हा चित्रपट चालला नाही, याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. नाना, विक्रम ( मला वाटतं हे दोघं त्यानंतर ” नटसम्राट” चित्रपटात एकत्र आलेत. अर्थात दळवींच्या ” महासागर” नाटकात ते होते, पण फारसे समोरासमोर आले नव्हते. त्या दोघांच्या खडाजंगी किंवा अभिनयाच्या लढती त्यामुळे “महासागर” मध्ये अनुभवता आल्या नाहीत.), दिलीप कुलकर्णी, दीपा श्रीराम लागू, अरुण जोगळेकर (सईचे पती), छोट्याशा भूमिकेत गौतम ( सईचा मुलगा आणि नाना पाटेकरांच्या “प्रहार” मधील लीड – माधुरीचा प्रियकर), संगीतकार भास्कर चंदावरकर आणि हो जोडीला अमोल पालेकर नामक दिग्दर्शक आणि त्याची पूर्वपत्नी चित्रा अशी यच्चयावत मराठी फौज ! मग त्यांचा (आणि त्यांच्या कवितेचा हिंदीत) काय उजेड पडणार?
( थोडासा नाना हेच हिंदीतील चलनी नाणं), अनिता कंवर सारखी हिरॉईन (जिचा परीघ थोड्याफार मालिकांपुरताच सीमित), सगळ्या चित्रपटभर कवितांच्या कडव्यांसारखे ( हा प्रयोग ” लेकुरे” मध्ये आणि रेखाच्या ” खूबसूरत” मध्ये अतिरेकी स्वरूपात) बोलणे (काव्य आवडतं, पण ) तीन तास तीच लय बोअर करणारच, आणि ऑफ बीट कथानक !
मीही तो आजवर चित्रपटगृहात पाहिलेला नाही. खूप वर्षांपूर्वी अचानक एका रात्री डी डी चॅनेल वर लागला असताना माझ्या नशिबी चांगला योग आला. अर्थात त्याची निर्मिती दूरदर्शनची आहे आणि बहुधा सरकारी अनास्थेने त्याचे मार्केटिंग चांगल्या प्रकारे न झाल्याने तो वाटेतच संपला आणि प्रेक्षक एका अप्रतिम चित्रानुभवाला मुकले. नंतर तू-नळीने ती कायमची सोय करून ठेवली आहे.
” पाकिजा ” नंतर पडद्यावर पाहिलेली मी दुसरी कविता ! त्यानंतर ” बाजार ” आणि “इजाजत ” बस्स ! संपली माझी पांढऱ्या पडद्यावरील कवितांची यादी !
उजाड /ओसाड गावी (आणि रटाळ जीवनातही), दुष्काळ पडलेला असताना एक स्वप्नविक्या ( खरं तर पाणी नावाचं स्वप्न विकणारा नाना पाटेकर) जादूगाराच्या बुरख्याखाली येतो.
असुंदर आणि आत्मविश्वासहीन अनिताला नाना ” एका तळ्यात होती ” चे महत्व पटवून देतो. “ती कशी असावी” याबाबत गावात चाललेल्या उखाळ्या-पाखाळ्या यांच्याकडे दुर्लक्ष करायला सांगून, ” तू जशी आहेस तशीच सुंदर, देखणी आहे ” असे पावसाचे शिंतोडे तिच्यावर उडवतो. स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केल्यावर आणि आकलनाचे नवे बोध झाल्यावर पावसानंतरच्या धरती सारखी ती तरारते.
” अशी पाखरे येती” मध्ये विजय तेंडुलकरांनी असंच सिद्ध करून दाखविलं होतं. (या नाटकातला अरुण सरनाईकचा नितांतसुंदर अभिनय आजही वस्तुपाठ आहे . ) कदाचित अमोलची प्रेरणा हेच नाटक असावे. पाच हजार रुपयाच्या बदल्यात नाना खराखुरा आत्मबोधाचा पाऊस आणतो आणि उजाड/रसहीन जीवनात थोडंसं “रुमानी ” ( हिरवळयुक्त प्रेम) आणू या असं सुचवितो.
आजच्या काळात आपणही थोडं “रुमानी ” व्हायला काय हरकत आहे?
कधी नव्हे ती कवितेची आठवण प्रकर्षाने होत आहे आणि नानाच्या श्रवणीय /अर्थपूर्ण स्वगतांची !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply