मसालेदार पदार्थ हे भारतीय किंबहुना आशियाई लोकांचे वैशिष्ट्य. शतकानुशतके प्रयोग करून आपली खाद्यसंस्कृती तयार झाली. मसाल्यांचे स्थान अढळ राहिले. मसाल्यांशिवाय पदार्थाला चव नाही असे समीकरण झाले आहे. नुसत्या चवीसाठी हा खटाटोप झाला असेल? ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हे वाक्य आपले पूर्वज अन्नाविषयी सतत सांगत आलेत. त्याचा अर्थ? आपले शरीर हे एक यज्ञकुंड. त्यात अन्नाची आहुती दिल्याशिवाय ऊर्जा मिळणार नाही. ही ऊर्जा मिळायला व सातत्याने शरीर निरोगी राखायला नुसतीच प्रथिने, चरबीयुक्त पदार्थ व कर्बयुक्त पदार्थ मिळून चालत नाही तर त्याचबरोबरच जीवनसत्त्वे, सूक्ष्म खनिजे व क्षारही लागतात. ही सूक्ष्म खनिजद्रव्ये कडधान्ये, भाज्यातून मिळत असली तरी मसाल्याच्या पदार्थातून विपुल प्रमाणात मिळतात. या मसाल्यात असं दडलंय तरी काय हे त्या पदार्थांचे विश्लेषणच सांगेल.
१) काळीमिरी- सर्वात जास्त पिकणारी व निर्यात होणारी.
मुख्यतः केरळमध्ये याची लागवड होते. कारण तेथे खूप पाऊस, जास्तच तापमान व सावली मिळते. याची हिरवी फळे उकळत पाण्यात १० मिनिटे ठेवतात. त्यामुळे रंग तपकिरी/काळा होतो. नंतर ४ दिवस उन्हात वाळवून भरडले की काळीमिरे मिळतात. यातील पिपरीन, पिपरिडीन, चाव्हिसीन व अन्य तैलद्रव्यामुळे वास व तिखट चव येते. पाचक, पोटातील वायू कमी होतो, भूक प्रज्वलित होते. यात कॅल्शियम ४६०, फॉस्फरस १९८, लोह १३, मॅग्नेशिअम १७१, तांबे २ व मँगनीज ४ मि. ग्रॅ. प्रतिशत आणि ‘अ’ जीवनसत्व १०८० मायक्रो, असते. भेसळीसाठी पपयाच्या बिया टाकतात व चकाकीसाठी तेल वापरतात !
२) लवंगा- सीझिअम ॲरोमॅटिकम/ युजेनिया
कॅरियोफायलिस या झाडाच्या मुक्या कळ्या म्हणजे लवंगा, तामीळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये मुख्य लागवड, काळीमिऱ्याप्रमाणेच लवंगाही कोकणात पिकवायला लागले. लवंग पाचक, पोटातील वायू कमी करणारी, मळमळ थांबवणारी, याचे तेल वेदनाशामक म्हणून दंतवैद्य दातदुखीवर वापरतात. युजेनॉल हे वेदनाशामक द्रव्य असते. तेल त्वचेवर चोळल्यास त्वचा गरम व लाल होते. लवंग व मधाचे चाटण घशाची खवखव कमी करते. लवंगात कॅल्शियम ७४०, फॉस्फरस १००, मॅग्नेशियम १३०, मँगनीज ५, जस्त २ प्रतिशत व ‘अ’ जीवनसत्त्व २५० मायक्रो असते.
Leave a Reply