बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी झाला. सोनालीने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. सोनाली बेंद्रेने अभिनेत्री म्हणून १९९४ मध्ये आलेल्या झालेल्या ‘आग’ सिनेमातून पदार्पण केले होते. सोनालीला उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मात्र, सोनालीचे फिल्मी करिअर काही खास राहिले नाही. तिने अनेक मेगाबजेट आणि मल्टीस्टार सिनेमांत काम केले. सोनाली सिनेमांत हवे तसे यश मिळवू शकली नाही तरी तिने जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. त्यामध्ये शाहरुख खान (इंग्लिश बाबू देशी मेम), सलमान खान (हम साथ साथ है) आमिर खान (सरफरोश), अमिताभ बच्चन (मेजर साहब), अजय देवगण (दिलजले, जख्म) आणि अक्षय कुमार (तराजू) यांची नावे सामील आहेत. सोनालीने आपल्या ११ वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास ३० सिनेमे केले.
शिवाय तिने, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी सिनेमांतसुध्दा काम केले आहे. २००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘कल हो ना हो’ सिनेमानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. दहा वर्षानंतर २०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ सिनेमातून सोनालीने कमबॅक केले. सोनाली बराच काळ चित्रपटांपासून दूर होती. कमबॅक करत तिनं एक-दोन चित्रपट केलेही, पण नंतर तिनं टीव्हीकडे मोर्चा वळवला. ‘क्या मस्ती क्या धूम’, ‘इंडियन आयडॉल’, ‘इंडियास गॉट टॅलेंट’, ‘सिनेस्टार की खोज’ असे एकामागोमाग एक रिअॅलिटी शोज तिला मिळत गेले. सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अनाहत’ या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. अगं बाई अरेच्चा या चित्रपटातील ‘छम छम करता है ये नशिला बदन’ या गाण्याच्या तालावर आपल्या सर्वांना थिरकायला लावून सोनाली ने एक धक्का दिला होता.
सोनाली ने ‘पालकत्व’ या विषयावर एका उत्तम, दर्जेदार पुस्तकाचे लिखाण केले आहे. हे पुस्तक कथेच्या स्वरुपात आणि तिच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे. पालकत्वाची जबाबदारी सांभाळताना येणारे सुखद अनुभव याबरोबरच आयुष्यातील चढ-उतार त्यांनी नीटनेटकेपणे मांडले आहेत. या पुस्तकात सोनाली बेंद्रे ने आपल्या मुलासोबतचे वेगवेगळे अनुभव मांडले असून चांगले पालक होण्यासाठी नेमके काय करायला हवे हे समजते. सोनालीने निर्माता गोल्डी बहलसोबत लग्न केले आहे. सोनाली बेंद्रे गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी लढा देत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट