प्रवेश ६ वा.
मंदार पुण्यावरून अचानक येतो.आईच्या हातात तांदुळाचं ताट.बाबा पेपर वाचीत बसलेत.दोघेही उठतात. आई त्याला पाणी देते.बाबा कपडे घालून बाहेर जायला निघतात. ‘ मंदार तुम्ही बसा गप्पा मारीत.मी जरा पाय मोकळे करून येतो’ असं म्हणून बाबा बाहेर पडतात.
मंदार – आई काहीतरी बिनसलेलं दिसतंय तुमचं.
आई – काही नाही रे.म्हातारचळ लागलाय तुझ्या बाबांना.अधून मधून बदलापूरच्या वृध्दाश्रमात जातात. तिकडल्या बायांमधे रमतात.घरी आले की दोन दिवस ठिकाणावर असतात.परवा तर ते सटकलेलेच होते. (आत जाऊन एक पत्र घेऊन येते व मंदारला वाचायला देते.मंदार वाचतो आणि पत्राची घडी करून खिशात ठेवतो)
मंदार- कमाल झाली बाबांची ! आता या वयात तुझ्याशी घटस्फोट?
आई – आता तूच बघ म्हणजे झालं.चांगला सुखाचा संसार सोडून नको तिथे शेण खायला जातात. हल्ली माझी एकही गोष्ट ना आवडेनाशी झाली आहे.
मंदार – पण तू हे सगळं सहन कशी करतेस ?
आई- परवा तर त्या वृध्दाश्रमातली बयो की ठयो कोणीतरी आली इथे पत्ता शोधत. आणि यांच्या चेहर्यावरची कळी खुलली की लगेच. दोघेही आतल्या खोलीत बसले होते खिदळत.
मंदार – मग तू काय केलंस?
आई – मी काय करणार… तुलाच फोन करून सांगणार होते की यांना पुण्याला घेऊन जा म्हणून. पण कसं सांगणार? आपलेच दात नी आपलेच ओठ.आता तुला कळलच आहे तर तू यांना एकटयाला पुण्याला घेऊन जा…त्यांचं वृध्दाश्रमात जाणं बंद झालं पाहीजे.
मंदार – पण तू एकटी कशी रहाणार इकडे?
आई – ती बयो आली इकडे की झिंज्या उपटून बाहेर हाकलवून देईन तिला. मैदान साफ करून टाकीन. मग पुढे पहाता येइल.
मंदार – पण बाबा कुठे गेले असतील आत्ता?
आई – ते कुठे जाणार? त्यांचा तो ज्योतिशी मित्रआहे ना…कुडमुडया जोशी. गेले असतील त्याच्याकडे. पुनर्विवाहाचा योग आहे का ते पहायला.
मंदार – ते गोग्रासवाडीतलेच ना. मी जाऊन येतो तिकडे.
आई – जेवायला येणारेस ना….मी वाट पहाते हं तुझी. (मंदार बाहेर पडतो.)
Leave a Reply