नवीन लेखन...

रविवार बंद

मजबूत शरीरयष्टी, पिळदार मिशा आणि बऱ्यापैकी उंच असलेले रुबाबदार दूध काका त्यांची अगदी स्वच्छ, चकचकीत आणि नजरेत भरेल अशी खास पितळ्याची किटली सायकलला अडकवून दररोज पहाटे घरोघरी दूध घेऊन जायचे. अगदी नित्यनेमाने. इतर कुठल्याही दुधाचा दर्जा या दूध काकांकडच्या दुधाच्या जवळपास सुद्धा नव्हता. भरपूर साय यायची, तूप उत्तम व्हायचं. अगदी मन लावून दुधाचा व्यवसाय करायचे काका. पण इतक्या सगळ्या जमेच्या बाजू असताना त्यांच्या ग्राहकांची कायम एक तक्रार मात्र होती. ती अशी की दूध काका आपल्या या व्ययसायाइतकंच महत्व त्यांच्या परिवाराला द्यायचे. म्हणजे लोकांना त्यांच्या घरच्यांशी काही देणं घेणं नव्हतं; पण आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा म्हणून काका “दर रविवारी चक्क सुट्टी घ्यायचे” ही खरी अडचण होती. काही दुकानांत ती पाटी असते ना… “रविवार बंद”. अगदी तस्स !!
खरं तर दुधाचा व्यवसाय म्हणजे बारमाही आणि आठवड्याचे सातही दिवस करण्याचा धंदा. त्यात सुट्टीला अजिबात स्थान नाही. शिवाय रविवार म्हंटलं की जवळपास सगळ्यांसाठीच एक आळसावलेला , आरामाचा दिवस आणि नेमकं त्याच दिवशी बाहेर जाऊन दूध आणायचं म्हणजे मोठं संकटच. अनेक ग्राहकांनी बरेचदा काकांना सुट्टी न घेण्याचा आग्रह केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. “ शनिवारी थोडं जास्त दूध घेऊन ठेवा !!” असा सल्ला त्यावर द्यायचे काका. ज्यांना दिवसाचा पहिला चहा शिळ्या दुधाचा आवडत नाही ते वगळता बाकीचे हा सल्ला निमूट मानायचे आणि तो एक दिवस कसाबसा ढकलायचे. उरलेले मात्र सकाळी सकाळी काकांच्या नावाने खडे फोडत अर्धवट झोपेत घराबाहेर पडून दूध आणायचे बिचारे.
काकांनी विझिटिंग कार्ड सारखे स्वतःचं नाव आणि संपर्क क्रमांक असलेले भडक रंगाचे छोटे स्टिकर छापून घेतले होते. त्याच्या शेवटी सुद्धा ठळक अक्षरात लिहिलं होतं …“रविवार बंद”. काकांच्या या रविवार बंद प्रकरणामुळे त्यांना अनेक ग्राहकांना मुकावं लागत होतं. पण इतरांप्रमाणे आपणही रविवारी सुट्टी घेऊन आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करावा या मतावर ते ठाम होते. अर्थात सोडून गेलेले ग्राहक नंतर थोड्याच दिवसात पिशवीच्या दुधाला कंटाळून पुन्हा एकदा काकांकडे यायचे तो भाग वेगळा… हळूहळू लोकांनाही याची सवय झाली आणि ते काका आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये “रविवार बंद काका” म्हणूनच ओळखले जाऊ लागले . पण इतक्या वर्षांत आठवड्याच्या उरलेल्या सहा दिवसांमध्ये एखाद दूसरा अपवाद वगळता दूध काकांनी कधी दांडी मारणं तर लांबच पण प्रत्येकाच्या घरी यायची ठरलेली वेळही कधी चुकवली नाही हे मात्र कोणीच नाकारू शकत नव्हतं.
अनेक वर्ष लोटली. काळाप्रमाणे बऱ्याच गोष्टी बदलल्या. सायकल ऐवजी मोटर सायकल आली. काकांचे ‘सिल्की’ केसही दुधासारखे ‘मिल्की’ झाले. पण काही गोष्टी मात्र अगदी तशाच होत्या त्या म्हणजे काकांची पितळी किटली, दुधाचा उत्तम दर्जा, त्यांचा वक्तशीरपणा आणि स्टिकरवरची तळटीप …“रविवार बंद”.
अशाच एका रविवारी काकांच्या अनेक ग्राहकांपैकी एका जोडप्याच्या घरी जरा लगबग होती. रविवार असल्यामुळे साहजिकच काका नव्हते. त्यांच्या नावाने नाक मुरडण्याचा साप्ताहिक कार्यक्रम पार पाडत त्याने खाली जाऊन दूध आणलं. आज त्या दाम्पत्याला त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक मोठा निर्णय घ्यायचा होता. त्यासाठी अनेक महीने दोघांनी खूप चर्चा केल्या होत्या, विचारविनिमय झाले. काही तज्ञांशी सल्ला-मसलत केली आणि शेवटी दोघांनी मिळून तो महत्वाचा निर्णय घेतला. आता त्या निर्णयाची अंमलबजावणी करायला जायचं होतं. चहा-नाश्ता वगैरे आटपून दोघं देवाच्या पाया पडले, गाडी काढली आणि तडक पोचले ते शहरापासून थोडं लांब असलेल्या एका अनाथाश्रमात. अनेक वर्ष मुलबाळ नसल्यामुळे एका गोंडस बाळाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता दोघांनी.
तिकडे गेल्यावर ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांशी संवाद सुरू होता तेवढ्यात तिथे एक आजी आल्या आणि अगदी आपुलकीने स्मितहास्य करत त्या जोडप्यासमोर बासुंदीच्या वाट्या ठेवल्या. जोडप्याच्या चेहऱ्यावर दिसणारं आश्चर्य बघून ते ऑफिसमधले दादा सांगू लागले ..
“ अहो घ्या घ्या , तुमच्यासाठीच आहे ते. एरव्ही आम्ही फक्त चहा-कॉफी देऊन पाठवलं असतं पण आज तुम्ही रविवारी आलात म्हंटल्यावर तुम्हाला गोडाधोडाचं खाऊ घातल्या शिवाय पाठवायचो नाही आम्ही !! “
त्यांचं हे बोलणं होतंय तेवढ्यात दरवाजामागून आवाज आला .
“ अगं ss कुठे आहेस ? तो बबडू केव्हाचा आजी आजी करून शोधतोय तुला !!”
असं म्हणत एक व्यक्ती आत शिरली आणि त्यांना बघून ते जोडपं ताडकन उठून उभं राहीलं कारण ते होते त्यांचे दूध काका .
” रविवार बंद काका ?? तुम्ही इथे ?? “
काका फक्त हसले आणि त्या आजींकडे हात दाखवून म्हणाले
“ या आमच्या सौ. आम्ही दोघं येतो कधीतरी !!“
” म्हणजे तुम्ही ओळखता का एकमेकांना ?? “..ऑफिस कर्मचाऱ्याचा प्रश्न.
“नाहीss ..म्हणजे होsss ….म्हणजे ते काका sss .. आमच्याकडे sss .. !!.“…बोलू की नको अशा संभ्रमात होता तो.
हे ऐकून शेजारी उभे वयस्कर शिपाई काका म्हणाले ..
“ त्ये दूध टाकत असत्याल ना तुमच्याकडं ?? हा हा ss . थांबा त्यो देव माणूस तुम्हाला काय बी सांगायचा नाही बघा . . क्लार्क काका तुम्हीच सांगा बरं पावण्यांना हे इथं कसं ते !!!’
” अरे तुम्ही उगाच काहीतरी sss ? .. दूध काकांची सारवासारव.
त्यांना मध्येच तोडत ऑफिस कर्मचारी म्हणाले ..
” होय होय .. तुम्ही सगळे बसा बरं आधी… अहो हा दोन मजली आश्रम बघताय नाss ही मुळात त्यांचीच वडीलोपार्जित जागा आणि दुधाचा धंदासुद्धा वडीलोपार्जित. अगदी उमेदीच्या काळात थोडे दिवस नोकरी केली या तुमच्या दूध काकांनी पण वडिलांच्या निधनानंतर दुधाच्या व्यवसायाकडे वळले. पुढे ही जागा या आश्रमासाठी विनाअट दान केली आणि तेव्हापासून दर रविवारी हे दोघं इथे येतात अगदी न चुकता !!”.
” अहो काकाss पण तुम्ही तर म्हणायचात की कुटुंबासाठी सुट्टी घेता म्हणून? “.. जोडप्याचं कुतूहल.
” होय , मग हेच तर आहे माझं कुटुंब !!… मितभाषी काका म्हणाले.
हे सगळं ऐकून आजी थोड्या भावूक होत त्या जोडप्याला म्हणाल्या
” अरे बाळांनो …. तुम्ही आत्ता ज्या परिस्थितितून जाताय ना अगदी तशाच मनस्थितीतून एके काळी आम्ही दोघे गेलो आहोत. आमच्या झोळीत सुद्धा परमेश्वराने अपत्याचं दान टाकलं नाही. नंतर आम्हीही दत्तक घेण्याचा विचार करू लागलो पण तोवर आमचं वय वाढलं होतं आणि तुमच्या काकांनी एक वेगळाच दृष्टिकोन माझ्यासमोर मांडला .. म्हणाले “मुल दत्तक घेऊन त्या एकाच बाळाचे आई-बाबा होण्यापेक्षा अनेक मुलांचे झालो तर ? … त्याचा जास्त आनंद होईल .. शिवाय आपल्यासारख्या इतर काही जोडप्यांना सुद्धा त्यामुळे आई-बाबा होण्याची संधी मिळाली तर दुधात साखर !!”. .. त्यांचे हे प्रगल्भ विचार ऐकून मी लगेच होकार दिला. आपल्या भविष्याच्या पुंजीचा, उदरनिर्वाहाचा विचार न करता दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी ही जागा या अनाथाश्रमासाठी अगदी सढळहस्ते दान केली. खरंच मला खूप अभिमान वाटतो तुमचा !!.” ..
काकूंचे पाणावलेले डोळे बघून काका म्हणाले.
” अगं .. तसंही हे दुमजली घर काही मी कमावलेलं नव्हतं .. उलट त्याचा असा सामाजिक कार्यासाठी, या चिमुकल्या मुलांच्या संगोपनासाठी उपयोग होतोय हे बघून आपल्या पूर्वजांना नक्कीच समाधान वाटत असेल. आणि मी फक्त जागा दिली हो ss ; बाकी सगळं दैनंदिन व्यवस्थापन, खर्च , नियोजन वगैरे हे इथले सगळे आश्रमाचे विश्वस्त आणि सक्षम कर्मचारी बघतात. त्यात आमची काहीच भूमिका नसते. आम्हाला इथे दर रविवारी यायला मिळतं , या आमच्या परिवारासोबत मनमुराद राहायला- खेळायला मिळतं हीच आमच्यासाठी मोठी पर्वणी आहे. बाकी आमच्या पोटापाण्यासाठी म्हणाल तर आमचा दुधाचा धंदा आहेच की. त्यात भागतं आमचं म्हातारा म्हातारीचं. आणि तुम्हाला सांगतो sss या माऊलीनी सुद्धा काही कमी कष्ट नाही केले बरं या आश्रमासाठी. दर रविवारी पहाटे उठून माझ्याबरोबर ती इथे येते. तुम्हा सगळ्यांना मिळून दर दिवशी जितकं दूध देतो तेवढं सगळं रविवारचं दूध घेऊन आम्ही इथे येतो. आश्रमाच्या स्वयंपाकघरात ती स्वतः सगळ्यांसाठी कधी खीर , कधी बासुंदी, श्रीखंड, पनीर, रबडी , असं काही ना काही करते. अगदी दांडगा उत्साह आहे तिचा !!. “
” आमची मुलं सुद्धा रविवारची खूप आतुरतेने वाट बघत असतात बरं का ??.. ऑफिस कर्मचारी सांगू लागले … “
…..आणि ते नुसतं या पदार्थांसाठी नाही हं ss .. आजी आजोबांचा लळा आहे सगळ्या लेकरांना. दोघं सगळ्यांचे खूप लाड करतात. एखाद्या लहानग्यासाठी आजोबा घोडा होऊन त्याला पाठीवर घेतात. एखाद्या चिमूकलीला गोष्ट सांगतात. कोणाशी पत्ते , खेळ, श्लोक असं काय काय चालू असतं दिवसभर. एकदम कल्ला.. आणि आजींचा एकदा स्वयंपाक झाला ना की मग कोणाला वेणी घालून देतील, हस्तकला-चित्रकला शिकवतील , वयात आलेल्या मुलींना चार गोष्टी सांगतील. अगदी हरहुन्नरी आहेत आजी. डोक्याला तेल लावून मस्त चंपी करून घ्यायला तर लाईन लावतात मुलंमुली आजींकडे. म्हणून रविवार हवा असतो या आमच्या सगळ्या छोट्या मंडळींना !!”
