अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये एकनाथराव खडसे यांनी लिहिलेला हा लेख
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात कोथळी यागावी गणेशचतुर्थीच्या दिवशी मी जन्माला आलो. माझे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. माध्यमिक शिक्षण औरंगाबादला घेण्यासाठी जावे लागले. कारण त्याठिकाणी माझे दोघे भाऊ कॉलेजमध्ये शिकत होते. एक मेडिकलला होता तर दुसरा एम.एससी करत होता. मी मात्र कॉमर्स शाखेकडे वळलो. अकोला येथील कॉलेजमध्ये गेलो. आणि बी. कॉम पदवी मिळवली. मला नोकरी करायचीच नव्हती. माझ्या डोक्यात फॅक्टरी काढण्याचे विचार होते. म्हणून प्लॅस्टिक मोल्डिंगचा डिप्लोमा हा अभ्यासक्रम करण्यासाठी मुंबई गाठली. अकोल्याला एक युनीट सुरु केले. त्यात नायलॉनची बटनं व बॉलपेनचे मोल्डिंग करीत होतो. २ वर्षे जीव तोडून काम केल्यावर देखील या कामात मला यश मिळू शकले नाही. म्हणून घरी परत आलो व शेती करू लागलो.
गावी आल्यावर लोकांच्या आग्रहास्तव ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली व निवडून देखील आलो. गावात पिकांच्या चोऱ्या होत होत्या. मी तरुण असल्यामुळे चीड येत होती.
शेतकरी शेतात राबराब राबतात व पीक घेण्याचा प्रयत्न करतात आणि चोर ते चोरून नेतात माझे प्रयत्न चोराला पकडण्याकडे चालू होते. त्यांत मला बऱ्यापैकी यश देखील लाभत होते. माझ्या या प्रयत्नामुळे गावातील काही नेत्यांनी मला पीकसंरक्षक सोसायटीच्या निवडणूकीला उभे राहण्याचा आग्रह धरला. शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. त्यांना आपल्याला मदत करता यावी या उद्देशाने मी निवडणूक लढवली व निवडून आलो. माझ्या एकंदरीत कामाचा झपाटा बघून सलग २वर्षे लोकांनी मला पीकसंरक्षक सोसायटीचा अध्यक्ष म्हणून निवडून दिले. त्या बरोबरीला खरेदी-विक्रीसंघात देखील काम करीत होतो. भाजपाचा मी हाडाचा कार्यकर्ता आहे. ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून निवडून आलो. गावाच्या राजकारणात मी पूर्ण गढून गेलो होतो. खरेदी विक्रीसंघाचे चेअरमन पद देखील मला भूषवावे लागले. यातून पंचायत समितीवर काम करण्याची संधी मिळाली.
विविध स्तरावर काम करण्याचा हा माझा प्रयत्न म्हणजे खरंतर महाविद्यालयीन जीवनात सुरुवात झाली. शिकत असतांनाच मी महाविद्यालयातील निवडणूक लढवीत होतो. तालुका पातळीवर पतसंस्था, सहकारी संस्था, तेलबिया, गृहनिर्माण, दूध उत्पादक संस्था, विविध कार्यकारी संस्था अशा अनेकविध संस्थांमध्ये कामाचा अनुभव मिळाला. तालुका शिक्षण समितीवर निवडून आलो व सचिव म्हणून १२ वर्षे काम करता आले. प्रत्येक टप्प्यावर कुणीतरी भेटत गेले व माझ्या जीवनाला दिशा मिळत गेली. भुसावळ पीपल्स को ऑप. बँकेचा संचालक झालो. कृषी उत्पन बाजार समितीचा संचालक म्हणून १० वर्षे काम केले. सहकारी तत्वावर चालणाऱ्या संस्थांमध्ये काम केल्यामुळे योजनांची माहिती झाली व त्याची अंमलबजावणी करण्याचा अनुभव मिळाला. जनतादलाचे तालुका उपाध्यक्षपद लाभले. ७ वर्षानंतर भाजपाचा जिल्हाध्यक्ष झालो. अनुभवाचे फलित मोठे असते महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी चालून आली.
१९९० मध्ये आमदारकीचे तिकीट मिळाले. एदलाबाद हा मतदारसंघ त्याआधी पूर्णत: काँग्रेसमय होता. तिथून प्रतिभाताई पाटील सतत निवडून येत होत्या. त्या १८ वर्षे मंत्री होत्या. त्यामुळे माझ्यासाठी ही निवडणूक हे मोठे आव्हानच होते. परंतु एकच जमेची बाजू होती की, तालुक्यात सतत १५ वर्षे वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करीत होतो. या कालावधीत जनतेची निस्वार्थबुद्धीने सेवा केल्यामुळे लोकांचे प्रेम संपादन केले होते.
आणि या सर्वांचा परिपाक म्हणून लोकांनी मला आमदार म्हणून निवडून दिले. १९९५ मध्ये पुन्हा मी आमदार म्हणून निवडून आलो. थोड्याच दिवसात मंत्री पदाची माळ माझ्या गळ्यात पडली. खात्याच्या संबंधित अधिकाऱ्याच्याकडून विविध योजनांची माहिती करुन घेत होतो. शिवाय तालुकास्तरावरील विविध संस्थांमध्ये काम केलेले असल्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला व मी माझ्या मतदारसंघात या योजना कशा नेता येतील व त्याचा फायदा तेथील जनतेला कसा होऊ शकेल याचा समन्वय करू शकलो. शिक्षण, वित्त व नियोजन व पाटबंधारे खात्याचा मंत्री म्हणून काम केले. आमदार व्हायच्याआधी मी स्वतःची शेती करीत होतो. त्यामुळे शेती करतांनाच्या अडचणींची मला पूर्ण कल्पना होती. पाण्याशिवाय शेती करणे बेभरवशाचे झाले होते. कारण पाऊस कमी त्यामुळे विहिरी खोदल्याशिवाय पाण्याचा दुसरा स्तोत्र उपलब्ध नव्हता. शेती करू लागल्यावर मी माझ्या शेतात सहा/ सात विहिरी खोदल्या होत्या सारखा पाण्याचा शोध घेत होतो. पाटबंधारेमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी कसे पुरविता येईल याचा विचार करता येईल हे बघता आले व शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यात मला यश आले. तसेच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहण्याची मला संधी मिळाली.
यानंतर १९९९, २००४, २००९ व २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुका मी लढवल्या व त्यात सातत्याने निवडून आलो. २००९ मध्ये मी विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू लागलो. मंत्री असतांना केवळ त्या खात्याची मला माहिती असावयाची. पण विरोधी पक्ष नेता झाल्यावर सर्व खात्याचे महाराष्ट्र भरातील प्रश्न मला समजू लागलेत. व त्यामुळे राज्याचे प्रश्न व त्यावर अपेक्षित कार्यवाही काय असावी याचे मला ज्ञान प्राप्त झाले.
२०१४ नंतर मला कृषी, दुग्ध विकास, मत्सोद्योग, महसूल व राज्य उत्पादन शुल्क अशा विविध विभागांची जबाबदारी असलेले मंत्रीपद लाभले. त्यामुळे माझ्या कार्यशक्तीला ते एकप्रकारे आव्हानच होते. आपल्याला काम करण्यासाठी किती ऊर्जा लागते याचा खरं म्हणजे आपल्यालाच अंदाज नसतो. मी एवढी खाती कार्यक्षमतेने सांभाळलीत.
बालवयापासूनच मला वाचनाची आवड होती. कथा, कादंबऱ्यांचे वाचन करीत होतो.वडिलांनी खाऊसाठी दिलेल्या पैशाचा विनियोग लायब्ररीची फी भरण्यासाठी करीत असे. गावात शिकलेला असून नोकरीला न गेलेला मी असल्यामुळे श्रावण महिन्यात पोथी वाचायला मला बोलावले जाई. त्यामुळे हरीपाठ, महाभारत, रामायण, भागवत,
दासबोध इत्यादी धर्मग्रंथाचे माझे वाचन होत होते. त्यामुळे मला आपल्या धर्म ग्रंथांचे ज्ञान झाले. वारकरी संप्रदायाचा जवळून परिचय झाला व त्यातून मी एक विषय घेऊन कीर्तन करु लागलो. माझ्यावर धार्मिक पगडा खूप होता. असंख्य अभंग माझे तोंडपाठ झाले. मी प्रवचन करू लागलो या माध्यमातून भावनात्मकतेने माणसे जोडली गेली. अन्यथा, कुठल्याही राजकीय वारसा नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, तालुक्यातील इतर सरकारी संस्था व त्यानंतर ३० वर्षे पर्यंत आमदार म्हणून कोण निवडून देणार? मी भरपूर प्रवास केला, सर्व विभागांशी संबंध जोडले, कोणताही संबंध तुटू दिला नाही. कॉलेजमधील मित्रमंडळींशी मी अजून संबंध बाळगून आहे. अधिकारी वर्गाशी तर मी अधिक संबंध ठेवतो कारण मला माहीत आहे की, छोट्या छोट्या कामांसाठी त्यांचाच उपयोग होतो. प्रसंगी तेच मोठमोठी कामे देखील करून देतात.
राजकीय जीवनात चढउतार चालूच असतात मी त्यामुळे कधीच नाऊमेद होत नाही कारण मी समाधानी आहे. मला जे मिळाले ते खूप आहे. मला राजकीय काहीही पार्श्वभूमी नसतांना मी इथपर्यंत पोहोचलो यातच मी आनंदी आहे. अर्थात् राजकारणात असल्यामुळे दिवसाचे १४/१६ तास घराबाहेर असतो कित्येकदा तर दिवसेंदिवस बाहेर असतो. त्यामुळे साहजिकच पत्नीला माझा कौटुंबिक सहवास कमी लाभतो. परंतु माझ्या राजकीय यशात तिचा मला संपूर्ण पाठिंबा असल्यामुळे केवळ मी एवढ्या उड्या मारू शकतो. माझी मुलगी जळगाव जिल्हा सहकारी बँकेत अध्यक्ष आहे व ती कार्यक्षमतेने कारभार करते तर माझी पत्नी जिल्हा दूध महासंघाची अध्यक्ष असल्यामुळे ती देखील कार्यरत राहाते. सूनबाई जळगाव जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून आल्यामुळे तिचा वावर जळगाव जिल्ह्यात सारखा असतो व विविध कार्यक्रमामध्ये ती व्यग्र असते.
पाटबंधारे मंत्री असतांनाची गोष्ट सांगतो. एक आंधळे कुटुंब मला भेटायला आले. दोघेही ठार ठार आंधळे होते. त्यांच्याकडे माझे लक्ष गेले. मी त्यांना विचारले की काय काम आहे. त्यांनी सांगितले. घाटघर धरणात त्यांची जमीन गेली आहे. ते धरणग्रस्त आहेत. त्यांचा मुलगा एस.एस.सी. पास असून तोच त्यांचा आधार आहे. खालचे अधिकारी कुणीच दाद देत नाही म्हणून आपल्याला भेटायला आलो. कृपा करून माझ्या मुलाला नोकरी मिळवून द्या. तो नोकरीला लागला तर तो आमचा नीट सांभाळ करू शकेल. त्यांचे जोडलेले हात व त्यांची करूण कहाणी ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी तत्काळ संबंधित अधीक्षक अभियंत्याला फोन केला व केस त्यांना समजून सांगितली व त्या जोडप्याच्या मुलाला धरणग्रस्त म्हणून नोकरी देण्याविषयी सूचना दिल्या. त्यानंतर मध्ये बराच कालावधी निघून गेला. असाच मी एकदा नाशिकला दौऱ्यावर होतो..
