शाळा गावचं वैभव असते.शिक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती असते. गावचा सुशिक्षीतपणा घेतलेल्या ज्ञानावर अवलंबून असतो. त्या गावात माध्यमिक शाळा आहे. दहावी आणि बारावीतील मुलांना निरोप समारंभाचा कार्यक्रम होता.प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. मुलामुलींची भाषणं झाली. कार्यक्रम जोरात होता.गावातील प्रतिष्ठित मंडळी भाषण करत होती. अध्यक्षीय भाषण, बक्षीसवितरण कार्यक्रमही उरकला.बराच वेळ झाल्याने मुलं चुळबुळ करत होती. सुत्रसंचलकाने शब्द उच्चारले ‘ आता आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होते ते साहित्यिक आपल्या समोर … सादर करतील. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या !’ मी दचकलो.एकतर सूर्य आग ओकतोय! मुलांची मानसिकता नसेल. आपण कशाला विनाकारण त्यांच्यासमोर आपले ज्ञान पाजळायचे! भीतभीतच उभा राहीलो.
मित्रांनो , याच गावात मी आठ वर्ष सेवा केली. तुमचा काहींचा जन्मही नसेल. हंगे अण्णाच्या इथे खोली करून राहिलो. कथा, कविता लिहील्या. भिंतीवर संत ज्ञानेश्वर आणि महात्मा गांधीजींच्या प्रतिमा ऑईलपेंटमध्ये पसायदान अन् सुविचार आम्हीच लिहीले. ते साकारत असताना माझा मुलगा पळत आला. आपटला फरशीवर.त्याचा हात मोडला.पण फोटो पूर्ण होईपर्यंत दवाखान्यात नेला नाही छोकरा.
शिकवली ती आता मोठी उच्चपदस्थ झाली. भरपूर नोकरीत गेली. काही व्यवसायात गेले. मेहनतीनं मोठी झाली. गावाने अडचणींच्या काळात मदत केली. किराणा,दुधवाले, घरभाडे उधार. ते फक्त दिडशे रूपये महिन्याला. परिसरात झेडपीच्या शाळेचा दबदबा होता.चौथीपर्यंत साडेचारशे मुलं होती. शाळेला स्वतःच रंग देत होतो. बदली झाली तो दिवस अजुनही आठवतो मित्रांनो. टेंम्पोत पसारा भरणे सुरू होते. लेक वाट लावावी तसे गावकरी, घरमालक तसे लेकरं रडत होते. गावचा लळा आणि जिव्हाळा तोडणं अवघड होतं पण नाईलाज होता.
मुलं ऐकत होती. माझीच कथा.तिचे कथाकथन केव्हा झाले. मलाच कळले नाही. लेकरं भाऊक झाली होती. दोन कविता घेतल्या. मने जिंकल्याचा आनंद लपून राहिला नाही. बीड जिल्ह्यातील शिरूरकासार तालुक्यातील पाडळी हे गाव. गावात अनेक जातीधर्माचे लोक . गुण्यागोविंदाने नांदणारी. अनेक विद्यार्थी आजही भेटतात. ‘ ओळखला का सर ?’ असं म्हणतात.आता पोरांचे चेहरे मिसरूड फुटलेले. ओळखता येत नाहीत . विचार करून ‘ नाही ‘ असेच उच्चारण करावे लागते. बाहुलीनाट्याचे प्रयोग,गॅदरींग यांचा झकास मोसम असायचा ते दिवस आठवले की मन हरवून जाते. बदली रद्द होण्यासाठी ग्रामस्थ टेंम्पो भरून पंचायत समितीला आले होते. हे कोणत्या प्रेमाचे द्योतक म्हणायचे?
विठ्ठल जाधव
शिरूरकासार (बीड)
मो.9421442995
Leave a Reply