#तिला काय आवडतं?
©अर्चना बोरावके”मनस्वी”
कॅलेंडर बघता बघता मेधाच्या अचानक लक्षात आले, अरे! पुढच्या आठवड्यात तर आईचा वाढदिवस! किती वर्षाची झाली बरं आई? तिला जन्मवर्ष काही आठवेना. विचार करताना एकदम लक्षात आले, आई एकदा म्हणाली होती ‘ तू जन्माला आली तेव्हा मला नुकतंच विसावं वर्ष लागलं होतं.’
“माझं वय यावर्षी चाळीस होईल … म्हणजे… अरे बापरे! आईची ही साठी! ”
तिने लगेच वहिनीला फोन लावला,” वहिनी अगं, आईचा साठावा वाढदिवस आहे यंदा. आपण तो छान साजरा करू. मी येते चार दिवसांची सुट्टी घेऊन…. नाहीतरी येणं झालंच नाही या उन्हाळ्यात! आल्यावर प्लॅनिंग करू…. ”
मेधा माहेरी पोहोचली. तिला असे अचानक आलेले बघून मंगलाताईंना म्हणजे तिच्या आईला खूप आनंद झाला.
” किती दिवसांनी आली गं, आईची आठवण येत नाही ना आता! ”
” तसं नाही गं आई, ऑफिस , घर त्यात आता मुले मोठी झालीत त्यांच्या वेळा, क्लास, अभ्यास या सगळ्यात गुरफटून गेले गं मी! इच्छा असूनही येता येत नाही. म्हणुन आता आले बघ…”
मंगलाताईंनी त्या दिवशी लेकीचे आवडते बिरडे भात केला. तिला पोटभरून ते खाताना बघून त्यांच मन भरून गेलं. रात्री मेधाचं अंथरून त्यांनी त्यांच्या खोलीत टाकलं….खूप गप्पा मारायच्या होत्या किती दिवसांच्या साचलेल्या! पण बराच वेळ झाला तरी ती खोलीत आली नाही.. म्हणुन त्या बाहेर आल्या.
इकडे सगळे मिळून आईच्या वाढदिवसाचे प्लॅनिंग करत होते.
“केक बाहेरून ऑर्डर करू…. ”
” डेकोरेशनचं मुले सांभाळतील, साठ दिवे आहेत का वहिनी.. नाहीतर आणावे लागतील.”
” पण मेधाताई , जेवायला काय बनवायचं? आईंच्या आवडीचं काही तरी सांगा ना! ”
” आईला काय आवडतं मला नाही आठवत बाई! वहिनी तुला माहीत नाही का?”
” आई, तर कधीच काही म्हणाल्या नाही… जे बनवते ते, त्या आवडीने खातात…. पण काहीतरी असेलच ना.. ताई तुम्हाला तरी माहीत असायला हवं ना ? ”
आईला काय आवडतं कुणालाच सांगता येईना.
” आत्या, आजीला गिफ्ट काय घ्यायचे? ”
तेही काही ठरेना? साडी घ्यायची, तर आईला कोणता रंग आवडतो हेच कोणाला माहित नव्हते. वस्तू तरी काय घ्यायची, आईला काय आवडतं.. हे कुणालाच समजेना.
मंगलाताईंनी त्यांचे सारे बोलणे ऐकले. रूममध्ये येत त्या म्हणाल्या,
” तुमचं बोलणं ऐकलं मी चुकून…… मला वाटलंच मेधा अशी अचानक कशी आली.”
” आई, काय गं, आमचं सरप्राईज कळलं तुला. आता कळलंच आहे तर हेही सांग तुला काय आवडतं…तोच मेनू ठरवू आपण. गिफ्ट पण तुझ्या आवडीचं घेऊ. ”
मंगलाताई एकदम शांत झाल्या …बराच वेळ आपल्याच विचारात त्या हरवल्या.
” मला काय आवडतं? इतक्या वर्षात पहिल्यांदाच हा प्रश्न माझ्यासमोर आलाय. त्यामुळे एकदम काही आठवतच नाही. मला खायला काय आवडतं हे मी विसरूनच गेले आहे. लग्न झाल्यावर कुटुंबातील मोठ्या माणसांच्या आवडीनिवडी जपल्या , नंतर तुमच्या बाबांच्या, तुम्ही आल्यावर तुमच्या, आता नातवंडांच्या…. सगळ्यांच्या आवडी त्याच माझ्या आवडी बनून गेल्या… . हो पण लग्नाआधी माझी आई बनवायची ना माझ्या आवडीचं. ती माझ्यासाठी मी म्हणेल तेव्हा लाल भोपळ्याच्या घाऱ्या बनवायची… अहा! ती चव, तो सुगंध अजूनही मनातून गेला नाही. ”
” पण आई, मी या घरात आल्यापासून तर तुम्ही घाऱ्या बनवल्याचे मला आठवत नाही. ”
” हो आई, मीही कधी आपल्या घरात हा पदार्थ बनवलेला पाहिला नाही. ”
” माझे नुकतेच लग्न झाले होते… मी आपल्या गावालाच होते सुरुवातीला. तुझे बाबा नोकरीच्या ठिकाणी असायचे.. सुट्टीच्या दिवशी यायचे. एके दिवशी शेतातून ताजा लाल भोपाळा आला. सासुबाई शेतात होत्या . मला घारे खाण्याची खूप इच्छा झाली. मी ते बनवले. दुपारच्या जेवणात सगळ्यांची वाट पहात बसले होते… पण माझ्याने राहवेना. घाऱ्यांचा तो मधुर सुवास! माझ्या तोंडाला पाणी सुटले… मी लगेच एक पुरी तोंडात घातली… तेव्हड्यात सासुबाई आल्या.
” लाज कशी वाटत नाही तुला? नवरा नसताना गोडधोड करून एकटीच खात बसली… घश्याच्या खाली कसं उतरतं तुझ्या? तिकडे माझा बाळ, खानावळीचं बेचव जेवतोय, आणि तू चांगलं तळून-मळून गोडाचं खाते… आणि कुणी तुला हे बनवायला सांगितलं होतं? आपल्या घरात घारे कुणी खात नाही. परत न विचारता काही करायचे नाही.”
” तोंडातला घास तोंडातच राहिला, परत कधी मी घारे बनवले नाही आणि खाल्लेही नाही… भरलेली टोपली तशीच गड्याला देऊन टाकली. आज तुमचा प्रश्न ऐकून ते घारे डोळ्यापुढे आले. आणि आठवलं मला ते फार आवडायचे. ”
हे ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले.
” पण आई, तुम्ही इतक्या वर्षात एकदाही तुमच्या या आवडीच्या पदार्थाविषयी बोलला नाहीत…. बनवले असते ना मी. ”
” कुणी कधी विचारले नाही म्हणून मीही सांगितले नाही. अगं, घरातल्या बाईला काही आवडीनिवडी असतात हे घरातले विसरूनच गेलेले असतात… सकाळ-संध्याकाळचा स्वयंपाक घरातल्यांना विचारल्याशिवाय होत नव्हता… तुझ्या बाबांच्याही काही कमी आवडीनिवडी नव्हत्या. त्यांना खूप तिखट चमचमीत भाज्या लागायच्या…. मला सुरुवातीला त्या खाताच यायच्या नाही……चपातीबरोबर भाजी टोचून टोचून मी खायची…. पण स्वतःसाठी वेगळं काही बनवायची हिम्मत नव्हती. झाली सवय हळूहळू.
घरात आंब्यांच्या राशी पडायच्या… रोज पातेले भरभरून आमरस बनवायचे. मुला-नातवंडांना सासुबाई चार-चार वाट्या आमरस प्यायला द्यायच्या. आम्हा बायकांच्या जेवणाच्या वेळी रस संपलेला असायचा. मी परत रस करायला घेतला तर त्या म्हणायचा, ” आता कशाला करत बसतेस परत, इतकं काम पडलंय… घ्या आपल्याला आंबे अढीतून.”….. आणि मग आम्ही सार्या दोन दोन आंबे खाऊन समाधान मानायचो. कमी नव्हती कशाची. पण आपल्यासाठी करायची ना हिम्मत होती, ना मला काही आवडतं हे म्हणायची ताकद! तीच सवय लागली गं……. आणि काही वर्षातच आपल्याला काय आवडते, हेच आपण विसरून जातो. जे आहे ते गोड मानायला लागतो. जी गोष्ट खाण्याची तीच इतर आवडीनिवडींचीही! कपड़े काय नि वस्तू काय…. जे मिळाले ते स्विकारले… छंदही असेच काळाआड गेले. आवडतं काय हे विसरूनच गेले
आज विषय निघालाच आहे तर तुम्हालाही सांगते. तुम्ही आपलं मन मारायचं नाही. तुझं लग्न झाल तेव्हाही मेधा मी तुला सांगितलं होतं आणि सूनबाई तुलाही…. तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही करायचं… स्वतःसाठी उभं राहायच आणि स्वतःसाठी पण जगायचं. ”
” आई, तुमचं मन खरंच खूप मोठं आहे. नेहमी मला म्हणत असता, तुला जे आवडेल ते बनव, तुला काय आवडतं ते घाल, मी नोकरी करू शकते तेही तुमच्यामुळे….. तुम्ही घर, मुले सांभाळता म्हणून माझ्या आवडीच्या क्षेत्रात मी पुढे जात आहे…… आणि मी? कधी तुम्हाला तुमच्या आवडींबद्दल विचारलंच नाही… गृहीत धरून चालले.. किती स्वार्थी आहे मी! ”
” आणि आई मीसुद्धा… कधीही तुला काय हवंय, याचा विचार केला नाही. ”
” वेड्या का गं तुम्ही? अगं आवडींना मुरड घालत, प्रत्येक वेळी तडजोड करत राहिले, त्यामुळे स्वभावच असा झाला. माझ्या जगात बाकी सगळ्यांना जागा होती… पण एक छोटासा कोपरा त्या जगात माझ्या स्वतःसाठी ठेवायचे भान मला राहिले नाही. आता वयाची साठी पार करताना जाणवतेय स्वतःसाठी जगणं राहूनच गेलंय…. तुमच्या बाबतीत तरी असे होऊ नये यासाठी मी प्रयत्न करत होते. माझ्या सासुबाई माझ्या पाठीशी नव्हत्या, त्यांनी मला स्वत्व विसरायला लावलं … कारण त्यांनाही तशीच वागणूक मिळाली होती…पिढ्यानपिढ्या हेच होतं आलंय… ही साखळी तोडायचा म्हणूनच मी प्रयत्न करत आहे..”
” तुम्ही आमचा इतका विचार करता, आता आम्हीही तुमच्यासाठी ते सर्व करणार… ”
” नाही !तुम्ही माझ्यासाठी काही करायचं नाही … या साठाव्या वाढदिवशी एका नव्या मंगलेचा जन्म होणार आहे. दुसर्याने आपल्यासाठी काही करावे, ही अपेक्षाच चूक आहे, हे मला आता कळलंय. मीच माझ्यासाठी उभी राहणार. माझ्या राहिलेल्या इच्छा आणि आवडी पूर्ण करणार. कालच मंदिरातल्या ग्रुप बरोबर बोलणं झालंय… या जडावलेल्या बोटांमधून लुप्त झालेली हार्मोनियमची सप्तकं मला खुणावत आहेत… माझी संध्याकाळ आता या सुरांसाठी…. शिवाय वर्षातून एकदा ग्रुपच्या सहली निघतात.. मीही जाणार.. पर्यटन करणार…. आणि सकाळचा वेळ चालायला जाण्यासाठी आणि प्राणायाम करण्यासाठी! सूनबाई आता या वेळेत मी तुमच्या वाट्याला येणार नाही…तो वेळ फक्त माझा. कराल ना मॅनेज सर्व. ”
” अगदी आनंदाने आई! ”
मंगलाताईंचा वाढदिवस अगदी आगळावेगळा ठरला.. जेवणात घारे तर होतेच पण अजूनही अनेक पक्वान्ने होती, जी खास मंगलाताईंच्या आवडीची होती. सगळ्यांंतर्फे नवीकोरी हार्मोनियम त्यांना भेट देण्यात आली. केक कापताना त्यांनी पाहिले, केकवर साठ अंकाच्या मेणबत्त्या होत्या . त्यांनी सहा हा आकडा केकवरून काढला. केक वर फक्त शून्य राहिला…
शून्य, ज्यातून नव्याचा आरंभ होतो ! त्या शून्यातून सुरुवात होणार होती एका नव्या जगण्याची!
©अर्चना बोरावके”मनस्वी”
वाचकहो कशी वाटली माझी कथा? तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या. माझे सर्व लेख आणि कथा वाचण्यासाठी माझ्या ‘मनस्वी’ या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या. मला like आणि follow ही करू शकता.
आवडल्यास कृपया नावासहच शेअर करा.
Leave a Reply