जवळपास १९३४ पासून ते १९७४ पर्यंत त्यांनी नृत्यप्रधान भूमिका करून हिंदी चित्रपटही गाजवले. एक अवसर असा आला की, त्यांनी कथ्थक नृत्यशैलीशी पुरते तादात्म्य ठेवावे या हेतूने हिंदी सिनेसृष्टीला रामराम ठोकला. पडद्यावर आणि प्रत्यक्ष लाईव्ह डान्समध्ये सितारा देवींचे नृत्य पाहणे हा एक चित्तथरारक, रोमहर्षक आणि प्रेक्षकाला खिळवून ठेवणारा असा अनुभव असायचा. प्रेक्षकाला अधिक करणारा, कलेच्या निरामय लाटेवरून स्वर्गीय आनंदाची सर घडवणारा असा तो अनुभव असायचा. ‘रोटी’ चित्रपटातील जंगल डान्स (१९४२) किंवा ‘सौतन के घर ना जाईयो’ हा ‘आबरू’ चित्रपटातील (१९४३) डान्स अशा त्यांच्या अनेक उल्लेखनीय कलाकृती आहेत. नागनृत्य हे स्नेक डान्स या नावाने जास्त प्रचलित आहे.
१९५७ मध्ये ‘अंजली’ या चित्रपटामध्ये सितारा देवींनी स्नेक डान्स केला आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शनही केले होते. वयाच्या १६व्या वर्षी सितारादेवींनी गुरुवर्य पं. रवींद्रनाथ टागोर यांच्यासमोर सुंदर कथकनृत्य सादर केले. सितारादेवींचे सुरेख नृत्य पाहून पं. रवींद्रनाथ टागोर भारावून गेले व त्यांनी सितारादेवींना ‘कथकक्वीन’ उपाधी (पदवी) दिली. सितारादेवी यांना त्यांच्या नृत्य कारकिर्दीत आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री, आणि कालिदास सम्मान यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले होते. कथ्थक या नृत्यप्रकाराला त्यांनी बॉलिवूडमध्ये स्थान मिळवून देण्याचे श्रेय त्यांना जाते. नृत्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना २०११ मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सितारा देवी यांचे निधन २५ नोव्हेंबर २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply