प्रियांका शेट्टी… लावणीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही या लोककलेत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय…
नृत्यसमशेर माया जाधव यांच्या तालमीत तयार होऊन गेली तीन दशकं याच कलेचा ध्यास घेत ही कला जीवापाड जपत, त्यावर प्रेम करत आणि ती जगावी यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणारी कलावती म्हणजे प्रियांका शेट्टी.
लावणी हा तसा स्त्रीप्रधान कला प्रकार. ही लावणी सादर करणाऱया कलावती या एकतर परंपरेनुसार या कला प्रकारात आल्याचं पाहायला मिळतं अथवा नृत्याच्या हौसेपोटी वा पोटाची खळगी भागवण्यासाठी. अनेकदा या कलावंताचं शिक्षण हेदेखील जेमतेम झाल्याचं दिसतं. मात्र फार कमी कलाकार याला अपवाद म्हणता येतील. यापैकी एक म्हणजे प्रियांका शेट्टी. प्रियांकाचे वडील मुंबईत शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने ते नाशिकहून मुंबईत स्थायिक झाले. आई गृहिणी असल्याने तीही वडिलांबरोबर मुंबईतच स्थलांतरित झाली. प्रियांकाचा जन्म मुंबईतलाच. कुर्ला इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमधून प्रियांकाचं शालेय शिक्षण पूर्ण झालं, तर पुढे एसएनडीटी महाविद्यालयातून कला विषयात तिने पदवी शिक्षण पूर्ण केलं. प्रियांकाला तीन भाऊ. मोठा भाऊ इलेक्ट्रिक इंजिनीअर, दुसरा भाऊ इलेक्ट्रिकल क्षेत्रात आणि तिसरा भाऊ खासगी कंपनीत नोकरीला. लावणी, तमाशा अशी कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या प्रियांकाला मात्र बालवयातच नृत्याने गोडी लावली. आठवीत असताना माया जाधव यांच्या नाटकात काम करण्याची संधी प्रियांकाला चालून आली आणि हाच क्षण तिच्यासाठी टार्ंनग पॉइंट ठरला. माया जाधव यांच्या मागे उभं राहून प्रियांका आपलं नृत्य सादर करू लागली. त्याकाळी तिच्यासोबत प्रिया अरुण हीदेखील नृत्य सादर करत असे. 1985 साली महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या पॅरिस दौऱयातही प्रियांका सहभागी झाली. तेव्हा प्रियांका जेमतेम 15 – 16 वर्षांची होती हे विशेष.
वयाच्या अवघ्या 15 वर्षांपासून प्रियांकाची नाळ लावणीशी जोडली गेली होती. प्रियांकाने लावणीतील अनेक नृत्य प्रकार आजवर सादर केले आहेत. मात्र प्रियांकाचा शृंगार बघण्यासाठी रसिक तिच्या शोला गर्दी करतात. एका फोटोशूटच्या निमित्ताने माझी आणि प्रियांकाची ओळख झाली. पुढे प्रियांकाचा शृंगार कॅमेराबद्ध करण्यासाठी मी अनेकदा तिच्या शोला गेलो. भरजरी वस्त्र, त्यावर मोत्याचे, सुबक कलाकृतींचे दागिने, केसात गजऱयासोबत माळलेले अनेक दागिन्यांचे प्रकार, कपाळावर अर्धचंद्रकोर टिकली, हातात रंगीबेरंगी बांगडय़ांचा चुडा, हाताला लावला जाणारा लाल रंगाचा अल्टा, कमरेवर असलेला कंबरपट्टा, हाताच्या दंडावर असलेले दागिने अन् कुठेही तोल जाणार नाही असा पारंपरिक देखणा शृंगार प्रियांकाचा नेहमीच असतो. प्रियांकाचा हा शृंगार कॅमेराबद्ध करताना या शृंगारामागची तिची मेहनत नेहमीच लक्षात येते.
प्रियांकाचे फोटो काढत असताना प्रियांकाने तिचा तीन दशकांचा जीवन प्रवास मला हळूहळू उलगडून सांगितला. प्रियांका शेट्टी ही पूर्वाश्रमीची सुनंदा केकाणे. सुनंदा केकाणे हिचे 1986 साली बाबा शेट्टी या तरुणाशी लग्न झालं आणि तिला प्रियांका शेट्टी ही नवी ओळख मिळाली. लग्नानंतर संसारात रमलेल्या प्रियांकाला दोन मुली झाल्या. लग्नानंतर साधारणपणे पाच ते सहा वर्षे प्रियांका चूल आणि मूल यातच रमली. साधारणपणे सहा वर्षांच्या कालावधीनंतर 1992 साली प्रियांकाने कमबॅक केलं ते माया जाधव यांच्या सांगण्यावरून.
प्रियांकाला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र या सर्वांपेक्षा तिला ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांनी दिलेली कौतुकाची थाप अधिक महत्त्वाची वाटते. ‘नटखट सुंदरा’, ‘सोळा हजारांत देखणी’ या शोमुळे प्रियांका लोकप्रिय झाली. मात्र ‘शमा ए मेहफिल’ हा गझलप्रधान शो तिला अधिक जवळचा वाटतो. प्रियांका आता पुन्हा ‘टॉपच्या नटखट सुंदरा’ या शोच्या माध्यमातून महाराष्ट्रभर रसिकमन जिंकायला सज्ज झाल्याचं दिसतं.
‘‘त्या काळी रसिक पारंपरिक लावणी बघण्यासाठी येत असत. आता मात्र काळानुरूप या लावणीत झालेले बदल, त्यात कलावतींचा बदललेला शृंगार आणि लावणी ते आयटम सॉंग हा प्रवास मनाला चटका लावणारा आहे. महाराष्ट्रात हे विदारक चित्र जरी असलं तरी आजही मुंबई – ठाण्यातला रसिक तितकाच दर्दी असून केवळ इथेच पारंपरिक लावणी जगू शकते, इथेच ती सादर होऊ शकते असा माझा अनुभव आहे.’’ कलाकाराला त्याची कला सादर करायला आणि त्या सादरीकरणातून ती कला जगवायला एक उत्तम व्यासपीठ आणि दर्दी रसिक हवे असतात. लावणी आणि त्यातही व्यावसायिक लावणी फार काळ का टिकणार नाही यावर परखड भाष्यदेखील केलं. हे करत असताना तिचे डोळे काहीसे पाणावलेदेखील. मात्र मेकअप रूममध्ये हे सांगत असताना लगेच भानावर येत ती रंगमंचावर कला सादर करायला गेलीसुद्धा. इथेच तिच्यातली प्रामाणिक कलावती दिसून आली. आज ही कला जगवण्यासाठी अनेक हात धडपडत आहेत. कलाकाराला आपली कला जगवणं किती कठीण आहे हे समजत असतानासुद्धा ती सादर करण्याचा वेडा ध्यास प्रियांका सारख्या समविचारी कलाप्रेमींनी घेतल्यानेच आज लावणीचा श्वास कायम आहे.
धनेश पाटील
Leave a Reply