अर्नाळकर,नाईक ओलांडून सुहास शिरवळकरांच्या मंदार कथा, दारा बुलंद कथांकडे जाताना वय आडवे आले नाही. प्रचंड खपाच्या, वेगळ्या धाटणीच्या रहस्यकथा या माणसाने आणल्या आणि इतरांचा वाचकचर्ग अक्षरशः हिसकावून घेतला.
मध्येच ट्रॅक बदलून हे महोदय सामाजिक कादंबऱ्यांकडे वळले. आम्ही त्यांच्या मागोमाग ! फार पूर्वी नोकरी सोडून फक्त लेखनाच्या मानधनावर त्यांनी शनिवार पेठेत फ्लॅट घेतला आणि पूर्णवेळ साहित्यिकी स्वीकारली. बहुप्रसवा लेखणी असली तरी त्यातील ताजेपणा, भाषेचा लहेजा वेड लावणारा होता. ” दुनियादारी ” कादंबरीने त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली.
एका उर्मीत मी त्यांना फॅन मेल टाईप पत्र टाकले आणि तात्काळ उत्तरापाठोपाठ त्यांचे “घरी या” असे आग्रहाचे निमंत्रण आले. दोस्ती जमली.
विट्याला काही कार्यक्रमानिमित्त आलेले सुशि अचानक एका सायंकाळी माझ्या घरी, इस्लामपूरला आले. त्यांना माझ्या स्थानिक साहित्यिक मित्रांना भेटविण्यासाठी मी कौतुकाने गावात गेलो. बऱ्याचजणांना सुशि माहीतच नव्हते. माझा झालेला पोपट ते स्मितवदनाने बघत होते.
दुसऱ्या दिवशी त्यांना माझ्या इंजिनिअरिंग कॉलेज वर नेले. नियतकालिकाचा संपादक असल्याने आमच्या चार विद्यार्थ्यांना पकडून त्यांची फक्कड मुलाखत घेतली. ( अर्थात मुलांना आधी पढवावे लागले अन्यथा दुसऱ्यांदा माझी फजिती झाली असती.)
त्यारात्री घरी हृषीदांचा “अनुराधा ” टीव्ही वर पाहिला आणि त्यावर मनसोक्त गप्पा मारल्या.
दुसऱ्या दिवशी ते पुण्याला परतले. माझ्या पत्नीने दिलेले पोहे फस्त करून म्हणाले- ” आता दाढा खवळल्या आहेत. किमान तीन प्लेट पोहे मला लागतात पोट भरण्यासाठी !”
त्यानंतर पुण्यात बेडेकर मिसळ, पुणे नगर वाचनालय आणि कधी घरी भेटीच भेटी होत राहिल्या. मला आणि माझ्या पत्नीला ” सालेम ” या पुस्तकाची नवी आवृत्ती त्यांनी अर्पण केली.
या वाचकप्रिय लेखकाची फारशी नोंद मराठी साहित्य विश्वाने घेतली नाही. समीक्षकांच्या नजरेतून ते कायम गावकुसाबाहेर होते.वाचकांच्या धोधो प्रेमापुढे असल्या गोष्टी त्यांच्या खिजगणतीतही नव्हत्या.
थोडेफार पुरस्कार मिळाले असतील पण ते त्यांच्या वकुबाच्या मानाने काहीच नव्हते. पण वाचनालयांच्या चार्टवर त्यांचं नांव कायम पहिलं असायचं, आणि त्यांची कथा पाहूनच दिवाळी अंक घेतले जायचे.
अलीकडचा “दुनियादारी “चित्रपट गाजला तो त्यांच्या पश्चात ! कादंबरीच्या तुलनेत तो काहीच नव्हता. ते हयात असते आणि त्यांनी पटकथा लिहिली असती तर तो चित्रपट नक्कीच एका इयत्तेने वर गेला असता.
त्यांच्या जाण्यानंतर थोडा वेळ त्यांचे पार्थिव मसाप मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. तेवढेच परिमार्जन !
कदाचित ही त्यांची पहिली खेप असावी सरस्वतीच्या महामंडित दालनात शिरायची.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply