आजचा मनुष्य नितीमत्ता,शिष्टाचार,माणुसकी ह्या गोष्टींना कवडीमोल समजत आहे. परंतु सत्ता, संपत्ती ह्यांचा वापर करून बाजारातून विकत घेण्याच्या वस्तू नाहीत. वारेमाप संपत्तीची लुट करून त्या मिळवताहि येत नाही. जर मिळवायच्या झाल्या तर यासाठी, त्या ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगी विविध पैलूंनी कशा प्रकट होतात, याचे दीर्घकाळपर्यंत निरीक्षण करावं लागतं.
परंतु यासाठी आपला वेळ घालविणे व निरीक्षण करण्याची कोणालाही गरज वाटत नाही.आणि तसे प्रयत्नही केले जात नाही.
आजचा युवक कोणा युवतीवर प्रीत करत असेल तर, त्यामध्ये नव्वद टक्के शारीरिक आकर्षण असते. परंतु विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेता आले पाहिजे.आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती जीवनसाथी म्हणून साथ देईल का ? वैचारिक क्षमतेने पटवून घेईल काय ? त्या व्यक्तीच्या आशा आकांक्षा काय आहेत ? ती आपल्याला संकटातही साथ देईल का ? त्या व्यक्तीच्या आकांक्षा पूर्ण करण्यास आपण समर्थ आहोत काय ? आपले जेवढे प्रेम आहे तेवढेच त्या व्यक्तीचे प्रेम आहे काय ? याप्रकारच्या अनेक प्रश्नांचा विचार करून निर्णय घ्यावा.
वरील बाबींचा विचार न करता, आपले प्रेम प्रकट करणे आणि प्रसंगी नकार मिळाला तर तिरस्कार, घृणा यासारखे अयोग्य वर्तन केले जातात. परंतु हे सर्व घडण्यापूर्वी आपण शंभरदा विचार करायला हवा, आणि खरे प्रेम कोणतीही अपेक्षा ठेवीत नाही.
खरे प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला आनंद मिळाला नाही तरी आपली प्रिय व्यक्ती आनंदी राहावी याचा कसोसीने प्रयत्न करते. प्रेम म्हणजे केवळ शरीराने जवळ येणे नव्हे तर मनानं जवळ राहता आले पाहिजे.एकमेकांच्या सुख दुखांसाठी प्रयत्न करता आले पाहिजे. एका कविने म्हटले आहे,
” प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघांपर्यंत पोचलेलं ”
खऱ्या प्रेमामध्ये मनासोबत शरीरानेही जवळ येण्याची आकांक्षा असू शकते.पण आपल्या प्रिय व्यक्तीला जवळ राहण्यात आनंद वाटत असेल तर, तशी आशा बाळगणे न्यायोचित अन्यथा गैरच .आपल्या प्रिय व्यक्तीला संकटातून सोडवता आले पाहिजे. प्रसंगी धीर देता आला पाहिजे. गरज पडल्यास संरक्षकाची भूमिकाहि पार पाडता आली पाहिजे. परंतु या सर्व प्रसंगी आपण काही उपकार करत आहोत असा तिळमात्रही मनात विचार येऊ नये.
आपण निस्वार्थी प्रेम करून, जर इतरांच्या जीवनात थोडासाही आनंद निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले तर आपल्या जीवनात आनंदाचे लक्ष लक्ष क्षण येतील.
सुख दुखाचे क्षण निर्माण करणे हे परमेश्वराच्या हातात आहे.आपण फक्त त्यात निमित्त्य असतो. जीवनाच्या सारीपटावरील आपण मोहरे आहोत, जेवढे अंक पडतील तेवढीच घरे आपण चालायचे हा आपला अधिकार. हे जर सत्य आहे तर कोणाच्याही जीवनात आपण सुख निर्माण करू शकत नाही, म्हणून दुख निर्माण करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही . आणि दुसऱ्यांच्या जीवनात दुख निर्माण करण्यासाठी विष कालविण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अवनतीशिवाय तरणोपाय नाही.
या मानव जीवनात जर का, दुसऱ्यांसाठी चंदनापरी थोडेतरी झिजता आले तर, तो मोलाचा क्षण गमावू नये. काडीकचऱ्यात सडून नष्ट होण्यापेक्षा स्वतः जळून दुसऱ्यांना उब देता आली पाहिजे.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply