आजच्या वर्तमानात इतिहास घडविणाऱ्या अनेक प्रेरणादायी व्यक्ती आणि संस्था यांना आपल्यासारख्या संवेदनशील व्यक्तींना जोडून देण्याचे काम २००८ सालापासून अमृतयात्रा करत आहे, हे आपण जाणताच.
आजवर दोन हजारांहून अधिक लोकांनी ‘अमृतयात्रा’च्या निरनिराळ्या सामाजिक सहलींमध्ये भाग घेतला आहे. आपल्या भोवतलाचे हे सकारात्मक आणि प्रेरणादायी चित्र तुमच्यासारख्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावे यासाठी हे नम्र निवेदन…
परदेशातील अनेक ठिकाणांना भेट देऊन आपण सर्वजण अनुभवसमृद्ध झालो आहोत. मात्र आपल्याच देशातील तिलोनिया या गावातील ‘बेअरफुट कॉलेज’मध्ये तिसरी-चौथी शिकलेल्या महिला आज जगातील इतर स्त्रियांना सोलर इंजिनियरिंग शिकवत आहेत हे आपल्याला माहित आहे का?
आनंदवन-हेमलकसा-सोमनाथ हे जगप्रसिद्ध प्रकल्प तर आपण पाहतोच, पण जळगावात ‘मनोबल’ नावाच्या वास्तूत साठहून अधिक अंध-अपंग मुले यजुर्वेंद्र महाजन या तरुण शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सर्व अडचणींवर मात करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, याबद्दल अधिक जाणून घ्यायला, त्या मुलामुलींना प्रत्यक्ष भेटायला तुम्हाला आवडेल ना?
अनेक गावांना प्रेरणा देणारी राळेगणसिद्धी, हिवरेबाजार सारखी आदर्श गावे आपण बघूच, पण त्याच नगर भागात असलेली नितेश बनसोडे या तरुणाने कष्टाने उभारलेली पन्नास अनाथ मुलांची ‘सावली’, आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ ने गौरवलेले स्नेहालय, ग्रामीण भागातल्या मुलांना आश्रमाच्या जीवनपद्धतीमधून उद्यमशील विज्ञान शिकवणारे ‘विज्ञान आश्रम’ हे सर्व अनुभवणे ‘मस्ट’ ठरते.
ऑक्सफर्ड-केंब्रीजबद्दल आपण सर्वजण गौरवाने बोलतो, मात्र अमरावतीच्या २०० एकर पसरलेल्या आणि ऑलिम्पिक गुणवत्तेचा स्विमिंगपूल असणारे ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’आपल्यातल्या कितीजणांना माहीत असेल?
महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित ऑडियो-व्हिडियोने सुसज्ज असे जगातील सर्वात मोठे म्युझियम जळगावात आहे; जगातील क्रमांक एकची टिश्युकल्चर लॅब आपल्या जळगावात आहे; महाराष्ट्रातील सोन्याची खूप मोठी बाजारपेठ जळगावात आहे हे महाराष्ट्रात राहून अनेकांना माहित नसतं !
‘मेळघाट’ हा परिसर कुपोषणासाठी कुप्रसिद्ध आहे, पण त्याच परिसरात आदिवासींसाठी रोजगार निर्माण करणारे ‘संपूर्ण बांबू केंद्र’ तसेच आदिवासींच्या आरोग्यासाठी वाहून घेतलेले ‘महान ट्रस्ट’या संस्था प्रसिद्धी माध्यमातून आपल्याला कधी भेटत नाहीत.
परंतु वर उल्लेखिलेल्या सर्व संस्थांना, माणसांना आपल्याला ‘अमृतयात्रा’च्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटता येईल.
आपल्या देशात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी यानिमित्ताने तुम्हाला मिळणार आहे. विशेषतः आपल्या पुढच्या पिढीने हे सर्व तुमच्यासोबत पाहणं-अनुभवणं खूप गरजेचं आहे. हे पाहणं, अनुभवणं त्यांना त्यांच्या मुळांशी घट्ट राहण्यासाठी उपयोगी ठरेल.
नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं पाहिल्याचा, सकारात्मक उर्जा मिळाल्याचा खूप रिफ्रेशिंग असा अनुभव तुम्हाला ‘अमृतयात्रा’च्या या प्रत्येक सहलीमध्ये मिळतो, हे आपण जाणताच. म्हणूनच हा मेसेज तुमच्या समविचारी मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये, रि-युनियन ग्रुप्समध्ये, ऑफिसमध्ये नक्की शेअर करा.
आमच्या ठराविक दिवशी निघणाऱ्या टूर्स तर आहेतच, पण या टूर्स आम्ही आपल्या गरजेनुसारही डिझाईन करू शकतो. या सहलींमध्ये आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास तुमच्या ग्रुप्ससमोर बोलण्यासाठी आम्हाला जरूर आमंत्रित करा. आम्हाला तुम्हा सर्वांना भेटायला खूप आवडेल.
२०१७ च्या सुट्ट्यांचे प्लानिंग करत असाल, तर यावर्षी ‘अमृतयात्रा’चा नक्की विचार करा !
मंडळी, तुमची देशविदेशातील अनेक ठिकाणे पाहून झाली असतील. पुढेही पाहता येतील. पण ‘आपल्या मातीत’ घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींबाबत ‘गेले जायचे राहून’ असे व्हायला नको, म्हणून हे सगळं सांगावंसं वाटलं, इतकंच!
आपला
नविन अनिल काळे
अमृतयात्रा
www.amrutyatra.com | info@amrutyatra.com
9820118296 / 02225004248
Leave a Reply