नवरात्रीचे नऊ रंग… या नवरंगात रंगलेले नऊ दिवसांचे छायाचित्रण…
नवरात्र हा हिंदू धर्मातील अतिशय भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण. नवचैतन्याची चाहूल लागलेल्या या सणाचे नऊ दिवस म्हणजे नऊ रंगांची उधळणच. रंगांनी सजलेल्या याच नवरात्रोत्सवाचं फोटोशूट करण्याची संधी मला वृत्तपत्रांमुळे अनेकदा मिळाली. हे फोटोशूट म्हणजे एका विशेष रंगांचे पारंपरिक वस्त्र परिधान केलेल्या मराठी सिनेतारकांना घेऊन केलेले फोटोशूट. संकल्पना जरी सहज सोपी वाटत असली तरीही ती प्रत्यक्षात आणण्यात अनेक दिवसांची आणि फोटोमागे काम करणाऱया अनेक कलाकारांच्या कलेची ती मेहनत होती.
नवरात्रामध्ये घातल्या जाणाऱया कपडय़ांच्या रंगांमध्ये कोणतीही धार्मिक कला नसली तरी तो सांस्कृतिक उत्सव असल्याचं तज्ञ सांगतात. निसर्ग हा अनेक रंगांनी सजलेला असून नवरात्र पूजा ही निसर्गशक्तीची, आदिशक्तीची व मातृशक्तीची म्हणजेच सृजनशक्तीची पूजा असल्याचं सांगितलं जातं. यामुळे या नवरात्रीत स्त्रियांनी एकाच रंगाची वस्त्र परिधान केल्यामुळे त्यांच्यामध्ये उत्साह, आनंद व सुरक्षिततेची भावना निर्माण होते. स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत होतो आणि एकजुटीची भावनादेखील जोपासली जाते. हाच उद्देश लक्षात घेऊन खरंतर हे फोटोशूट करण्यात आलं होते. या फोटोशूटसाठी या दिवसांतले नऊ रंग हे सगळ्यात आधी लक्षात घेण्यात आले. यातील प्रत्येक रंगाला त्याचं असं एक वेगळं महत्त्व आहे.
निळा रंग शांततेचं, समाधानाचं, धैर्याचं, ऐक्याचं प्रतीक, पांढरा रंग हा पावित्र्याचा, बुद्धिमत्तेचा, सुसंस्कारांचा, लाल रंग हा इच्छाशक्तीच्या सामर्थ्याचा, वस्तुनिष्ठतेचा, कार्यरत असण्याचा, चपळपणाचा, उद्योगशीलतेचा, गतिमानतेचं प्रतीक, पिवळा रंग स्वयंस्फूर्तीचा, उद्योगशीलतेचा, कल्पकतेचा, व्यापकतेचा, उल्हासाचा व आनंदाचा, हिरवा रंग धारणाशक्तीचा, स्वाभिमानाचा, सृजनशक्तीचा व सौभाग्याचा निदर्शक, राखाडी (ग्रे) रंग हा तटस्थतेचा, संयमाचा, चेतनाशक्तीचा, जांभळा रंग सौंदर्य, पावित्र्य, समृद्धी, विशालता दर्शवणारा आहे आणि गुलाबी रंग हा प्रेमाचा, पावित्र्याचा, आनंदाचा, समृद्धी व सौंदर्याचे द्योतक आहे. हे नऊ ज्या कलावंतींना साजेशा ठरतील अशा कलावंतीचं फोटोशूट यानिमित्तानं करण्यात आलं.
फोटोशूटसाठी नऊ कलावतींसाठी नऊ रंगांची पारंपरिक वस्त्र, त्यावरील दागिने, त्यासाठीच्या ऍक्सेसरीज, मेकअप, हेअर या सगळ्याची गरज होती. हे काम कलाकुसरीचा असल्याने यासाठीची टीम तयार करण्यात आली. मात्र फोटोग्राफर म्हणून मला नेमकं काय टिपायचं आहे हे लक्षात घेऊन या टीमकडून उकृष्ट काम करून घेण्याची जबाबदारी छायाचित्रकार म्हणून माझ्यावर होती. सगळ्यात आधी नऊ कलावतींची निवड करण्यात आली. मग त्याच्या चेहऱयाला, शरीराच्या ठेवणीला अनुसरून रंग निवडण्यात आले. अर्थात यासाठी फॅशन स्टायलिस्ट आणि कॉस्चुम स्टायलिस्ट यांचं मतदेखील लक्षात घेण्यात आलं. यांनतर फॅशन स्टायलिस्टने त्या त्या कलावतीला नेमका कोणता लूक चांगला दिसेल याचे संदर्भ काढले आणि त्यातील नेमका लूक कोणता असेल हे त्या कलावतीसोबत बोलून नक्की करण्यात आलं. या लुकानुसार मेकअप आणि हेअर स्टाईल ठरवण्यात आली.
त्यानुसार ही स्टाईल ज्या मेकअप आणि हेअर स्टायलिस्ट करू शकतील म्हणजेच ज्यांचा यात हातखंडा आहे असे स्टायलिस्ट निवडण्यात आले. ओव्हरऑल लूक आणि मेकअप, हेअर ठरल्यानंतर त्याला अनुसरून ज्वेलरी निवडण्यात आली. यासाठी नामांकित तीन ते चार दागिन्यांच्या पेढय़ांमध्ये जाऊन गळ्यातील हार, मंगळसूत्र, कानातले, नाकातली नथ आदी दागिने प्रत्येक कलावतीसाठी निवडण्यात आले.
मराठीतील आघाडीच्या कलावंतीण घेऊन हे फोटोशूट मी अनेक वर्षे केले. यासाठी ऋजुता देशमुख, स्पृहा जोशी, स्मिता शेवाळे, संस्कृती बालगुडे, धनश्री काडगावकर, नम्रता गायकवाड, अदिती सारंगधर, पूर्वा गोखले, तेजस्वी पाटील, प्रिया मराठे, सोनाली खरे, सारा श्रावण, जुई गडकरी, तेजा देवकर, ऋता दुर्गुळे,सई रानडे, शिवानी सुर्वे, प्रिया गमरे, पल्लवी वाघ, शिवानी रांगोळे या आणि इतर अभिनेत्रीचं फोटोशूट करण्याची संधी मला मिळाली.
प्रत्येक अभिनेत्रींच्या चेहऱयाची आणि शरीराची ठेवण निराळी आणि म्हणूनच तिचा लूक वेगळा. तर यावरूनच त्यासाठीच फोटोग्राफीचं तंत्र आणि त्याच लायटिंग वेगळं. पारंपरिक वेषभूषेतले – साडय़ांमधले फोटो हे प्राधान्यानी टिपल्यानंतर यावेळी याच रंगांना घेऊन वेस्टर्न आऊटफिटमध्येदेखील हे फोटोशूट आम्ही केलं. नव्या पिढीसाठी, कॉलेजगोईंग विद्यार्थिनींसाठी हे खास फोटोशूट करण्यात आलं होत.
स्टुडिओत दिवसाला कधी एक तर कधी चार फोटोशूट करण्यात आले होते. जेवढे कलाकार तेवढे मेकओव्हर आणि त्यासाठी लागणारी यंत्रणा. नवरात्रीच्या या फोटोशूटसाठी माझ्यासोबत साधारणपणे 28 ते 32 जणांची टीम रात्रदिवस झटत होती. या शूटदरम्यानच्या अनेक गोड अनुभवांची शिदोरी माझ्याकडे कायमची जमा झाली. सण आणि उत्सव हा आपल्या हिंदू धर्मियांच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस. याच सणांचं महत्त्व हेरून वृत्तपत्रे त्या त्या दिवशी पहिली पाने सजवत असतात. अनेकदा अभिनेत्री आणि छायाचित्रकार यांचं नाव त्यावेळी जाहीर होतं. मात्र त्यामागची कल्पना आणि प्रक्रिया नेमकी काय असते ही या फोटोंच्या गोष्टीतून उलगडण्याचा केलेला हा प्रयत्न.
— धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
Leave a Reply