रेस्टहाऊसवर मला भेटायला येणारे गर्दी करीत होते. या गर्दीत हे अंध जोडपे होते. त्यांचा नंबर लागल्यावर मी त्यांना विचारले, ‘आपले काय काम आहे? ‘ मी त्यांना विसरलो होतो. ते म्हणाले, ‘साहेब, काम काहीच नाही. आपल्या कृपेने माझ्या मुलाला नोकरी लागली.
त्याचे लग्न झाले, ही सून व हा नातू आपल्या भेटीसाठी आलेत. त्यांना आपला आशीर्वाद द्या. या अंध जोडप्याने माझ्या डोळ्यात दोन वेळा पाणी आणले. परंतु त्यामुळे मला समजले की आपल्याला चांगली कामे करता येतात. दोन, दुःखिताचे अश्रू पुसता येतात हाच माझ्या जीवनातील खरा आनंद. माझ्या जीवनात आलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या माणसांच्या वागण्यातूनच मी शिकत गेलो. माझा स्वभाव बदलत गेला व माझ्या कर्तृत्त्वाला नवनवीन कंगोरे पडत गेले.जीवनाचा मागोवा घेतांना लक्षात आलं, भेटलेली काही कुटुंब दुःखाने किती पिचलेली आहेत. शेतकरी कुटुंबातील असतील तर पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेती करणाऱ्यांचे दुःख वेगळेच. शेतीतून पाण्याअभावी उत्पन्न नीट येत नाही. बँकेकडून घेतलेले कर्ज फेडता येत नाही. संसारातील विविध प्रश्न आ वासून उभे असतात. त्यात मुलाचे शिक्षण असेल, मुलीच्या लग्नाचा प्रश्न असेल, पैशाशिवाय यातील काहीही प्रश्न सुटू शकणारे नसतात. घरातल्या कर्त्या पुरुषाला आपण काहीही करू शकत नाही हा विचार सारखा छळतो. आणि मग अशाच एखाद्या बेसावधक्षणी त्याला मरणाला मिठी मारावी लागते. काही कार्यकर्ते आमच्याबरोबर असतात रात्रंदिवस परंतु त्यांचे व्यक्तिगत प्रश्न कधीकधी ते सांगत नाही. कुणीतरी जवळचा माणूस मग ते सांगतो मग त्याला योग्य ती मदत करता येते. अन्यथा त्याची व्यथा त्याच्याच जवळच राहाते. राजकरणाच्या या धबडग्यात ती लक्षात देखील येत नाही. हीच गोष्ट आमच्या ड्रायव्हरची. कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रम संपल्यावर कुठेतरी आमची जेवणाची सोय केलेली असते. एका ठिकाणी माझा ड्रायव्हर जेवलाच नाही. आम्ही पुढील कार्यक्रमाला निघालो. तो सारखा पाणी पीत होता. त्याला विचारले तर तो म्हणाला, ‘जेवण मिळाले नाही.’ त्याप्रसंगानंतर मी दौऱ्यावर असतांना आधी माझ्या ड्रायव्हरच्या व बॉडीगार्डच्या जेवणाची व्यवस्था झाली आहे किंवा नाही याची चौकशी करतो.
राजकारणात विविध पदे लाभलीत. सामान्य माणसाच्या आयुष्यात ज्या अपेक्षा असतात त्यातील बऱ्याचशा पुऱ्या करता आल्यात परंतु दौऱ्यात भेटलेल्या दु:खितांचे प्रश्न व पीडीत महिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे बळ मला परमेश्वराने द्यावे ही अपेक्षा करतो. कारण जग खूप मोठे आहे. त्यांचे प्रश्न देखील खूप मोठे आहेत. ते सोडवितांना लागणारी माझी ऊर्जा कमी पडते हीच माझ्या मनातील सल आहे.
काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा
-एकनाथराव खडसे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
Leave a Reply