‘शादी का लड्डू’ खाऊन झालेल्यांना प्रत्येक वेळेस तो पचतो असं नाही. काही काळातच छोट्या छोट्या कुरबुरी सुरु होतात. या छोट्या छोट्या कुरबुरी दुर्लक्षित ठेवल्या तर काही काळातच मोठ्या कटकटी बनतात आणि हळूहळू त्या जोडप्यांत वादविवाद सुरु होतात. या अडचणी ठरवून केलेल्या लग्नांतच (arranged marriage) येतात असं नाही हं!! काही महिने ते काही वर्षं ‘डेटिंग’ नंतर झालेल्या प्रेमविवाहातदेखील हे खटके मोठ्या प्रमाणात उडत असतात हे अशा कित्येक केसेस हाताळल्यावर सांगू शकतो.
या तक्रारींची कारणे दोनच. त्या जोडप्यात १. संवादाचा असलेला अभाव आणि २. सततचा विसंवाद. एखाद्या नवीन लग्न झालेल्या जोडप्याने चार प्रमुख बाबींत आपल्या जोडीदाराशी मोकळा संवाद साधायला हवा. या चारही बाबींबद्दल आपण यथावकाश सविस्तरपणे जाणून घेणार असलो तरी आज तोंडओळख करून घेऊया!
१. मानसिक:
आपली भावनिक गुंतवणूक, त्यामागील कारणे, क्षमता इत्यादि गोष्टींचा यात समावेश होईल.
२. बौद्धिक:
आपले क्षेत्र, सभोवतालची सामाजिक/ राजकीय परिस्थिती इथपासून ते आपल्या आवडीनिवडींपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा यात अंतर्भाव होईल.
३. शारीरिक:
वैवाहिक जीवन सुखासमाधानाचे असावे याकरता आपल्या शारीरिक गरजा, आवडीनिवडी यांबाबत आपल्या जोडीदाराशी संवाद साधणे.
४. अन्य:
जसे की आपल्या कुटुंबातील अन्य सदस्य, मित्रपरिवार, आर्थिक बाबी इत्यादि.
या चार मुद्यांच्या अनुषंगाने एकमेकांशी संवाद साधताना कोणतेही पूर्वग्रह ठेवू नका. अगदी कोऱ्या पाटीने एकमेकांना सामोरे जा. आपल्याला संपूर्ण आयुष्य एकमेकांसह अतिशय सुखाने व्यतीत करायचं आहे हा विचार डोक्यात सतत असू द्या. या मुद्यांतील ज्या गोष्टींत मतभेद असतील त्यांवरही पुन्हा संवाद साधून मार्ग काढणे सहजशक्य असते हेदेखील ध्यानी असू द्या. लग्नच कशाला; कोणतेही नातेसंबंध बळकट होत असतात ते संवाद साधल्यानेच. कितीही वर्षे एकमेकांना ओळखत असलात तरी पुन्हा एकदा अशी सुरुवात करा. नव्या लग्न झालेल्या जोडप्यांनीच नव्हे तर; ‘लग्नाळलेली’ जोडपी आणि छोट्या छोट्या कुरबुरीवाली विवाहित जोडपी अशा सगळ्यांनीच…..सुसंवाद साधा!!
© वैद्य परीक्षित स. शेवडे; एम.डी. (आयुर्वेद)
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।।
0251-2863835
(लेखक हे आयुर्वेदीय वंध्यत्व उपचार तज्ज्ञ असून विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशन करतात.)
Leave a Reply