दूध काकांबद्दलचं हे सगळं वास्तव बघून जोडपं पार हेलावून गेलं. दोघं त्यांच्यापाशी गेले आणि तो गहिवरून म्हणाला.
“काकाss अगदी खरं सांगतो ss.. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही सुट्टी घेता आणि आम्हाला रविवारी आरामाच्या दिवशी सकाळीच सकाळी दूध आणायला जायला लावता असे विचार मनात यायचे हो कधीतरी पण आज मलाच ओशाळल्यासारखं वाटतंय … तुमच्या कुटुंबाची व्याख्या आणि व्याप्ती इतकी मोठी आहे हे बघून खूपंच क्षुद्र असल्यासारखं वाटतंय हो .. आम्हाला बाळ नाही होणार म्हणून खूप नैराश्य आलेलं … पण इथे आल्यावर पटलं की आमचा निर्णय तर योग्य आहेच पण त्यासाठी आम्ही अगदी योग्य ठिकाणी आलोय. खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात काका !!”.
असं म्हणत दोघांनीही त्यांना वाकून नमस्कार केला ..
” अरे sss उठा उठाss आणि ते नैराश्य पहिलं काढून टाका बरं .. कदाचित नियतीची त्यामागे काहीतरी वेगळी योजना असेल .. आता आमचंच बघा ना ss आम्हाला नैसर्गिक मुलबाळ असतं तर मी असा आश्रम सुरू करून देण्याचा विचारही केला नसता कदाचित. पण आज इतक्या सगळ्या मुलामुलींना आधार मिळावा, छप्पर मिळावं असं त्या नियतीच्या मनात असेल म्हणून आम्हाला अपत्यप्राप्ती झाली नाही असं मी मानतो .. तेव्हा अगदी निश्चिंत मनाने सगळी प्रक्रिया पूर्ण करा, कागदपत्रांची पूर्तता करा आणि एक छानसं बाळ दत्तक घ्या. आणि हो ss.. तुमच्या या योग्य निर्णयासाठी आमच्या हिच्या हातची बासुंदी खाऊन तोंड गोड करा बरं ss .. बघा दुधाची चव ओळखीची वाटतेय का ? …. ते ही “रविवार बंद” च्या दिवशी ……… हा हा हा sss … चला तुमचं चालू दे .. उद्या पहाटे येतोच तुम्हाला उठवायला !!…
” चला ओ आज्जीबाई .. सगळी लेकरं वाट बघत असतील .. मगाशी तुमची चिल्लर पार्टी म्हणत होती की पुढच्या रविवारी आजी आईस्क्रीम पार्टी देणारे … कबूल केलंय ना मग पुरवा आता नातवंडांचे लाड पुढच्या “रविवार बंद” ला !!”.
–– क्षितिज दाते.
ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

1 Comment on रविवार बंद

  1. खूप छान, हृदयस्पर्शी कथा. तुमची लेखनशैली आवडली. तुमच्या आणखी कथा वाचायला मिळाव्यात अशी अपेक्षा ठेवतो.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..